‘ज्वेल थीफ’ गोल्डी टच म्युझिकल रहस्यरंजकता
रहस्य म्हणजे चकमा. सतत संशय बदलत राहणे. सिनेमातलं रहस्य तर क्लायमॅक्सपर्यंत प्रेक्षकांच्या मनाशी खेळणारे हवे. त्यासाठी थीम चांगली हवीच, पटकथेत टर्न अॅण्ड ट्वीस्टची खेळी हवी. पूर्वीच्या रहस्यपटात तर श्रवणीय गीत संगीत व नृत्य यांची गुंफण केली जाई.
तेथे हवा विजय आनंदसारखा कसबी दिग्दर्शक. त्याची पटकथेवरची हुकमत आणि मांडणी या माध्यमात येत असलेल्यानी अभ्यास म्हणून पहावी. विजय आनंद अर्थात गोल्डी संकलकही होता आणि सेटवर असतानाही त्याला नेमके काय शूटिंग करतोय याचे भान असे. विशेषतः त्याच्या कारकीर्दीच्या पूर्वार्धात. (त्यानंतर त्याचा टच गेला, तो वेगळा विषय)
‘ज्वेल थीफ’ (रिलीज २७ ऑक्टोबर १९६७) च्या गोल्डीच्या सर्वोत्तम चित्रपटातील एक. त्याचे दर्जेदार टाॅप पाच चित्रपट सांगायचे तर, ‘गाईड’ (१९६५), ‘तिसरी मंझिल’ (१९६६), ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०), ‘तेरे मेरे सपने’ (१९७१) आणि अर्थात ‘ज्वेल थीफ’. यात दोन म्युझिकल रहस्यरंजक चित्रपट, एक मसाला मिक्स मनोरंजन, एक कलात्मक तर एक वेगळा सामाजिक चित्रपट आहे. एकच दिग्दर्शक इतकी भिन्नता देतो यातच त्याचे वेगळेपण आणि ताकद आहे आणि या पाचपैकी एकात शम्मी कपूर आहे, तर उर्वरित फिल्ममध्ये देवसाहेब! यावरुन या देवबंधूंच्या सकारात्मक केमिस्ट्रीची कल्पना यावी. गोल्डीने देव आनंदचा ‘देव आनंद’ न होणे व्यवस्थित हाताळले. (चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे अनेक स्तरांवर आहे) आणि त्यातीलच हा चित्रपट. हा शंभर टक्के दिग्दर्शकाचा चित्रपट!
हेही वाचा : आंतरराष्ट्रीय मिडियात मराठी चेहरा हवा(च)…
देव आनंदचा मुलगा सुनील आनंद आणि मीनाक्षी शेषाद्री या जोडीच्या ‘मै तेरे लिये’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंदचेच आहे, पण तोपर्यंत काळ बराच पुढे सरकला होता. या चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने खारच्या केतनव डबिंग थिएटरच्या वरच्या विजय आनंदच्या ऑफिसमधे त्याची लागोपाठ दोन दिवस दीर्घ मुलाखतीचा आलेला योग माझ्यासाठी ‘यादगार पल’ आहे. कारण माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक गोल्डी आहे. त्या काळात अतिशय सविस्तर मुलाखती होत. गप्पांच्या ओघात अनेक गोष्टी समजत.
‘ज्वेल थीफ’ची थीम अशी, अर्जुनसिंग (अशोककुमार) चे सगळे साथीदार विनयला (देव आनंद) सांगतात, तू अमर आहेस. त्यात शालिनी शालू सिंगही (वैजयंतीमाला) सामिल असते आणि या सगळ्यातून एक रहस्य विणले जात असते. चित्रपटात अशा काही घडामोडी घडतात की, हाच अमर खरा ज्वेल थीफ कोण आहे हे पकडून देतो. चित्रपटात लहान मोठ्या भूमिकेत अनेक कलाकार आहेत. तनुजा, हेलन, फरयाल, अंजू महेंद्रू, नासिर हुसेन, सप्रू आणि तेव्हा बालकलाकार असलेला सचिन पिळगावकर.
गीत संगीत व नृत्य हे तर नवकेतन फिल्म, दिग्दर्शक विजय आनंद आणि नायक देव आनंद यांचे वैशिष्ट्य. म्हणूनच तर त्यांचे अनेक चित्रपट रसिकांच्या किमान तीन पिढ्या ओलांडूनही आजही हिट आहेत. या चित्रपटातील एक गाणे (रुला के गया सपना मेरा) शैलेंद्रनी लिहिले आहे तर उर्वरित गाणी मजरुह सुल्तानपुरी यांची असून संगीत सचिन देव बर्मनचे आहे. यह दिल ना होता बेचारा, आसमाॅ के नीचे, दिल पुकारे आ रे आ रे, बैठे है क्या उसके पास, रात अकेली है ही गाणी लोकप्रिय आहेत. तर ‘होठो पो ऐसी बात जो जुबा पे चली आई’ चित्रपटात हायपाॅईंट ठरले. या गाण्यात देव आनंद गळ्यात ढोलक घालून नाचला आहे. सिक्कीमी पोशाख त्याला छान शोभलाय. कुर्ता, लांब पायजमा, त्याच्यावर कोट, गोल उंच टोपी, पायात बूट… एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर तो आला असेलच. वैजयंतीमाला तर कायमच उत्तम डेस सेन्ससाठी ओळखली गेली. तिनेही लाल रंगाचा लेहेंगा, त्यावर घंटा, वर काळा ब्लाऊज ती नेहमीप्रमाणेच झक्कास नाचलीय. विजय आनंदच्या दिग्दर्शनातील गाणी कायमच कौतुकाचा विषय. होठों पे ऐसी बात… चित्रपटाच्या क्लायमॅक्सला आहे, पण वैजयंतीमालाच्या नृत्यासमोर देव आनंद पूर्णपणे झाकला जाण्याचा अथवा त्याचे अस्तित्व न जाणवण्याचा धोका होता. ते लक्षात घेऊनच गोल्डीने देव आनंदची वेशभूषा रचली आणि त्यात त्याला यश आलं हे खुद्द गोल्डीकडून त्या भेटीत समजले.
