हॅलो चार्ली: एक फसलेली रोड ट्रीप
ट्रेलर किंवा टीझर्सवरून एखाद्या चित्रपटाचा अंदाज बांधणं ही एकंदरीतच अवघड बाब आहे. हे प्रोमोज बघून थ्रिलर किंवा हॉरर वाटणाऱ्या फिल्म्स प्रत्यक्षात कश्या असतील हे कधीच सांगता येत नाही पण शक्यतो विनोदी कथानक असेल तर प्रेक्षकांच्या अपेक्षा मात्र वाढतात. विनोदी चित्रपट हे फक्त आणि फक्त मनोरंजन करण्यासाठीच बनलेले असतात, डोकं बाजूला ठेवून, नसलेल्या लॉजिककडे दुर्लक्ष करून हे चित्रपट पाहायचे असतात अशी एक दृढ धारणा प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच आहे. पण बरेचसे विनोदी चित्रपट याबाबतीत सपशेल अपयशी ठरतात. असाच एक ‘हॅलो चार्ली’ (Hello Charlie) नावाचा स्वयंघोषित विनोदी चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे.
या चित्रपटाची कथा चिराग रस्तोगी उर्फ चार्ली (आदर जैन) या बेरोजगार तरुणाभोवती फिरते. चार्ली त्याच्या वडिलांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी काम शोधत मुंबईला त्याच्या मामाकडे (दर्शन जरीवाला) राहायला येतो. जाईल तिथे घोळ घालणाऱ्या चार्लीवर एकेदिवशी एक गोरिला मुंबईवरून दिवला एक्स्पोर्ट करायची जबाबदारी सोपवली जाते. हा गोरिला दुसरा तिसरा कोणी नसून वेषांतर केलेला उद्योगपती मखवाना (जॅकी श्रॉफ) असतो, जो पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून देश सोडण्याच्या तयारीत असतो. दुसरीकडे, अभयारण्यात सोडण्यासाठी एक खराखुरा गोरिला नेणारं विमान गीरच्या जंगलात क्रॅश होतं आणि त्या अपघातातून वाचलेला गोरिला तिथून निसटतो, ज्याच्यासाठी वनविभागाकडून शोधमोहीम राबवली जाते. खऱ्या आणि खोट्या गोरिलाच्या या लपंडावात चार्लीची कशी धावपळ होते, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळते.
एकंदरीत कथानकावरून चित्रपटाचा शेवट काय असेल, याचा अंदाज बांधणं सहजशक्य असल्याने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा भार अभिनय आणि पटकथेवर येतो. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पंकज सारस्वत यांनी केलं असून, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी हे निर्माते आहेत. या दिग्दर्शकाने याआधीही काही कॉमेडी रिॲलिटी शोजसाठी दिग्दर्शन केलं असल्याने ‘हॅलो चार्ली’च्या विनोदांचा दर्जा निश्चितच उत्तम असेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती. मात्र जुने, रटाळ शाब्दिक विनोद आणि ओढूनताणून केलेली विनोदनिर्मिती या चित्रपटाच्या जॉनरवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.
रणबीर कपूरचे लुक्स आणि वरून धवनच्या ओव्हर ॲक्टिंगचं समीकरण म्हणून चार्लीची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आदर जैनकडे बघता येईल. त्याची एकसुरी, अविरत बडबड आणि विनोदी अभिनय करण्याची धडपड प्रेक्षकांना हसवण्यात अपयशी ठरते. जॅकीला फारसा वाव मिळाला नसला तरी गोरिलाच्या अंधाऱ्या सूटमध्ये दिसणारा त्याचा मुद्राभिनय(!) पाहण्यासारखा आहे. पद्माचं पात्र श्लोका पंडितने तर मोनाचं पात्र एलनाज नरोझीने उत्तमरीत्या साकारलं असूनही, त्यांच्या वाट्याला फारसे विनोदी प्रसंग आलेले नाहीत. दर्शन जरीवाला, गिरीश कुलकर्णी, सिद्धांत कपूर या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा उथळ वाटतात. राजपाल यादव, भारत गणेशपुरे, आनंदा कारेकर, ब्रम्हा मिश्रा असे विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले कलाकार गाठीशी असताना त्यांच्या व्यक्तिरेखांना अधिक न खुलवणं दिग्दर्शकाला महागात पडलेलं आहे.
चित्रपटाची सर्वच गाणी श्रवणीय असून संगीत संयोजनाची जबाबदारी तनिष्क बागची, कनिका कपूर, रिषी रिच इत्यादींनी समर्थपणे निभावली आहे. कागदोपत्री विनोदी चित्रपट म्हणून जाहीर झाला असला तरी त्यातल्या विनोदांमध्ये प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याचा दम नसल्याचं दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी जाणलं असावं आणि म्हणूनच उण्यापुऱ्या १०० मिनिटांत हा लपंडावाचा खेळ उरकण्याची किमया त्यांनी साधली आहे. तुमच्याकडे बघण्यासारखं काहीच नसेल आणि शंभरेक मिनिटं तुम्ही वाया घालवू इच्छित असाल तर ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध असलेला हा चित्रपट नक्कीच पाहू शकता.
=====
हे देखील वाचा: दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा “या” चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.
=====