ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
ऑपेरा हाऊस: एका हेरिटेज वास्तूचा प्रवास
साठच्या दशकात जन्माला आलेल्या माझ्या पिढीला हिंदी चित्रपट पाहायची आवड निर्माण झाल्याचे श्रेय राजेश खन्नाला जाते. त्याच्या चित्रपटांमधूनच चित्रपटगृहांची हळूहळू ओळख होत गेली. गोष्ट छोटी वाटते, पण खूपच बोलकी आहे.
राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ (१९६९) मुळे लहान वयात ऑपेरा हाऊस (Opera House) चित्रपटगृहात जायची पहिली संधी मिळाली. तेव्हा रेडिओ सिलोनवरील बिनाका गीतमालात “बिंदीया चमकेगी चूडी खनकेगी” गाणे ऐकताना ‘दो रास्ते’ चित्रपटाचं नाव कानावर येत होतं आणि राजेश खन्नाच्या क्रेझने एकूणच सामाजिक सांस्कृतिक वातावरण ढवळून निघालं होतं.
‘दो रास्ते’ ऑपेरा हाऊसच्या (Opera House) अगदी वरच्या बाल्कनीतून पाहायचा अगदी वेगळाच अनुभव घेतल्याचे आठवते. दोन बाल्कनी असलेले हे थिएटर अशी ऑपेरा हाऊसची पहिली ओळख होताना ही वरची बाल्कनी म्हणजे ‘स्टाॅलचा पब्लिक’ असे समीकरण आहे, हे हळूहळू माझ्या लक्षात आले.
वयात येता येता चित्रपटगृहाची हळूहळू ओळख होत जाणे हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. अशातच एक दोन वर्षांनी एका रात्री आम्हा तीन भाऊ आमच्या आजोबांसह (आम्ही त्यांना अण्णा म्हणत असू) ‘उपहार’ (१९७१) चित्रपट पाहायला गेलो तेव्हाची माझी आठवण अगदी वेगळी आणि भावूक आहे. आम्ही पोहचलो तेव्हा फक्त आणि फक्त बाॅक्सची तिकीटे शिल्लक होती आणि एक तिकीट तीन रुपये पंचवीस पैसे असे होते. एवढं महागडे तिकीट काढून चित्रपट पाहण्यापेक्षा आपण घरी जावं, असं मला मनोमन वाटत होतं. (एकावन्न वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे तिकीट महागडं तर होतंच शिवाय अनावश्यकही होतं.) पण आजोबांच्या मनात होतं, काही झालं तरी आपल्या नातवांना चित्रपट दाखवावा.
त्या बाॅक्समध्ये आम्ही चौघे चित्रपट पाहत होतो तरी माझे मध्यमवर्गीय मन मात्र आपण खूपच महागडे तिकीट काढलंय, ते न काढता पैसे वाचले असते याचा विचार करत होतं. आजच्या ग्लोबल युगात अशा पध्दतीने आजोबा आपल्या नातवाला घेऊन चित्रपट पाहायला जात असतील का, असा प्रश्न अधूनमधून माझ्या मनात येतो.
गिरगाव चौपाटीवर कुटुंबासह फिरायला येता जाता आणि घरचा दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी ऑपेरा हाऊसवरुन (Opera House) जाताना त्यावरचे लांबलचक डेकोरेशन लक्ष वेधून घेत असे. सरस्वतीचंद्र, उपकार, पूरब और पश्चिम, शोर, कोरा कागज इत्यादी चित्रपट त्या काळात इथे प्रदर्शित झाले. मग वयात येताना इथे आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, शोर, मौसम, देवता, सदमा असे काही चित्रपट पाहिले. पण वरच्या बाल्कनीपेक्षा अप्पर स्टाॅलचे तिकीट काढणे पसंत केले.
