‘युट्युब’वरील पायरसीविरुद्ध जपानी निर्मात्यांची एकजूट
कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी जपानमधील १३ बड्या चित्रपट निर्मात्यांनी तीन व्यक्तींविरोधात खटला दाखल केला आहे. तक्रारदारांमध्ये तोहो (Toho), तोएई (Toei), फूजी (Fuji), कडोकावा (Kadokawa), निक्कात्सू (Nikkatsu) अशा निर्मात्यांचा समावेश आहे. या १३ निर्मात्यांनी ३ आरोपींकडून ३.९ मिलियन डॉलर्स म्हणजेच ३० कोटी २८ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी आहे युट्युबवर अपलोड होणारे आणि तरुणाईत वेगाने लोकप्रिय होत असलेले ‘फास्ट मूव्हीज’
गेल्या आठवड्यात म्हणजेच १९ मे रोजी निर्मात्यांनी न्यायालयात दाद मागितली, पण त्यापूर्वीच म्हणजे २०२१ मध्येच संबंधित तीन आरोपीना अटक झालेली आहे. या तीन व्यक्ती प्रथम गाजलेले जपानी चित्रपट अवैधरित्या डाउनलोड करून नंतर ते संकलित करत होते आणि त्या चित्रपटाची १० ते १२ मिनिटांची आवृत्ती (चित्रपटाचं सार) युट्युबवर अपलोड करत होते. (youtube piracy and Japanese Producers)
या १०-१२ मिनिटात निवेदनातून चित्रपटाची पूर्ण कथाही समजत होती. ‘फास्ट मूव्हीज’ मध्ये शिन गॉडझिला (Shin Godzilla), आय एम अ हिरो (I am a hero) अशा चित्रपटांचा समावेश होता. एकूण ५४ चित्रपट अशाप्रकारे संकलित करून अपलोड करण्यात आले.
सुरुवातीला या प्रकाराकडे निर्मात्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्यातला धोका त्यांच्या लक्षात यायला लागला. व्हिडिओचा कालावधी जरी १०-१२ मिनिटं एवढाच असला, तरी कथा, क्लायमॅक्स याबद्दलची उत्सुकताच निघून जाते. ज्यांना फार वेळ स्वस्थ बसवत नाही अशांसाठी तर ही मोठीच सोय झाली होती. कोविड काळात हे व्हिडीओज लोकप्रिय व्हायला लागले.
जून २०२१ पर्यंत युट्युबवर या ‘फास्ट मूव्हीज’ना ४८० मिलियन व्ह्यूज मिळाले होते. याप्रकरणी ३ व्यक्तींना अटकही झाली आणि मग निर्मात्यांनी या सगळ्या प्रकारात आपलं किती नुकसान झालं याची आकडेमोड सुरु केली. एका व्ह्यू मागे २०० येन म्हणजेच १२२ रुपये इतकं नुकसान झालं असा हिशोब करण्यात आला आणि त्यानंतरच नुकसानभरपाईचा दावा करण्याचं निश्चित करण्यात आलं. (youtube piracy and Japanese Producers)
‘फास्ट मूव्हीज’ सारख्या प्रकारांमुळे चित्रपटगृहात जाणाऱ्या प्रेक्षकसंख्येवरही परिणाम होतो. तसंच चित्रपट OTT माध्यमावर आल्यावरही अपेक्षित व्ह्यूज आणि अपेक्षित कमाई होत नाही. १० मिनिटात चित्रपट बघणं हे बऱ्याच प्रेक्षकांसाठी अधिक सोयीचं असतं म्हणून मग ते पारंपरिक माध्यमांकडे पाठ फिरवतात.
जपानमध्येही अमेरिकेसारखेच पायरसीला पायबंद घालण्यासाठी कडक कायदे आहेत. पण जपानमध्ये बऱ्याचदा निर्माते अशाप्रकारे कारवाई करण्यासाठी उदासीन असतात, असं दिसून आल्यामुळेच असे ‘फास्ट मूव्हीज’ बिनधास्तपणे अपलोड होऊ लागले.
अटक झालेल्या तीन आरोपींनीही न्यायालयात कबूल केलं की, पायरसीकडे जे सामान्यतः दुर्लक्ष करतात अशाच निर्मात्यांचे चित्रपट आम्ही ‘फास्ट मूव्ही’ स्वरूपात बनवले आणि अपलोड केले. यासाठी त्यांनी युट्युबवर वेगवेगळे चॅनल्सही तयार केले होते. (youtube piracy and Japanese Producers)
पायरसीचा असा धोका वाढल्यावर आता मात्र जपानी निर्मात्यांनी ठरवलं आहे की, ज्यांच्याकडे हक्क नाहीत त्यांना आपल्या कलाकृतींचा फायदा मिळवून द्यायचा नाही. आत्ता जर कारवाई झाली तरच भविष्यात असे प्रकार रोखले जातील म्हणूनच स्वतंत्रपणे नाही, तर एकत्र येऊन त्यांनी न्यायालयाकडे कारवाईची मागणी केली आहे. यापुढेही कोणत्याही स्वरूपात होणाऱ्या पायरसीविरोधात लढण्यासाठी आमी सजग राहू, असंही या निर्मात्यांकडून सांगण्यात आलं आहे. (youtube piracy and Japanese Producers)
‘फास्ट मूव्हीज’ हिंदीतही!
जपानमधील ‘फास्ट मूव्हीज’ हे जगभरातील इतर भाषांमध्येही उपलब्ध आहेत. ‘शिन गॉडझिला’ आणि ‘आय एम अ हिरो’ अशा चित्रपटांच्या हिंदी भाषेतील मिनी आवृत्ती युट्युबवर उपलब्ध आहे. हे भाषांतरित व्हिडीओज नेमके कुठे तयार करण्यात आले, याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण याचा मोठा फटका संबंधित चित्रपटांना जागतिक मार्केटमध्ये बसू शकतो.
=========
हे देखील वाचा – मराठी चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये एवढी अनास्था का आहे?
सावधान! सेलिब्रिटींचे ‘रीललाईफ’ कंटाळवाणे होते आहे…
==========
कॉपीराईटचे कायदे कडक असले तरी त्यातूनही पळवाटा काढून कमाई करणारे खूप असतात. अशा चौर्यबहाद्दरांना धडा शिकवण्यासाठी निर्मात्यांनी सतत सजग राहणं आता गरजेचं आहे. जपानमधील निर्मात्यांकडून म्हणूनच एकजुटीचा हा धडा घेण्यासारखा आहे.
===========
हे ही वाचा: मालिकाविश्वात अभिजितच्या लेखणीचे राज्य
श्वास – आयुष्य जगायचं तर डोळे मिटावेच लागणार!
===========
.