म्हणून झुंड चालायला हवा!
आपल्या अवतीभवती अनेक गोष्टी घडत असतात. काही चांगल्या काही वाईट. अर्थात, गोष्ट चांगली किंवा वाईट असणं हे व्यक्तिसापेक्ष आहे. पण तरीही अगदी ढोबळ मानाने जरी विचार केला, तर पारदर्शी मनाला असंच वाटत असतं की, जे चांगलं आहे ते प्रमोट व्हायला हवं आणि जे वाईट आहे ते वाईटच ठरायला हवं. यातून दोन गोष्टी होतात. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं धाडस दाखवलं की, वाईटाला वाईट म्हणण्याचं धाडस आपोआप अंगी येतं आणि दुसरं गोष्ट अशी की दर्जाहीन वा वाईट कलाकृतीला वाईट ठरवल्यामुळे काळ सोकावत नाही.
आता आपल्या इंडस्ट्रीबद्दल बोलायचं, तर वाईट सिनेमा आणि चांगला सिनेमा, असे दोन भाग पडतात. वाईट सिनेमा चालला तर त्यात वाईट वाटून घ्यायचं कारण नाही कारण तेच होत आलं आहे. पण चांगला सिनेमा मात्र चालायल हवा कारण अशाने चांगलं काही करू पाहणाऱ्या लोकांना ती शाबासकी असते. आता येत्या ४ मार्चला नागराज मंजुळेचा ‘झुंड’ हा सिनेमा येतो आहे. त्यावरून आत्ता जे सगळं लिहिलं आहे तेच वाटतंय
नागराज मंजुळेचा प्रवास डोळे दिपवून टाकणार आहे. केवळ दोन सिनेमात इतकं मोठं यश सगळ्यांच्याच हाती लागत नाही. असे फार कमी आहेत. अर्थात सिनेमा हा नगावर नसतो, तर तो कलात्मक भाग आहे हे ओघानं आलंच. नागराजने केलेल्या सिनेमांकडे नजर टाकली, तर त्यातली कलात्मकता दिसते. त्याचा आलेला पहिला फॅंड्री आणि दुसरा सैराट, दोन्ही सिनेमाचं मोठं कौतुक झालं. याशिवाय, त्याने केलेले लघुपटही गाजले. आता त्या पलिकडे जात त्याचा ‘झुंड’ हा सिनेमा येतोय. साक्षात अमिताभ बच्चन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ज्या विजय बोरसे यांची गोष्ट नागराज या सिनेमातून मांडू पाहतोय, त्याच विजय सरांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे.
गेले अनेक महिने या सिनेमाची चर्चा चालू आहे. गेली दोन वर्षं या सिनेमाकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे. सगळीकडे लॉकडाऊन असताना, ज्या काही मोजक्या सिनेमांवर चर्चा घडायची त्यात हा सिनेमा होता. म्हणजे, हे असे सिनेमे होते की, ते ओटीटीवर येणार की थिएटरमध्ये येणार, यावर चर्चा होत असे. त्यापैकी झुंड हा सिनेमा होता. बराच पेशन्स पचवून हा सिनेमा आता रिलीजसाठी तयार झाला आहे.
झुंड हा सिनेमा सर्वार्थाने वेगळा असणार आहे कारण तो नागराजने बनवला आहे. तो चांगला वा वाईट असेल की नाही, हे नंतर ठरवता येईल. पण ज्या काही मोजक्या दिग्दर्शकांना स्क्रीन प्ले नेमका कळतो त्यापैकी एक नागराज आहे. मोजके संवाद आणि त्यातून जोरदार कथामांडणी करण्यात नागराजचा हात कोणीच धरू शकत नाही. फॅंड्री आणि सैराट या दोन्ही सिनेमावेळी त्यााची प्रचिती आली होती. आता त्याला झुंड हा चित्रपटही अपवाद नसणार आहे. कारण, इट्स ऑल अबाउट फिल्म मेकिंग. तो सिनेमा एखाद्याला आवडेल, एखाद्याला नावडेल, पण तो खोटा नसणार, कारण नागराजला जे भावतं तेच तो करतो.
