गाडीच्या टपावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या आवाजातून सुचले हे गाणे!
एकही पैसा न घेता जावेद अख्तर यांनी सिनेमाची गाणी लिहिली!
जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी गीतकार म्हणून १९८१ सालच्या यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला‘ या चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू केली. खरंतर सत्तरच्या दशकातील ते चोटीचे स्क्रीन प्ले आणि डायलॉग रायटर होते. (सलीम- जावेद) पण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला सलीम जावेद या दोघांमध्ये विसंवाद सुरू झाला आणि दोघांनी आपापले मार्ग वेगळे आखले. जावेद अख्तर यांनी ‘सिलसिला’ या चित्रपटाची गाणी लिहीण्यासाठी त्या काळातील इतर गीतकारांच्या मानाने पहिल्याच चित्रपटासाठी त्यांनी मोठी रक्कम यश चोप्रा यांच्याकडे मागितली होती आणि त्यांना ती मिळाली देखील.
सिने इंडस्ट्रीमध्ये ही मोठी ब्रेकिंग न्यूज होती त्या काळातली! पहिलाच सिनेमा गीतकार म्हणून आणि इतके मानधन! पण तुम्हाला माहिती आहे का त्या नंतरच्या दुसऱ्याच एका चित्रपटासाठी जावेद अख्तर यांनी अक्षरशः एक पैसाही न घेता एका चित्रपटाची गाणी लिहिली होती? असं काय घडलं होतं की जावेद यांनी फुकटात गाणी लिहून दिली? कोणता होता तो चित्रपट आणि काय होतं नेमका किस्सा?
‘सिलसिला’ या चित्रपटात यश चोप्रा यांचा चौथ्या नंबरचा एक सहायक होता त्याचे नाव होते रमण कुमार. (याच रमण कुमार यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात काही दूरदर्शन मालिका बनवल्या होत्या!) जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि रमण कुमार हे दोघेही इप्टाच्या काळापासूनचे मित्र होते. रमण कुमार त्यावेळी एक चित्रपट दिग्दर्शित करीत होते. या चित्रपटातील गाणी जावेद यांनी लिहावे असे त्यांना वाटत होते. पण जावेद यांच्या ‘सिलसिला’चे घसघशीत मानधन पाहून ते त्यांना विचारायला कचरत होते.
परंतु एकदा हिम्मत करून एकदा त्यांनी विचारलेल. ते म्हणाले, ”जावेद भाई, चोप्रा बडे लोग है. वो आपको मुंह मांगी रकम दे सकते है. पर मेरी बात अलग है. मी एक चित्रपट दिग्दर्शक करत आहे. हा आमचा पहिलाच चित्रपट आहे. बजेट अतिशय कमी आहे. या चित्रपटासाठी तुम्ही गाणी लिहावीत असं मला वाटतं. परंतु मला हे माहित नाही या गाण्यासाठी मी तुम्हाला किती पैसे देईल? पैसे देवू शकेल की नाही हे पण मी सांगू शकत नाही. कारण सिनेमाचे बजेटच अतिशय कमी आहे. कदाचित मी तुम्हाला एक पैसा देखील देऊ शकणार नाही!” जावेद अख्तर (Javed Akhtar) त्यांच्याकडे पाहतच राहिले. रमण कुमार यांच्या डोळ्यातील आर्तता ,खिन्नता त्यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, ”काही काळजी करू नकोस. मी तुझ्या चित्रपटासाठी नक्की गाणी लिहितो.“ रमण कुमार खूप खूश झाले.
हा चित्रपट होता ‘साथ साथ’. दीप्ती नवल, फारूख शेख यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची निर्मिती दिलीप धवन यांनी केली होती. तर चित्रपटाला संगीत कुलवंत सिंग यांचे होते. त्यांचाही हा पहिलाच सिनेमा होता. रमण कुमार आणि कुलवंत सिंग क्लासमेट होते. आता गाणी लिहिण्यासाठी जावेद अख्तर (Javed Akhtar) एकही पैसा घेणार नव्हते म्हणून त्यांना फारसं प्रेशर देखील करता येत नव्हतं. कुलवंत सिंग रोज त्यांच्याकडे जाऊन बसत होते आणि हळूहळू त्यांचा मूड पाहून त्यांच्याकडून गाणी लिहून घेत होते. सिनेमाची प्रगती धीम्या गतीने होत होती त्यामुळे निर्मात्याचे प्रेशर वाढत होते. आता फक्त एक गाणं राहिलं होतं आणि ते महत्त्वाचं गाणं होतं. जावेद अख्तरकडे रोज संध्याकाळी ते जाऊन बसायचे. सोबत रमण कुमार देखील असायचे.
जावेद त्या काळात भरपूर ड्रिंक्स घेत असंत. रोज रात्री ड्रिंक घेत ते गाण्याचा विचार करायचे पण गाणं काही लिहून होत नव्हतं. शेवटी एक दिवस कुलवंत सिंग यांना निर्मात्याने सांगितले, ”आज कुठल्याही परिस्थितीत गाणे हवेच.” हे दोघे संध्याकाळपासूनच जावेदच्या (Javed Akhtar) घरी बसून होते. जावेद यांचे मदिरापान चालूच होते. दोघांना आता काळजी वाटत होती. कारण सेट लागला होता. गाणं मिळणं गरजेचे होते. रात्रीचे साडेबारा वाजले. त्यांची शेवटची लोकल रात्री दीड वाजता होती. ते डोळ्यात प्राण आणून जावेदला विनंती करत होते.
========
हे देखील वाचा : यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
========
आज कुठल्या परिस्थितीत मला गाणे लिहून द्या हे निर्मात्याचे शब्द आठवत होते. पण आज सर्वांचे नशीब जोरावर होते. जावेद अख्तर यांनी लगेच कागद पेन घेतला सिच्युएशन पुन्हा समजावून घेतली आणि पुढच्या नऊ मिनिटात त्यांनी गाणे लिहून त्यांच्या हातात ठेवले. ते गाणे होते, तुमको देखा तो ये खयाल आया जिंदगी धूप तुम घना सया…’ गाणं मिळाल्यावर दोघे खुशी खुशीत रात्री दीडच्या लोकलने घरी गेले. खरी कमाल जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची होती. चिक्कार मद्यपान झाल्यावर अवघ्या नऊ मिनिटात त्यांनी हे लाजवाब गाणे लिहिले. ‘साथ साथ’ चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय सुंदर झाली ही सर्व गाणी जगजितसिंग आणि चित्रासिंग यांनी गायलेली होती.