दिलीप कुमार दिग्दर्शित “कलिंगा” पाह्यला मिळणार….
जुन्या चित्रपटांवर बेहद्द प्रेम करणाऱ्या अनेक चित्रपट रसिकांची एक अनेक वर्षांची तीव्र इच्छा पूर्ण होतेय, दिलीप कुमार दिग्दर्शित “कलिंगा” (kalinga) पाह्यचा योग येणार आहे….
कसा, केव्हा या गोष्टी एकेक करत सांगतो, आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मिडियातही अभिनय सम्राट, अभिनयाचे विद्यापीठ म्हणून सन्मान होत असलेल्या दिलीप कुमारच्या चित्रपट, त्यातील संवादफेक, त्यातील गाणी, त्या चित्रपटाच्या निर्मितीतील किस्से, कथा, गोष्टी, दंतकथा यांना भरपूर लाईक्स मिळताहेत. भरपूर फाॅलोअर्स आहेत.
याच दिलीप कुमारने बरेच उशीरा चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले. अगदी नेमकं सांगायचे तर, २० एप्रिल १९९१ हा तो दिवस. जुहूच्या समुद्रालगतच्या एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये सुधाकर बोकाडे निर्मित व दिलीप कुमार दिग्दर्शित “कलिंगा” या चित्रपटाचा भव्य दिव्य दिमाखदार मुहूर्त असल्याचे आमंत्रण हाती येताच माझ्यासाठी हे अतिशय वेगळेच असे शूटिंग रिपोर्टींग होते. मला आठवतय, त्या हाॅटेलच्या स्वीमिंग पूलावर “कलिंगा”च्या (kalinga) मुहूर्त दृश्यासाठी भला मोठा देखणा सेट लावला होता आणि तो परिसर व त्यालाच लागून असलेला भला मोठा बॅन्क्वेक्ट हाॅल असा हा सुधाकर बोकाडेच्या निर्माता म्हणून असलेला दबदबा आणि दिलीप कुमारची चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठा व लौकिक याना साजेसा एकूण माहौल होता.
मी एक सिनेपत्रकार म्हणून त्या काळात फिल्मी पार्ट्यातून मोठ्याच प्रमाणावर संचार करीत असताना सभोवार नजर टाकून कोण कोण फिल्मवाले आहेत हे जाणून घेत असे. या पार्टीचे विशेष म्हणजे, दिलीप कुमारने आपल्या या पहिल्याच दिग्दर्शनातील मुहूर्ताला आपल्यासोबत आतापर्यंत काम केलेल्या अशा कामिनी कौशलपासून मुकरीपर्यंत अनेकांना आवर्जून आठवणीने आमंत्रित केलेले दिसले (ही एक अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्या नावाची वाचनीय चौकट झाली).
संगीतकार नौशाद यांनी मुहूर्त क्लॅप दिल्यावर दिलीपकुमार , सनी देओल व मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर जोरदार संवादफेकीचे मुहूर्त दृश्य चित्रीत होतेय न होतेय तोच आम्ही उपस्थितांनी मनापासून भरपूर टाळ्या वाजवत या गोष्टीचे स्वागत केले. दिलीप कुमार चित्रपट दिग्दर्शनात उतरल्याचे कौतुक केले. “कलिंगा” (kalinga) चित्रपटातील राज बब्बर, शिल्पा शिरोडकर इत्यादी कलाकारही आता फोटोत आले.
भव्य दिमाखदार मुहूर्त म्हणजे उंची खाना पिना आणि देर रात पार्टी ही अगदी काॅमन गोष्ट. या सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट, स्वतः दिलीप कुमार आपला मेकअप उतरवून आपल्या नेहमीच्या रुबाबात (साहेबी थाटात) संपूर्ण पार्टीभर फिरले. आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून भेटले आणि पार्टीतील जवळपास सगळ्यानाच वेलकम करत करत शुभेच्छा स्वीकारल्या. माझ्यासाठी सिनेपत्रकार म्हणून चौफेर वाटचालीतील हा हायपाॅईंट ठरावा. भाग्य भाग्य म्हणतात ते यापेक्षा वेगळे काही नसते. ते मी मिडियात असल्यानेच साध्य झाले. सायरा बानूही विशेष आनंदात होत्या.
