महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
झेप अभी बाकी है मेरे दोस्त!
बघता बघता २०२२ वर्षं संपेल. खरंतर या वर्षाकडून खूप अपेक्षा होत्या. लॉकडाऊन नंतर सगळं स्थिरस्थावर होत असताना येणारं वर्षं म्हणजेच २०२२ वर्षं पुन्हा एकदा चांगलं हाती काही घेऊन येईल असं वाटून गेलं. त्यातही मनोरंजन सृष्टीतर पूर्ण ठप्प झाली होती. नाही म्हणायला, टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स होते. पण सिनेमे तितके नव्हते. मराठी सिनेमे (Marathi Cinema) यायला सुरूवात झाली होती अगदी. त्यामुळे २०२२ मध्ये काय होतंय याकडे सगळ्यांच लक्ष होतं. आणि मघाशी म्हटल्या प्रमाणे आपण तर आता या वर्षाखेरीला आलो आहोत. मग कसं होतं हे वर्षं मराठीसाठी?
खरं सांगायचं तर इंडस्ट्री म्हणून पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टी रुळावर आली. सिनेमे पुन्हा बनू लागले. जे अडकले होते ते रिलीज होऊ लागले. त्यातले काही चालू लागले. म्हणजे पुन्हा एकदा मराठी सिनेमाची (Marathi Cinema) व्यवस्था जोडली गेली. रोजगार तयार झाला. लॉकडाऊनचं कारण देऊन बजेटं कमी केली जाऊ लाागली हेही तितकंच खरं आहे. पण घरातली चूल पुन्हा एकदा पेटू लागली. आणि आता वर्षाखेरीस आपण जेव्हा रिलीज झालेल्या सिनेमांवर नजर टाकतो तेव्हा काय दिसतं? तर मराठीत रिलीज झालेल्या सिनेमांची संख्या जवळपास ८० पेक्षा जास्त आहे. त्यापैकी बहुतांश पुण्या-मुंबईत रिलीज झाले.. काही महाराष्ट्रात इतर ठिकाणी.
म्हणजे पुन्हा एकदा सिनेमे (Marathi Cinema) तयार होऊ लागले. पैकी जे लॉकडाऊन आधी तयार होते ते रिलीज होऊ लागले. सगळं मार्गी लागतंय असं दिसतं. पण यात आता आपण विचार करायची वेळ आली आहे. सिनेमे भरपूर तयार होणं ही गोष्ट व्यवसाय म्हणून त्यात काम करणाऱ्यांना उत्तम आहे. कारण रोजगार निर्माण झाला. हाताला काम लागलं. पण त्याच्या हेतूकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा परिस्थिती फार भयानक असल्याचं लक्षात येतं. रिलीज झालेल्या सिनेमांपैकी तिकीट बारीवर नफा करणारे आणि नफा नंतरची बाब आहे केवळ सिनेमाबद्दल कुतूहल निर्माण केलेल्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत झाली आहे.
या वर्षावर नजर टाकली तर काही सिनेमांची दखल प्रेक्षकांनी घेतलीच. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो पावनखिंड, मी वसंतराव, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, हरहर महादेव, झोंबिवली, चंद्रमुखी, शेरशिवराज असे आहेत. याचा शेवट होतोय रितेश देशमुख दिग्दर्शित वेड सिनेमाने. म्हणजे व्यवसायिक पातळीवरचं यश क्षणभर बाजूला ठेवलं तरी हे सिनेमे लोकांपर्यंत पोचले आणि त्यांनी उत्सुकता वाढवली. पण टक्का त्यापेक्षाा जास्त होत नाही.
इथेच आपण विचार करायची गरज आहे. एकीकडे मराठीमध्ये मागणीपेक्षा पुरवठा वाढत असताना दुसरीकडे इतर भाषांमधल्या सिनेमांचा व्यवसायातला टक्का वाढताना दिसतोय. याचं उत्तम उदाहरण कांतारा हे देता येईल. हा सिनेमा (Marathi Cinema) मूळ कानडी भाषेतला आहे. तिथल्या लोकांसाठी तो तयार झाला आहे. त्याची ठेवण त्यांच्यासाठीची आहे. म्हणून स्क्रीनप्लेमध्ये अधेमधे विनोदी प्रसंगांची पेरणी झालेली दिसते. या प्रकारामुळे या सिनेमाची खिल्लीही उडवली गेली. पण मुद्दा तो नाहीच. केवळ १६ कोटीत बनलेल्या या सिनेमाने घवघवीत यश संपादलं. लोकांना हा सिनेमा आवडला. त्यातली ऊर्जा आवडली. ही ऊर्जा महत्वाची आहे. आपल्या सिनेमात ती नसते अशातला भाग नाही. पण आपले बरेच सिनेमे केवळ ‘कोमट’ प्रकारात मोडतात. त्याचा मोठा तोटा आपल्याला होतो आहे.
======
हे देखील वाचा : वकांडा फॉरएवर ; ब्लॅक पँथरचा जगभरात धुमाकूळ
=====
२०२२ या वर्षाची सांगता होत असताना आपण केवळ फुशारक्या मारुन होणारं नाही. हे असंच चालू राहिलं तर मराठीचं भवितव्य नक्की काय? असा प्रश्न निर्माण होणारा आहे. सतत आशयघन द्यायची हौस असलीच पाहिजे असं नाही. प्रेक्षकांना विश्वासात घेणं.. त्यांना तो विश्वास देणं ही आता येत्या २०२३ मधली खरी गरज असणार आहे. एखादा चांगला सिनेमा आला की, लोक येऊ लागतात. पण नंतर पुढे त्यानंतर आलेल्या सिनेमांमळे मोठ्या सिनेमाची पाऊलखूण पुसून टाकली जाते. मग पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न सुरु होतात. त्यातली गंमत अशी की आता या पाऊलखुणा इतर प्रादेशिक भाषांतल्या सिनेमांच्या उमटताहेत. त्या पुसून तिथे मराठीची खूण गडद करणं हे येत्या काळात महत्वाचं बनणार आहे.
या सरत्या वर्षाने आपण ट्रॅकवर आलो ते फार बरंच झालं. पण आता टेक ऑफ घ्यायची वेळ आली आहे. नुसतं ट्रॅकवर राहून फार काही होणारं नाही. घ्याव्या लागणाऱ्या झेपेसाठी आपल्याला थोडे जास्त काही करावे लागणार आहे. ही एका लेखकाची, दिग्दर्शकाची, कलाकारांची जबाबदारी नाही. ती अगदी वितरकांपासून पार प्रत्येक घटकाची आहे. तसं झालं तरच ती ऊर्जा तयार होईल जी या व्यवसायाला झेप घ्यायला भाग पाडेल. तसं व्हावं. भले ते घडो. अलविदा २०२२.
सौमित्र पोटे