..आणि जया भादुरीने तिथल्या तिथे सुपरस्टार राजेश खन्नाला प्रत्युत्तर दिले!
सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर गौतम चिंतामणी यांनी लिहिलेल्या ‘DARK STAR :THE LONELINESS OF BEING RAJESH KHANNA’ या पुस्तकात अनेक मनोरंजक किस्से वाचायला मिळतात. राजेश खन्ना यांच्यासाठी १९६९ ते १९७४ हे पाच वर्ष म्हणजे सुपरस्टार पदाचा परमावधी होता. ‘उपर आका और नीचे काका’ असे त्या वेळेला म्हटले जायचे. राजेश खन्नाचे नखरे, त्याचे खुशमस्करे याची त्या काळातील फिल्मी मॅगझिन्समधून भरपूर चर्चा होत असे. (Jaya bhaduri)
ज्येष्ठ सिने पत्रकार अली पीटर जॉन यांनी ‘बावर्ची’ या चित्रपटाबद्दल आणि त्या दरम्यान घडलेल्या एका घटनेबाबत त्या काळातील मॅगझिन्समध्ये लिहिले होते. तोच संदर्भ घेवून लेखकाने यावर विस्ताराने या पुस्तकात लिहिले आहे. राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा कालावधी चालू असताना ऋषिकेश मुखर्जी यांनी तीन चित्रपटांसाठी त्याला साइन केलं होतं.
पहिला होता ‘आनंद’ दुसरा ‘बावर्ची’ आणि तिसरा ‘नमक हराम’. ‘आनंद’ आणि ‘बावर्ची’ या चित्रपटात तर त्याला हीरोइन देखील नव्हती. ‘बावर्ची’ सिनेमात तर तो संपूर्ण सिनेमात खाकी कपडे आणि टोपी घालून वावरणार होता. सुपरस्टार पदाचा ग्लॅमरसनेस संपूर्ण बाजूला ठेवून राजेश खन्नाने या चित्रपटात भूमिका केली होती. अभिनेत्री जया भादुरी (Jaya bhaduri) सोबतचा त्याचा हा एकमेव चित्रपट. पण या चित्रपटात देखील जया भादुरी त्याच्यासोबत नायिका म्हणून नव्हती.
‘बावर्ची’ या चित्रपटाकरीता अमिताभ बच्चन यांचे नाव देखील जोडले गेले आहे. अमिताभने या चित्रपटात सुरुवातीला नॅरेटरची भूमिका केली आहे. चित्रपटाचे कथानक पात्रांची ओळख आणि त्यातून दिला जाणारा संदेश अमिताभने आपल्या आवाजातून दिला होता. हिंदी सिनेमात हा अभिनव प्रयोग होता. याच काळात अमिताभ आणि जया भादुरी (Jaya bhaduri) यांच्यात प्रेमाचे संबंध सुरू झाले होते. अमिताभ बच्चन यांच्या नावावर तोवर एकही हिट सिनेमा नव्हता. जया भादुरीच्या नावावर मात्र ‘गुड्डी’सारखा यशस्वी सिनेमा होता. ‘बावर्ची’ या सिनेमाच्या सेटवर अमिताभ जया भादुरीला भेटण्यासाठी येत असे. राजेश खन्नाला हे फारसं आवडत नसे. तो कायम त्याच्या खुश-मस्कारांमध्ये बसलेला असायचा आणि अमिताभला ऐकू जातील असे टोमणे मारायचा.
अमिताभने सुरुवातीला दुर्लक्ष केले. एकदा तर हद्द झाली त्याने अमिताभला उद्देशून “आ गये मनहूस” हा शब्द वापरला. जया भादुरी तो शब्द ऐकून रागाने लाल झाली आणि तिने तिथल्या तिथे राजेश खन्ना खडेबोल सुनावले आणि सर्वांच्या समोर ती राजेश खन्नाला म्हणाली, ”तुला काही ही अधिकार नाही दुसऱ्याबद्दल असे शब्द वापरण्याचा. हे शब्द वापरून तू तुझी लायकी सिद्ध करतो आहेस आणि लक्षात ठेव एक दिवस असा येईल त्या दिवशी तुझ्या लक्षात येईल तू कुठे आहेस आणि अमिताभ कुठे आहे!” जया भादुरीने (Jaya bhaduri) रागाच्या भरात उच्चारलेली ही भविष्यवाणी पुढे तीन चार वर्षातच खरी ठरली. अर्थात राजेश खन्नाने देखील ते फार गांभीर्याने घेतले नाही. तो सॉरी म्हणाला. पण यानंतर अमिताभचा त्याने कधी अपमान देखील केला नाही. अमिताभ आणि राजेश खन्नाला घेऊन नंतर ऋषिकेश मुखर्जी यांनी नमक हराम हा चित्रपट दिग्दर्शित केला!
बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हा यांची कथा असलेला हा ‘बावर्ची’ चित्रपट मूलतः Galpo Holeo Satti या बंगाली चित्रपटाचा रिमेक होता. हा बंगाली चित्रपट तपन सिन्हा यांनी दिग्दर्शित केला होता. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘बावर्ची’ या चित्रपटात राजेश खन्ना, जया भादुरी (Jaya bhaduri), असरानी, हरिंद्रनाथ चटोपाध्याय, उषाकिरण, दुर्गा खोटे, पेंटल ए के हंगल यांच्या भूमिका होत्या.
============
हे देखील वाचा : जेव्हा देव आनंद ‘मदर इंडिया’ चित्रपटाची तिकिटे ब्लॅक करतो!
============
कैफी आजमी यांनी लिहिलेल्या गाण्याला मदन मोहन यांचे संगीत होते’ यातील तुम बिन जीवन कैसा जीवन’ हे मन्नाडे यांनी गायलेले गाणं खूपच भाव मधुर होते. राजेश खन्नाने एका मुलाखतीत असे सांगितले होते, ”या चित्रपटात ऋषिदा यांनी मला तुझ्या मनाप्रमाणे ही भूमिका कर असा फ्रीडम दिला होता.” या चित्रपटाचे नॅरेशन अमिताभ बच्चन यांनी केले होते, असाच काहीसा प्रकार २००९ साली आलेल्या ‘पा’ या चित्रपटाच्या वेळी झाला होता. त्यात जया भादुरी (Jaya bhaduri) हिने अशा प्रकारचे नॅरेशन केले होते.