एकदा आम्ही काॅलेजच्या काही मित्रांनी येथे मॅटीनी शोला राखी गुलजारची भूमिका असलेला ’27 डाऊन ‘ हा चित्रपट पाहिला. इथे नियमितपणे मॅटीनी शो नसतो हे ही लक्षात आलं. पण सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे गावदेवीतील माझ्या भवन्स काॅलेजमध्ये जा ये करण्यात चार वर्षे सतत ऑपेरा हाऊसचे (Opera House) दर्शन घडल्याने तेथील बदलते चित्रपट सतत डोळ्यासमोर राहिले. अमर अकबर ॲन्थनी, बरसात की एक रात, सिलसिला, आलाप, खुबसूरत वगैरे वगैरे अनेक चित्रपट इथे प्रदर्शित झाले.
अमर अकबर ॲन्थनीने दणदणीत पन्नास आठवडे मुक्काम केला आणि मनमोहन देसाईंचा हा सर्वाधिक मनोरंजन करणारा चित्रपट असल्याने चार पाच वेळा पाहताना मनमोहन देसाई माझ्या आवडत्या दिग्दर्शकांतील एक झाले. ज्यांचा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचतो तो यशस्वी दिग्दर्शक अशी याच काळात मी व्याख्या निश्चित केली.
आलाप, नियत, तेरी मांग सितारो से भर दू अथवा मीरा वगळता अन्य चित्रपट म्हणजे येथे हमखास सिल्व्हर ज्युबिली असे घट्ट समीकरण होते. कौटुंबिक चित्रपटाचे हुकमी आणि सहकुटुंबपणे चित्रपट पाहायला जावं असं नातं, अशी ऑपेरा हाऊसची (Opera House) ओळख होती. मिडियात आल्यावर माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट ‘अबोध’ येथेच रिलीज झाला, पण रसिकांना आवडला नाही. अवघ्या चार आठवड्यात चित्रपटाने गाशा गुंडाळला.
माधुरी दीक्षितने रजनीकांत आणि जॅकी श्राॅफसोबत भूमिका साकारलेला ‘उत्तर दक्षिण’ हा चित्रपटही येथेच प्रदर्शित झाला आणि तोही फ्लाॅप झाला. तर, राजेश खन्ना आणि स्मिता पाटील यांची भूमिका असलेल्या ‘अमृत’ या चित्रपटाची आम्हा सिनेपत्रकाराना येथीलच ‘फस्ट डे फर्स्ट शो’ची तिकिटं दिल्याचं आठवतंय, तर सतिश कुलकर्णी निर्मित आणि सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘नवरी मिळे नवराला’ इथेच रिलीज झाला आणि अगदी झक्कास चार आठवडे उत्तम चालला.
एव्हाना हे ऑपेरा हाऊस नेमकं कधी सुरु झालं, इथे दोन बाल्कनी का, याबाबतचं माझं कुतूहल वाढलं होतं आणि एव्हाना मला ‘शोध पत्रकारीता’ हा शब्द माहिती झाला होता. (पुढे मी कायमच ‘शोध पत्रकारीता’ केल्याने माझ्याकडे खूप वेगळी माहिती असल्याचे मला आणि इतरांनाही लक्षात येत गेलं).
आपल्या देशात चित्रपटाचा पहिला खेळ ७ जुलै १८९६ साली झाला. म्हणजे त्याला आता सव्वाशे वर्षांचा कालावधी होऊन गेला आहे. फ्रान्सच्या ल्युमिए बंधुंनी मुंबईच्या वॅटसन हाॅटेलमध्ये ‘अरायव्हल ऑफ ट्रेन’ हा काही मिनिटांचा खेळ दाखवला. त्या काळात चित्रपट ही कला आपल्याकडे पूर्णपणे अपरिचित होती. पडद्यावर चालती फिरती चित्रे एवढेच माहित होते. त्यामुळे चित्रपटगृह ही संकल्पनाही नव्हती.
नाटक, जादूचे प्रयोग, वाद्यवृंद आणि संगीत नाटक यासाठी ‘थिएटर’ होतं. पण फक्त शनिवार व रविवारीच प्रयोग होत. ‘राॅयल ऑपेरा हाऊस’ हेदेखील मूळचे अतिशय देखणे आणि ऐतिहासिक वास्तूकलेचा उत्तम प्रत्यय देणारे असे नाट्यगृहच आणि तिथे हे सगळं होई. लंडनचा जसा ‘ऑपेरा’ आहे तसाच तो मुंबईत असावा अशा संकल्पनेतून १९११ साली त्याची उभारणी केली गेली.
