ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
आपल्याकडे गीतकार आणि संगीतकार, नायक आणि संगीतकार यांच्या जोड्या होत्या; तशाच काही जोड्या दिग्दर्शक आणि संगीतकार यांच्या देखील होत्या. यातच एक जोडी होती दिग्दर्शक देवेंद्र गोयल आणि संगीतकार रवि यांची! या दोघांनी तब्बल २० ते २२ वर्ष एकत्र काम केले. या दरम्यान संगीतकार रवी यांनी इतर निर्माता /दिग्दर्शकांकडे काम केले, पण काही अपवाद वगळता दिग्दर्शक देवेंद्र गोयल यांनी मात्र सातत्याने संगीतकार रवी यांचेच संगीत आपल्या सिनेमासाठी घेतले.
एकत्र काम करण्याचा एक मोठा फायदा असा असतो की, दिग्दर्शकाला नेमकं काय हवं असतं हे संगीतकाराला ठाऊक असतं. त्यामुळे यांच्या दोघांमध्ये असलेल्या ट्युनिंगमुळे काम आणखी सोपे आणि उत्तम होऊन जाते. आज जो किस्सा मी आपल्याला सांगणार आहे तो याच दोघांच्या एका गाण्याचा आहे.
त्यावेळी देवेंद्र गोयल ‘एक साल’ हा चित्रपट दिग्दर्शित करीत होते. या सिनेमासाठी संगीतकार रवी यांनी एक धून १९५७ साली बनवली. (त्या वेळी संगीतकाराच्या धून वर शब्द लिहिण्याचा फार्म्युला लोकप्रिय होता.) ही धून देवेंद्र गोयल यांना देखील खूप आवडली. या चित्रपटात अशोक कुमार आणि मधुबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटातील ‘सब कुछ लुटा के होश मे आये तो क्या किया’, हे लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांनी स्वतंत्र गायलेलं गीत आज देखील रसिकांच्या स्मरणात आहे. खरंतर याच चित्रपटासाठी रवी यांनी बनवलेल्या ‘मेलडीयस’ धूनवर गाणे तयार होणे अपेक्षित होते. परंतु, काही कारणाने या चित्रपटात या धूनवर गाणे लिहिले गेले नाही आणि ही धून तशीच बाजूला ठेवली गेली.
यानंतर अनेक वर्ष गेली. पन्नासचे दशक संपले साठचे दशक संपले. पण या धून वरचे गाणे काही आले नाही. संगीतकार रवी यांनी ती धून जपून ठेवली होती. दरम्यानच्या काळात रवी आणि देवेंद्र गोयल यांचे अनेक चित्रपट रुपेरी पडद्यावर आले आणि चांगले यशस्वी देखील झाले.
====
हे देखील वाचा: साक्षात्कार लता नावाच्या स्वर संस्काराचा!
====
सर्व सिनेमे संगीतप्रधान होते. या सिनेमातील गाणी पहा टीम टीम करते तारे-लता (चिराग कहा रोशनी कहा), मुझे प्यार की जिंदगी देने वाले –आशा/रफी (प्यार का सागर), हुस्न भी चांद से शरमाया है- रफी (दूर की आवाज), आ लग जा गले दिलरुबा –रफी (दस लाख) ओ नन्हे से फरिश्ते –रफी (एक फुल दो माली), मै तो चला जिधर चाले रस्ता – किशोर (धडकन)
हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलेच यशस्वी ठरले. या सर्व सिनेमातील गाणी त्या काळात खूप गाजली. देवेंद्र गोयल एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या पुढे आले. संगीतकार रवी साठच्या दशकात प्रस्थापित संगीतकार बनले. पण त्यांना मात्र कायम आपली ती न वापरलेली धून वारंवार आठवत होती. अखेर अठरा वर्षानंतर या धूनचे भाग्य उजळले आणि या धूनवर एक गाणे लिहिले गेले.
१९ जुलै १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘एक महल हो सपनों का’ या चित्रपटात या धूनवर एक गाणे लिहिले गेले. या चित्रपटात धर्मेंद्र, शर्मिला टागोर आणि लिना चंदावरकर यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाची गाणी साहिर लुधियानवी यांनी लिहिली होती. संगीतकार रवी आणि देवेन्द्र गोयल यांनी आपली अठरा वर्षांपूर्वीची ठेवणीतली धून या चित्रपटासाठी वापरायचे ठरवले. त्यांनी गीतकार साहिर लुधियानवी यांना यावर गाणे लिहायला सांगितले. साहिर यांनी अतिशय अप्रतिम असे शब्द इथे वापरले.
====
हे देखील वाचा: मायबापा विठ्ठला: अजय- अतुलच्या शब्द -स्वरांनी पाणावले डोळे!
====
चित्रपटात हे गाणे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात स्वतंत्र असे आहे . (Tandem Song) अठरा वर्षाच्या वनवासातून ही धून मोठी झळाळून बाहेर पडली. हे गाणे होते ‘दिल मे किसी की याद का जलता हुआ दिया दुनिया की आंधी यो से भला वो बुझेगा क्या ….’ खरोखरच अठरा वर्षांपूर्वी जन्म घेतलेल्या या चालीवर इतक्या वर्षानंतर शब्द लिहिले गेले आणि हे गीत रसिकांच्या पुढे आले. (“दुनिया की आंधी यो से भला वो बुझेगा क्या”, याचा खरोखरच प्रत्यय आला.) लताच्या स्वरातील हे गाणे जास्त गाजले.
‘एक महल सपनोंका’ हा चित्रपट चांगले कथानक, चांगलं संगीत असतानादेखील फारसा चालला नाही. ‘शोले’ प्रदर्शित होण्याच्या एक महिना आधी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण सिनेमाला यश मिळाले नाही.
संगीतकार रवि यांनी एका रेडीओ प्रोग्रॅममध्ये ही माहिती स्वत:च दिली होती. त्यामुळे आपण खरे मानायचे, पण मला वाटतं ‘वो दिल कहां से लाऊ तेरी याद जो भुला दे (भरोसा)’ आणि ‘लो आ गयी उनकी याद वो नही आये (दो बदन)’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या दोन्ही गीतांमध्ये ही चाल अंधुकशी डोकावते ना? तुम्हाला काय वाटतं?