दिलीप कुमार दिग्दर्शनात ही एक प्रकारची ब्रेकिंग न्यूज. चित्रपट साप्ताहिकासाठी जणू कव्हर स्टोरी. बरेच दिवस चित्रपटसृष्टी, मिडिया व चित्रपट रसिकांत “कलिंगा”चीच रंगतदार चर्चा…. बरेच दिवस झाले, महिने झाले, “कलिंगा” (kalinga) निर्मितीवस्थेत आहे, दिलीप कुमार आपल्या अतिशय छोट्या छोट्या तपशील, बारकावे यासह अतिशय सावकाशीने या चित्रपटावर काम करताहेत असा एक सर्वसाधारण समज. पण ते किती काळ? साधारण तीन वर्षांत तरी “कलिंगा” पूर्ण होवून पडद्यावर यायला हवा. फार पूर्वी एकाद्या महान चित्रपट कलाकृतीच्या निर्मितीत वेळ व पैसा यावर मर्यादा नसे. ते कोणी मोजत नसे. “पिक्चर दिलसे बननी चाहिए” असा एकच अलिखित नियम (उसूल) असे.
तरी काय झालं, पाच सहा वर्षांत “कलिंगा” पडद्यावर येवू नये? बजेट वाढत वाढत चाललयं. (भले निर्माता आर्थिकदृष्ट्या फार तगडा असेल आणि दिलीप कुमारला दिग्दर्शक म्हणून संधी देण्याचे आपले स्वप्न पूर्ण करीत असेल. तरी “भल्या मोठ्या स्वप्नाची ही गोची?”). राज किरणची मानसिक स्थिती ठीक नसल्यानेच “कलिंगा” रखडला असे एक कारण चर्चेत आले ( की आणले?).
हळूहळू “पिक्चर” स्पष्ट होत गेले, “कलिंगा” (kalinga) पडद्यावर येत नाही. काही कोटी रुपयांवर पाणी पडणार. आतापर्यंत दिलीप कुमार अन्य चित्रपटात भूमिका साकारत असताना दिग्दर्शकाच्या कामात ढवळाढवळ करतो यावर केवढे तरी रंगवून खुलवून मसालेदार मनोरंजक पध्दतीने सांगितले वा लिहिले जात होते ( “बैराग“च्या वेळेस दिग्दर्शक असित सेन यांच्या कामात केलेला हस्तक्षेप केवढा तरी गाजला.) आता दिलीप कुमारचेच दिग्दर्शन “पडद्याआड” जात होते. दुर्दैव दुसरं काय?
========
हे देखील वाचा : काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”
========
आता याच गोष्टीला यु टर्न मिळतोय, आता “कलिंगा”च्या निर्मात्या संगीता अहिर या चित्रपटावर काही तांत्रिक सोपस्कार करुन तो चक्क चित्रपट डिजिटल मिडियावर प्रदर्शित करीत आहेत असे वृत्त आहे. याबाबत त्यांनी सायरा बानू यांच्याशी चर्चाही केली आहे. संगीता अहिर यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित “प्रहार” इत्यादी चित्रपटांची निर्मिती केलीय.
आपल्यासाठी कुतूहल म्हणजे, चित्रपटाचा चित्रीत होवू न शकलेल्या भागावर कसा मार्ग काढणार? त्यासाठी पटकथा व संकलन यांचे कौशल्य कसे दाखवणार? आणि कोण? काही असो, बर्याच उशिराने का होईना, दिलीप कुमारच्या दिग्दर्शनातील चित्रपट पाह्यचा योग येतोय हे सुख काय कमी आहे काय? तांत्रिक प्रगती आणि सकारात्मक दृष्टिकोन यातूनच हे साध्य होत आहे. काहीना काही कारणास्तव कायमचे “डबाबंद” झालेले चित्रपट अगणित आहेत, त्यातून “कलिंगा”ची (kalinga) सुटका करण्यात येतेय, चित्रपट रसिकांना आणखीन काय हवेय?