Jhund Movie Review: फुटबॉलच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन याची प्रमुख भूमिका असणारा झुंड हा चित्रपट प्रदर्शनाआधीपासूनच चर्चेत आहे. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त या चित्रपटाविषयी चर्चा होण्याचे मुख्य कारण म्हणजे फॅन्ड्री, सैराट सारखे सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
मुळातच स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट तुलनेने कमी बनतात. त्यातही लगान, दंगल, चक दे इंडिया सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट अगदीच अत्यल्प! झुंड देखील असाच वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे.
‘झुंड’ची कथा नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपटात विजय बरसे यांची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली आहे. झोपडपट्टीतील मुले, फुटबॉल आणि विजय बरसे या तीन गोष्टींभोवती हा चित्रपट फिरत राहतो.
चित्रपटाची कथा सुरु होते नागपूरमधील गड्डीगोदाम आणि तिथल्या झोपडपट्टीतील लोकांपासून. इथे चित्रपटाला खास नागराज मंजुळे टच प्रकर्षाने जाणवतो. गड्डीगोदाम येथील झोपडपट्टीतील राहणार्या लोकांचे, त्यांच्या आयुष्याचे आपल्याला अगदी जवळून अनुभवता येते. या झोपडपट्टीतील तरुण मुलांचं आयुष्यच वेगळं आहे.
शिक्षण, नोकरी, करिअर या शब्दांचा मागमूसही नसलेले हे तरुण चेन स्नॅचिंगपासून ते अवैध दारू विक्रीपर्यंत अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतलेले असतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन, जुगार खेळतात, छेडछाड, रस्त्यावर मारामारी करणे या गोष्टी या मुलांच्या दैनंदिन आयुष्याचा एक भाग असतात.
या मुलांच्या आयुष्यात प्रोफेसर विजय बरसे देवदूत बनून येतात. निवृत्तीनंतर विजय बरसे कॉलेजमध्ये मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतअसतात. पण जेव्हा त्यांना कॉलेजबाहेरच्या वस्तीतील मुलांबद्दल समजतं तेव्हा अंतर्मुख होऊन त्याचा विचार करू लागतात आणि या मुलांना योग्य रस्ता दाखवून त्यांचे आयुष्य बदलायचा निश्चय करतात. यानंतर सुरु होतो एक अनोखा प्रवास!
या मुलांना सुधारायचं तर त्यांच्या जवळ जायला हवं. यासाठी ते फुटबॉलचा मार्ग निवडतात आणि त्यांच्या आयुष्यात फुटबॉलचे प्रशिक्षक म्हणून प्रवेश करतात. या मुलांना केवळ चांगले फुटबॉल खेळाडू नाही तर, चांगली माणसं बनवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असते. या साऱ्यांमध्ये विजय बरसे यांना अनेक संकटाना तोंड द्यावं लागतं. ही संकटे, त्यावर त्यांनी केलेली मात, झोपडपट्टीतील मुलांना सुधारण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आणि मुलांमध्ये हळूहळू होत जाणारे बदल हा संपूर्ण प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. (Jhund Movie Review)
चित्रपटाच्या पूर्वाधातली फुटबॉल मॅच ‘लगान’ मधील क्रिकेट मॅच इतकीच रंजक झाली आहे. अर्थात कोचिंगचा प्रवास अजूनही रंजक दाखवता आला असता. काही प्रसंग चटकन उरकल्यासारखे वाटू शकतात. पण फुटबॉल मॅच मात्र सारं काही विसरायला लावते.
=====
हे देखील वाचा: मार्चमध्ये प्रदर्शित होणार ‘हे’ 4 बहुचर्चित चित्रपट!
=====
उत्तरार्धात चित्रपट काहीसा ट्रॅक सोडतोय की काय असं वाटत असतानाच पुन्हा पकड घेतो. उत्तरार्धातला कोर्ट रूम सिन तर निव्वळ अप्रतिम. अमिताभच्या सहजसुंदर अभिनयाने या सीनला विशेष लक्षवेधी बनवलं आहे. एअर पोर्ट चेकिंग सिनही भन्नाट जमून आला आहे.
झुंड मध्ये अमिताभ बच्चन सोबत गणेश देशमुख, सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू, किशोर कदम आदी मराठी कलाकार असून इतर सर्व ‘टीम’ मात्र नवखी आहे. तरीही चित्रपट पाहताना कुठेही ती नवखी आहेत हे जाणवत नाही. याचं कारण म्हणजे नागराज मंजुळे. हा माणूस कोणाकडूनही अभिनय करवून घेऊ शकतो.
नागराज मंजुळेच्या रूपाने चित्रपटसृष्टीला एक प्रतिभावंत दिग्दर्शक लाभला आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट मनोरंजन तर करतोच पण त्यामधून मिळणारा संदेश अंतर्मुख करतो. सत्यघटनेवर आधारित असणारा झुंड चित्रपटही प्रेक्षकांना समाजातील अनेक गोष्टींचा विचार करायला भाग पडतो.
=====
हे देखील वाचा: म्हणून झुंड चालायला हवा!
=====
चित्रपटाचं शूटिंग धारावीच्या झोपडपट्टीमध्ये करता येणं शक्य नसल्यामुळे नागपुरातच झोपडपट्टीचा सेट उभारण्यात आला. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटासाठी सलग ६० दिवसांच्या तारखा दिल्या होत्या. बाकी त्याच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? एका ‘स्माईल’ मधून बरंच काही सांगताना अमिताभ बच्चन विजय बरसे यांची भूमिका अक्षरशः जगले आहेत.
नागराज मंजुळे यांचं प्रभावी दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेइतकंच सशक्त काम कॅमेरामन सुधाकर रेड्डी यांनी केलं आहे. शिवाय जोडीला अजय -अतुल यांचं संगीत म्हणजे जणू पर्वणीच! चित्रपटाचं बॅकराउंड म्युझिक कमालीचं प्रभावी झालं आहे.
एकुणातच सशक्त कथा, अमिताभ बच्चन यांचा सहजसुंदर अभिनय, अजय-अतुल यांचं संगीत आणि खास नागराज मंजुळे टच मिळाल्यामुळे ‘झुंड’ची भट्टी एकदम मस्त जमून आली आहे. विशेष म्हणजे स्पोर्ट्स वर आधारित चित्रपट बनवताना आणि सामाजिक विषयाला स्पर्श करताना, मनोरंजनाशी अजिबात तडजोड होणार नाही याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. एक चांगली कलाकृती बघायची असेल, तर झुंड आवर्जून बघा.
चित्रपट: झुंड
दिग्दर्शक: नागराज मंजुळे
कलाकार: अमिताभ बच्चन, गणेश देशमुख, विकी कादियन, आकाश ठोसर, रिंकू राजगुरू
दर्जा: चार स्टार