Urmila Kothare अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात, एकाच मृत्यू
Jaanwar Movie : ‘या’ चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण.
एकाच नावाचा चित्रपट काही वर्षांच्या अंतराने पडद्यावर येणे हा देखील एक फिल्मी खेळच. फार पूर्वी रसरंग साप्ताहिकात कैलास झोडगे यांचा यावरच एक नाव अनेक चित्रपट असे माहितीपूर्ण वाचनीय सदर होते. नवीन पिढीतील चित्रपट रसिकांना चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्ये डोकावण्याची छान संधी होती. आज चित्रपटाचे व्यसनीच एक नाव अनेक चित्रपट यावर जास्त ऑपरेशन करुन त्यातल्या कोणाचा प्रभाव कायम राहिला हे आवडीने सांगू शकतात. (Jaanwar Movie)
“जानवर” (Jaanwar Movie) (मुंबईत रिलीज २४ डिसेंबर १९९९) चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना तर यावर फोकस हवाच. हा Jaanwar तुफान ॲक्शन ड्रामा. चिक्कार हाणाभारी. नायकाचे रौद्र रुप. दिसणेही तसेच. पिक्चरचा हीरो अक्षय कुमार (akshay kumar) . त्याच्या फिटनेस, सेक्स सिम्बल, सिक्स पॅक, ढिश्यूम ढिश्यूम साहस, रोमान्समधील धीटपणा हे सगळं दाखवायचे ते दिवस होते. तोही ते एन्जाॅय करे.
एकेका नायकाचे कसे दिवस असतील काहीच सांगता येत नाही. ते दिवस त्या हीरोच्या गल्लापेटीवरील सुपरहिट पिक्चरवर येतात (पिक्चर चाललं नाही की जातात), अक्षय कुमारचा ब्रॅन्ड “खिलाडी“. Khiladi जानवर असेही नाव चालले असते. तोच ब्रॅण्ड कॅश करण्यासाठी स्टोरी तशीच हवी. त्यावर पटकथा रचताना हीरोची सगळीच वैशिष्ट्य त्यात दाखवता यायला हवीत. पटकथा लेखक राॅबिन भट्ट त्यात “मास्टर”. एखाद्या जुन्या चित्रपटातील जर्म अर्थात मध्यवर्ती कथासूत्र वापरुन नवीन चित्रपट रचणे, रंगवणे यात ते हुशार.
“जानवर” (Jaanwar Movie) मध्ये एका गुन्हेगाराला (शक्ती कपूर) एक अनाथ मुलगा सापडतो. त्याचे नाव तो बाबू लोहार असे ठेवतो. पण प्रेमाने ‘बादशाह’ म्हणतो. आता नावच बादशाह त्यामुळे तो हिंसक वृत्तीचा बनणार हे स्पष्ट होते. या बादशाह (अक्षय कुमार) ची गुन्हेगारी क्षेत्रात चलती. त्याचा सगळाच विश्वास हिंसेवर. म्हणून तो जानवर (Jaanwar Movie). अशा नामचीन, खतरनाक नि वाॅन्टेड गुन्हेगाराचा पाडाव करण्याचा पोलीस इन्स्पेक्टर प्रधान (आशीष विद्यार्थी) यांचा निर्धार. एक कडवा संघर्ष. गुन्हेगार विरुध्द कायदा आणि अशातच बादशाहच्या आयुष्यात सपना (Karisma Kapoor) येते आणि अशाच काही फिल्मी गोष्टी घडत बिघडत हा जानवर चित्रपट रंगत जातो. (Entertainment mix masala)
दिग्दर्शक Suneel Darshan हे सगळे नाट्य मांडताना अक्षय कुमारला अधिकाधिक फुटेज देतात यात आश्चर्य ते काय? बाॅक्स ऑफिसवरचे तेच चलनी नाणे. यात या बादशाहचा राईट हॅन्ड अर्थात विश्वासू अब्दुल (Ashutosh Rana) याचीही महत्वाची भूमिका. याशिवाय मोहनीश बहेल, जाॅनी लिव्हर, आदित्य कापडिया, विजू खोटे आणि कादर खान इत्यादींच्या भूमिका. अशा देमार घेमार आणि पुन्हा देमार अशा चित्रपटात पिस्तूल वगैरेंचे खचाखच आवाज भरपूर त्यात गाण्यांचा आवाज तो काय? समीर यांच्या गीतांना आनंद मिलिंद यांचे संगीत.
