बॉडीगार्ड ते खलनायक – रामचंद्र राजू यांचा अनोखा प्रवास
रामचंद्र राजू कोण माहित आहे? 2018 पर्यंत रामचंद्र राजू हे नाव कोणालाही माहित नव्हते. त्यांना कोणीही ओळखत नव्हते. त्यांची ओळख होती ती फक्त केजीएफचा सुपर हिरो यशचा बॉडीगार्ड म्हणून! पण हेच रामचंद्र राजू आत्ता दाक्षिणात्य चित्रपट रसिकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.
केजीएफ चैप्टर 1 (K.G.F: Chapter 2) मध्ये रामचंद्र राजू, गरुडा या खलनायकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आले. अभिनेते यश यांचे बॉडीगार्ड असलेले राजू तोपर्यंत कधीही कॅमेरासमोर उभे राहिले नव्हते. मात्र एकदा संधी मिळाल्यावर त्यांनी त्या संधीचे सोने केले. एक बॉडीगार्ड ते यशस्वी सहकलाकार हा त्यांचा प्रवास जाणण्यासारखा आहे.
सध्या बॉलीवूड असो वा टॉलीवूड सर्वत्र एकाच चित्रपटाची प्रतीक्षा आहे, ती म्हणजे केजीएफ चैप्टर 2 (K.G.F: Chapter 2). यशच्या केजीएफच्या पहिल्या भागानं बॉक्सऑफीसवर सर्व रेकॉर्ड तोडले होते. आता केजीएफ चैप्टर 2, 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटाची क्रेझ एवढी आहे, की त्याचे काही आठवड्यांचे सर्व शो आधीच बुक झाले आहेत.
या चित्रपटात यशच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतले. पण त्यासोबतच चित्रपटाचा खलनायकही हिट ठरला. गरुडाच्या भूमिकेत असलेले रामचंद्र राजू हे दुसऱ्या भागातही दिसणार आहेत. वास्तविक पहिल्याच भागात गरुडाची भूमिका संपलेली आहे. मात्र काही फ्लॅशबॅक दृश्यातून पुन्हा गरुड म्हणजेच रामचंद्र राजू यांना दुसऱ्या भागातही पहाता येणार आहे.
वास्तविक रामचंद्र राजू हे यश यांचे बॉडीगार्ड होते. केजीएफ साठी यश यांना स्क्रीप्ट देण्यासाठी आलेल्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी राजू यांना पाहिल्याबरोबर गरुडाच्या भूमिकेसाठी विचारले. केजीएफचे दिग्दर्शक आणि लेखक प्रशांत नील यांना पहिल्याच नजरेत राजू गरुडासाठी फिट वाटले. त्यांनी यशना ही गोष्ट सांगितली. यश यांनीही त्याला होकार दिल्याने मग रामचंद्र राजू यांना गरुडासाठी साईन करण्यात आले.
अर्थात एवढ्या मोठ्या चित्रपटात ब्रेक मिळाल्यावर रामचंद्र यांना भरपूर मेहनत करावी लागली. प्रथम रामचंद्र यांनी रितसर गरुडाच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली. त्यात यशस्वी झाल्यावर त्यांनी अभिनेता बनण्यासाठी सर्व तयीरी सुरु केली.
राजचंद्र यांनी अभिनयाच्या कार्यशाळांना हजेरी लावली. एक वर्षभर जिममध्ये मेहनत घेतली. गरुडाच्या भूमिकेसाठी आवश्यक अशी शारीरिक तयारी झाल्यावर रामचंद्र पुन्हा दिग्दर्शक प्रशांत निल यांच्यासमोर उभे राहिले. त्यांच्यातला हा बदल बघून स्वतः यशही आर्श्चयचकीत झाले होते.
रामचंद्र यांचा ‘गरुडा’ सुपरहीट ठरला. त्याबरोबर त्यांच्याकडे दिग्दर्शकांची लाईन लागली. सुल्तान, जयम रवी, अर्जुन सारजा या चित्रपटात रामचंद्र राजू यांनी भूमिका मिळाल्या. सध्या काही तेलुगू चित्रपट सुद्धा त्यांच्याकडे आहेत.
आपल्या या सर्व बदलाचे श्रेय रामचंद्र, अभिनेते यश यांना देतात. यश यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला स्वतःची ओळख निर्माण करता आली असे रामचंद्र सांगतात. केजीएफ चैप्टर-1, 2018 मध्ये रिलीज झाला. बॉक्स ऑफीसवर 250 करोडचा आकडा पार करणारा हा पहिलाच कन्नड चित्रपट ठरला. शिवाय पाकिस्तानमध्येही दाखवण्यात आलेला हा पहिला कन्नड चित्रपट होता.
आता केजीएफ चैप्टर-2 (K.G.F: Chapter 2) ची यशचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. यशचा रॉकीभाई, संजय दत्तचा अधीरा आणि रविना टंडनने केलेली रमिका सेनची भूमिका बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यासोबत रामचंद्र राजू यांच्या गरुडाचीही क्रेझ आहे.