‘ज्वेल थीफ’चे बरेचसे शूटिंग सिक्कीमला झाले. त्या काळात भारत चीन संघर्ष वाढला होता. सीमेवर संरक्षणासाठी भरपूर सैनिक होते. आणि जनरल सगतसिंग यांनी खास देव आनंदसाठी त्यांच्या मेसमध्ये पार्टी दिली तेव्हाची देव आनंदची उपस्थिती सैनिकांना सुखावणारी होती. आणि देवही सहजतेने त्यांच्यात मिसळला, नाचला. विशेष म्हणजे देवने ‘प्रेम पुजारी’ ( १९७०) चित्रपट दिग्दर्शनात उतरताना या सगळ्या पार्श्वभूमीवर कथानक रचले.
हे वाचलेत का ? शाहरुख खान : एक अभिनेता, एक प्राॅडक्ट
‘ज्वेल थीफ’ हा पूर्णपणे विजय आनंदचा प्रभाव असलेला चित्रपट. फर्स्ट रनला त्यावरच चित्रपट हिट ठरला. त्यानंतर सत्तरच्या दशकात रिपीट रनला, मॅटीनी शोला तो पुन्हा पुन्हा रिलीज होत राहिला तेव्हा देव आनंद (तेव्हा तो मॅटीनी आयडाॅल म्हणून ओळखला जात होता) आणि सुपर हिट म्युझिकसाठी पाहिला जाऊ लागला. त्या काळात रहस्यरंजक चित्रपटात संगीत जणू एक व्यक्तिरेखा असे. ‘ज्वेल थीफ’ची पटकथा आणि संवाद विजय आनंद आणि के. ए. नारायण यांची आहे. सामर्थ्य आहे मांडणीत म्हणतात त्याचा सकारात्मक प्रत्यय हा चित्रपट देतो. छायाचित्रण व्ही. बात्रा यांचे तर संकलन विजय यांचे आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट आणि ‘गाईड ‘साठी नायिका म्हणून देव आनंदची पहिली पसंती सायरा बानू होती. पण त्याच काळात तिचा दिलीपकुमारशी विवाह झाल्याने तिने नकार दिला. तत्पूर्वी, देव आनंद व सायरा बानू ‘प्यार मोहब्बत’ मध्ये एकत्र आले होते. सायरा बानच्या नकारानंतर वैजयंतीमाला आली.
‘ज्वेल थीफ’ची स्टोरी येथेच संपत नाही. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही या चित्रपटाचा विलक्षण प्रभाव होता आणि अशातच रणबीर पुष्पक आणि संजय निरुपम ( होय, तेच ते राजकीय नेते, फार पूर्वी सिनेपत्रकार होते) यांनाही या चित्रपटाने झपाटले होते आणि त्यातूनच त्याना भन्नाट कल्पना सुचली, या चित्रपटाचा पुढचा भाग लिहूया आणि नाव ठरले, ‘रिटर्न ऑफ ज्वेल थीफ’ ( १९९६). अशोक त्यागी दिग्दर्शित या चित्रपटाचे विशेष म्हणजे यात मूळ चित्रपटातील अशोककुमार आणि देव आनंद होतेच, त्यासह धर्मेंद्र, जॅकी श्राॅफ, शिल्पा शिरोडकर, प्रेम चोप्रा, सदाशिव अमरापूरकर अशी भली मोठी स्टार कास्ट होती. अंधेरी पश्चिमच्या आंबोलीतील फिल्मालय स्टुडिओत या चित्रपटासाठी अनेक दिवसांसाठी खूप मोठा सेट लागला असता मी एकदा जॅकी श्राॅफच्या तर एकदा शिल्पा शिरोडकरच्या मुलाखतीसाठी गेलो, एक बहुचर्चित चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपण भूमिका साकारतोय म्हणून दोघेही विलक्षण थ्रील झाले होते आणि ते स्वाभाविक होतेच.
पण या चित्रपटाचा मुहूर्त आपल्या हस्ते करण्यास विजय आनंदने नम्रपणे नकार दिला हीदेखील कुजबुज सेटबाहेर ऐकायला मिळाली.
‘ज्वेल थीफ’ची सर पुन्हा येणं शक्य नाही असे त्याला वाटले असावे आणि ते योग्यही आहे. आजही पुन्हा पुन्हा एकदा हा ‘जवाहरात का चोर’ पाहताना आपण गुंतून जातोच, ‘येथे दिग्दर्शक दिसतो’.