अशा मसालेदार मनोरंजक चित्रपटाला छोट्या शहरातून हाऊसफुल्ल रिस्पॉन्स मिळण्याची जास्त खात्री. तोपर्यंत तरी एक पडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सची चलती होती. डोक्याला आराम देत असे चित्रपट पाहिले तरच त्याने मनोरंजन होते. रसिकांच्या एका रसिक पिढीला ‘जानवर‘ (Jaanwar Movie) चित्रपट म्हणताच शम्मी कपूरने गीत संगीत व नृत्यात पुरते झोकून देत, शक्य तितके आळोखे पिळोखे देत साकारलेली लाल छडी मैदान खडी, मेरी मोहब्बत जवान होगी, तुमसे अच्छा कौन है ही राजश्रीला उद्देशून, छेडछाड करीत साकारलेली गाणी आठवतात (आवडतात). या सचिन भौमिक लिखित व बप्पी सोनी दिग्दर्शित Janwar (१९६५ चा चित्रपट) ला रौप्य महोत्सवी यश मिळाले यात आश्चर्य नव्हे.
गाण्यातील शम्मी कपूर (Shammi Kapoor) मस्त एन्जाॅय करायला आवडणारे ते दिवस होते. हसरत जयपुरी व शैलेन्द्र यांच्या गाण्यांना शंकर जयकिशन संगीत, मोहम्मद रफीचे गाण्याचा मूड आणि शम्मी कपूरची नृत्य शैली पकडणारे पार्श्वगायन आणि या सगळ्याला शम्मी कपूरने दिलेली बेभान बेफाम अदा. गाण्यांसाठी शम्मी कपूरचे अनेक पिक्चर पुन्हा पुन्हा पाहिले गेले. माझ्या पिढीला पन्नास व साठच्या दशकातील सुपर हिट संगीताने भरपूर आनंद देणारे चित्रपट पाहण्यासाठी मॅटीनी शो व रिपीट रन खेळाची झक्कास पर्वणी होती.
मी जानवर नाझला मॅटीनी शोला एन्जाॅय केला. अलिकडे मल्टीप्लेक्सकडे नवीन चित्रपटांचा प्रवाह आटला तेव्हा वीस पंचवीस वर्षांपूर्वीचे चित्रपट रिपीट रनला रिलीज झाल्यावर त्याची जणू अशी चर्चा रंगली की जणू हे पहिल्यांदाच घडलयं. चित्रपट इतिहासात ते फारच पूर्वी घडलयं. माझ्या पिढीने मॅटीनी शोला कमी केलेल्या तिकीट दरात एन्जाॅय केले. (दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला स्टाॅलचे तिकीट दर एक रुपया पाच पैसे असे. खिशात तेवढेच पैसे असत. तेही भारी वाटे.) जानवर (Jaanwar Movie) ची गाणी रेडिओ सिलोन, विविध भारती यावर ऐकत होतो. कधी गावदेवी सिग्नलवरील सिसिल इराणी हाॅटेलमधील जुक्स बाॅक्समध्ये आठ आण्याचे नाणे टाकून ऐकत असे. आपल्या देशातील चित्रपट संगीताने जनसामान्यांना कायमच आनंद दिला. (Bollywood Masala)
============
हे देखील वाचा : लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?
============
जानवर (Jaanwar Movie) नावाचा आणखीन एक चित्रपट आला आणि गेला. तो होता ए. अली रझा दिग्दर्शित १९८२ चा चित्रपट. पडत्या काळात राजेश खन्नाचे अनेक चित्रपट रखडत रखडत पडद्यावर आले. त्यात हा जानवर होता. राजेश खन्नाची नायिका झीनत अमान होती. हा चित्रपट पाहिल्याचे आठवतयं, पण काय बरे पाहिले हे आठवत नाही. काही काही चित्रपट असेही आठवणीत राहतात. ते विसरता येत नाहीत. याच कारण फिल्म दीवानेपण. अक्षय कुमारच्या जानवरला पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना हे सगळेच जानवर चित्रपट सांगायला हवेतच.