पाचवा किंग जाॅर्जच्या हस्ते तेव्हा या वास्तूचे उदघाटन झालं होतं. दोन बाल्कनी असलेल्या या वास्तूच्या तळमजल्यावर म्हणजे स्टेजच्या अगदी समोरच्या आसनव्यवस्थेत दोघांच्या मध्ये थोडंसं अंतर राखलं होतं, तर दोन्ही बाजूला आणि मागे मिळून बाॅक्सची व्यवस्था केली गेली. काही बाॅक्समध्ये दोन, तर काही बाॅक्समध्ये चार अथवा सहा अशी सहकुटुंब आनंद घ्यावा अशी व्यवस्था. मुख्य वास्तूबाहेर असलेल्या प्रशस्त मोकळ्या जागेत त्या काळात उच्चभ्रू रसिक व्हीक्टोरियामधून (अथवा बग्गीमधून) ऐटीत येत.
एकदम साहेबी थाटाची वास्तू ही याची खासियत आजही कायम आहे, हे लक्षात आलं आणि ऑपेरा हाऊसकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन अधिकाधिक आदरयुक्त आणि अभिमानी होत गेला. त्याचे ऐतिहासिक मूल्य माझ्या लक्षात आलं. तो एक सांस्कृतिक वारसा आहे याचं महत्व पटलं.
अगदी पडद्यापुढचा भरजरी पडदाही वैशिष्ट्यपूर्ण आणि कधी एकदा तो वर जाऊन ‘मुख्य पडदा’ दिसतोय असं होई. बाहेरच एका बाजूला ऑपेरा हाऊस (Opera House) फाऊन्टन सोडा या नावाचे उपहारगृह होते. तेथील केक आणि खारी प्रसिद्ध होती, तरी ती कधीच माझ्या खिशाला परवडली नाहीत. त्यापेक्षा चित्रपट जवळचा राहिला. अशा या एकेकाळच्या नाट्यगृहात १९१२ साली अमेरिकन जादुगर रेमण्डस यांचा खेळ झाला होता.
फ्रेन्च पॅथे यांच्या मनोरंजन खेळांचे आयोजन झाले. ॲन्डरसन यांच्या नाटकाचे प्रयोग रंगले. इतकंच नव्हे तर, याच वास्तूत बालगंधर्व, मा. कृष्णराव, किर्लोस्कर, दीनानाथ मंगेशकर यांच्याही नाटकाचे प्रयोग रंगले. श्रीमती लता मंगेशकर यांनी आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम याच ऑपेरा हाऊसमध्ये साजरा केला.
पृथ्वीराज कपूर यांच्या ‘पठाण’ वगैरे नाटकाचे प्रयोग रंगले. त्या काळात वातानुकुलीत असा काही प्रकार नव्हता. कार्यक्रम रंगणे जास्त महत्वाचे होते. त्याची गोडी मोठी आणि महत्वाची होती. १९३० सालापासून येथे मूकपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आणि मग १९३५ सालापासून नियमितपणे हिंदी चित्रपट/बोलपट प्रदर्शित होऊ लागले.
मूळ दोन बाल्कनी कायम ठेवूनच हा प्रवास सुरु झाला आणि १९९३ सालापर्यंत तो सुरु होता. त्यानंतर ते काही कारणास्तव बंद झाले (वरची बाल्कनी कधी बंद झाली हे समजलेच नाही) आणि आता २०१६ साली पुन्हा एकदा सुरु झाले. आता ते वातानुकूलित आणि अतिशय देखणे आहे. आणि विशेष म्हणजे येथे ‘मामी’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी नाटकाचे प्रयोग होतात.