म्हणूनच, नागराजसारख्या दिग्दर्शकांनी हिंदी इंडस्ट्रीत येण्याची गरज आहे. इतर सगळ्या क्षेत्रात असतं त्याप्रमाणे अनेक अडचणी त्यालाही येणार आहेत. तिकडेही कदाचित बॉलिवूडच्या लॉबिंगचा फटका त्याला चुकणारा नसेल, पण त्याला भ्यायचं कारण नाही. जेव्हा परफॉर्मन्सची बात येते तेव्हा नागराज हे खणखणीत नाणं असणार आहे. इथे आपली जबाबदारी वाढते. यापूर्वी मराठीने कित्येक दिग्दर्शक हिंदी इंडस्ट्रीला दिले आहेत. आशुतोष गोवारिकर, ओम राऊत, लक्ष्मण उतेकर, अमित मसुरकर, राजेश मापुसकर अशी अनेक नावं भोवताली आहेत. यात आणखी एक नाव आज येईल. सध्या हिंदी इंडस्ट्रीत कार्यरत असलेली दिग्दर्शक मंडळी मातब्बर आहेतच. पण नागराजची केस सर्वार्थाने वेगळी आणि आदर्श वाटावी अशी आहे.
नागराज दिग्दर्शक झाल्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून दिग्दर्शनात येण्यासाठी झेपावणारी कित्येक मुलं मी पाहिली आहेत. इतकंच नव्हे, तर आज मराठीत नागराजच्या सिनेमेकिंगच्या पॅटर्नची आठवण करून देणारे अनेक दिग्दर्शक आहेत. जी मंडळी सिनेमा बनवताहेत आणि त्यांचे सिनेमे पाहिलेही जात आहेत. नागराज अशा अर्थाने पाथफाईंडर बनला आहे.
मराठीमध्ये कमी काळ असला तरी नागराजने चौफेर फटकेबाजी केली आहे. अर्थात तो पूर्णत: हिंदीतही गेलेला नाही. एकिकडे झुंड सिनेमा रिलीजवर असताना, अमेय वाघ, सयाजी शिंदे यांना घेऊन तो घर, बंदूक, बिर्याणी हा सिनेमाही बनतो आहेच. शिवाय, अभिनय क्षेत्रातही तो मुशाफिरी करतो आहे. हे सगळं करणाऱ्या अव्वल इसमाचा सिनेमा हिंदीत येत असेल, तर तो चालाायल हवा. गेल्या काही वर्षांपासून नागराज ज्या पद्धतीने काम करतो आहे, ते पाहता आणखी दोनएक वर्षात नागराज नावाचं एक चालतं बोलतं स्वतंत्र विद्यापीठ सिनेविश्वात स्थापन होणार आहे. मराठीत त्याची स्थापना झाली आहेच, आता हिंदीत ते जाऊ पाहातं आहे.
हे ही वाचा: चित्रपटांवरून होणारे वाद तेव्हा आणि आत्ता (Controversial Movies)
मायबापा विठ्ठला: अजय- अतुलच्या शब्द -स्वरांनी पाणावले डोळे!
अशावेळी नागराजचा मार्ग आपण सर्वांनी सुकर करायला हवा. झुंडसारखा सिनेमा चालायला हवा. कारण, नागराज आपल्याला हवं तसं सिनेमाचं नवं व्याकरण तयार करतोय. झुंडमध्ये अमिताभ बच्चन सोडले तर हिंदीतला एकही मोठा बडा चेहरा नाही. उलट त्यात घेण्यात आलेले सगळे प्लेअर्स हे नॉन फिल्मी बॅकग्राऊंडचे आहेत. सर्वार्थाने नागराजचं बॉलिवूडमध्ये जाणं हे अत्यंत स्वागतार्ह असणार आहे. विशेषत: सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या घराणेशाहीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्याचं ब़ॉलिवूडमध्ये जाणं महत्वाचं आहे.
झुंड चालणं यासाठी महत्वाचं आहे. पुष्पासारख्या बिग बजेट, मसालेदार सिनेमांच्या सर्वभाषिक आक्रमणांना नागराज करत असलेल्या कलात्मक कलाकृतीचा उतारा हाच उपाय ठरू शकेल असंही आत्ता शेवटी शेवटी वाटून जातं.