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या पूर्णतेचा इव्हेन्ट येथे छान रंगला. ऑपेरा हाऊस पुन्हा सुरु झाले तेव्हा एबीपी माझा चॅनेलसाठी अश्विन बापट, अरुण पुराणिक आणि मी प्रत्यक्ष ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये या वास्तूच्या गौरवाच्या एका विशेष एपिसोडचे शूटिंग केले होते. चंद्रमुखीच्या इव्हेंटचे आमंत्रण येताच निर्माता अक्षय बर्दापूरकर, प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांना मी त्या बहुचर्चित शोचा व्हिडिओ पाठवला. हा एपिसोड २०१६ च्या दिवाळीच्या दिवशी प्रक्षेपित झाल्याने तेव्हा त्याला जबरा प्रतिसाद मिळाला होता. मूळ नाट्यगृह आता पुन्हा नाट्यगृह म्हणूनच कार्यरत आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणायचे.
शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी प्रामुख्याने शनिवार व रविवार अशा दोनच दिवशी नाटकाचे प्रयोग होत. त्यामुळे नाट्यगृहांची संख्यावाढ हा महत्वाचा घटक नव्हताच. अशातच विदेशातून मूकपट येऊ लागले. तेही वीस मिनिटे ते एक तासाचे असत आणि त्याचे खेळ अगदी तंबूतही होत.
तीस आणि चाळीसच्या दशकात दक्षिण मुंबईत कुलाबा परिसरात गॅरीसन, तर धोबीतलाव परिसरात सेंट झेवियर्स, वेलिंग्टन या नावाची एकाच वेळेस कधी इंग्रजी नाटक, तर कधी इंग्रजी चित्रपट प्रदर्शित करण्याची थिएटर होती. ती काळाच्या ओघात बंद पडली आहेत. त्यांची नोंदही फारशी सापडत नाही.
ऑपेरा हाऊस इंग्रजकालीन रचनेची आठवण देणारी देखणी वास्तू आहे. यात प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपटांची नावे सांगायची तर, बाबर, हमसफर, औरत, अनुराग, सदमा, इन्सान जाग उठा, आवाज, आखिर क्यू, हम दोनो (या नावाचा एक चित्रपट १९८५ सालीही आला. त्यात राजेश खन्ना आणि हेमा मालिनी या दोघांच्याही दुहेरी भूमिका आहेत.), आवाज, हम फरिश्ते नहीं असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. फार पूर्वी ज्वाला, संत तुळसीदास, मी तुळस तुझ्या अंगणी हे मराठी चित्रपट नियमित खेळाला, तर आई हा चित्रपट १९८१ साली मॅटीनी शोला रिलीज झाला.
========
हे देखील वाचा – राॅक्सी: आठवण मध्यंतरामधल्या २५ पैशांच्या वडापावची…
=======
कालांतराने थिएटर बंद ठेवल्यावर तिथे शूटिंग सुरु झाले. त्यात आठवणीतील म्हणजे, दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्यावर ‘वजूद ‘ची काही महत्वाची दृश्ये चित्रीत केली तेव्हा माझं सेटवर जाणं झालं होतं. हा माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. जिथे आपण लहानपणापासून चित्रपट पाहतोय तिथेच ‘चित्रपटाचं शूटिंग’ अनुभवतोय असा काहीसा वेगळा अनुभव होता. तेव्हा समजलं की, कधी काळी दिग्दर्शक एच. एस. रवैल यांनी ‘मेहबूब की मेहंदी’ (१९७२) मधील लीना चंदावरकरवरचे “जाने क्यू लोग मुहब्बत करते है”, या गाण्याचे इथेच रोज दुपारी दोन वाजेपर्यंत असे आठ दिवस शूटिंग केले. तीन वाजल्यानंतर ‘सिनेमाचे शो’ सुरु होत.
आज ऑपेरा हाऊसवरुन जाण्याचा योग आला की, गिरगावातील दिवस आठवतात, ऑपेरा हाऊसवरचे एका टोकापासून दुसरे टोक गाठणारे डेकोरेशन आठवते आणि वरची बाल्कनीही आठवते…. स्वतःचं वेगळं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व असलेलं असं ‘राॅयल ऑपेरा हाऊस’ म्हणजे चित्रपटगृहांच्या वाटचालीत ‘शान’ आहे.
1 Comment
Fàntastic