‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

जेव्हा Kalyanji–Anandji यांच्या पहिल्याच गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले!
प्रत्येक कलाकाराला आपल्या पहिल्या कलाकृतीचे खूप कौतुक असते आणि का नसावे? कारण याच पहिल्या अनुभवातून तो पुढे मोठा झालेला असतो. त्यामुळे चित्रकाराला त्याचे पहिले चित्र गीतकाराला त्याचे पहिले गाणं आणि संगीतकाराला त्याने दिलेलं पहिलं संगीत हे नेहमीच आठवणीत रहात असते. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्यासाठी देखील त्यांचं पहिले गाणं हे त्यांच्यासाठी एक हळवी आठवण होती. खरंतर संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांच्या घरात तसा संगीताचा कुठलाही वारसा नव्हता.

एक गुजराती व्यापारी कुटुंबातून ते पुढे आले होते. पण लहानपणापासूनच संगीताबद्दल एक विशेष आकर्षण त्यांना होते आणि यातूनच कल्याणजी यांनी या क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीला संगीतकार हेमंत कुमार यांच्यासोबत सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. ‘नागीन’ या १९५४ साली आलेल्या चित्रपटातील लोकप्रिय झालेल्या लताच्या ‘मन डोले मेरा तन डोले…’ या गाण्यातील बीन त्यानी क्ले व्हायोलीन वर संगीतकार कल्याणजी यांनी वाजवली होती. ही बिनची धून इतकी लोकप्रिय झाली की संपूर्ण भारत वर्षात या गाण्याने प्रचंड मोठा लोकप्रियता हासील केली. यानंतर अनेक संगीतकारांकडे त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. शंकर जयकिशन यांच्याकडे देखील ते काही काळ होते.
================================
हे देखील वाचा : जेव्हा Shammi Kapoor वर चित्रित गाणे शमशाद बेगमने गायले होते!
=================================
स्वतंत्र पणे संगीत देण्यासाठी त्यांना पहिला चित्रपट मिळाला ‘सम्राट चंद्रगुप्त’ या चित्रपटाचे निर्माते सुभाष देसाई होते तर दिग्दर्शन बाबुभाई मिस्त्री यांनी केले होते. चित्रपटात भारत भूषण आणि निरुपा रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील गाणी गीतकार भरत व्यास यांनी लिहिलेली होती. हा एक बी ग्रेड ऐतिहासिक सिनेमा होता. पण बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपटांना त्या काळात एक वेगळं लोकप्रियतेचे वलय प्राप्त झालं होतं. संगीतकार म्हणून कल्याणजी आनंदजी यांचा हा पहिलाच चित्रपट असल्यामुळे ते देखील या चित्रपटाची गाणी बनवताना खूप सजग होते. यातील पहिलंच गाणं जे त्यांनी स्वरबद्ध केलं ते गाणं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘चाहे दूर हो चाहे पास हो मेरे सपनों की तुम तस्वीर हो …’ अतिशय मेलडीयस अशी ट्यून त्यांनी या गाण्याला दिली होती. कल्याणजी आनंदजी यांच्यावर सुरुवातीला संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रगुप्त यांच्या संगीताचा मोठा प्रभाव होता आणि तो या चित्रपटात देखील दिसतो.

या चित्रपटातील गाणी मन्नाडे, रफी, लता मंगेशकर यांनी गायलेली होती. सर्वच गाणी सुंदर बनली होती. चित्रपट प्रदर्शित झाला. संगीतकार आनंदजी यांना आपली गाणी प्रेक्षकांना कशी वाटतात याबद्दल खूप उत्सुकता होती. एकदा ते मुंबईच्या एका थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला गेले. चित्रपटात जेव्हा ‘चाहे दूर हो चाहे पास हो…’ हे गाणं सुरू झालं त्यावेळेला त्यांना चमत्कार बघायला मिळाला. कारण सर्व प्रेक्षक हे गाणं पाहताना उठून उभे राहिले आणि समूह स्वरात हे गाणं गाऊ लागले! संपूर्ण थिएटरमध्ये या गाण्याचा एकच जल्लोष त्यांना पाहायला मिळाला. संगीतकार आनंदजी यांना हे सर्व अनपेक्षित होतं.

आनंदाने त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आपण बनवलेल्या गाण्याला प्रेक्षकांनी इतकी प्रचंड मोठी दाद दिली आहे हे पाहून त्यांना शब्द फुटेनात. त्याच भारवलेल्या अवस्थेत ते घरी आले आणि आपल्या आईजवळ गेले आणि आईला सांगताना त्यांना रडू कोसळले. ते आईला म्हणाले ,” आम्ही एक साधी चाल बनवली. पण लोकांना इतकी सुंदर वाटली की लोक हे गाणे थिएटरमध्ये पाहताना समूह स्वरात गात होते!” आईचे देखील डोळे पाणावले. संगीतकार आनंदजी यांनी आईला विचारले,” आई हा चमत्कार कसा घडला?” त्यावर आईने सांगितले,” बेटा जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट अतिशय प्रेमाने,प्रामाणिक तेने आणि सच्च्या दिलाने चांगली बनवता त्यावेळेला रसिकांच्या काळजाला भिडतेच. ती दाद तुम्हाला मिळणारच. प्रामाणिक आणि सच्च्या प्रयत्नातून बनवलेली कलाकृती ही नेहमी दर्जेदार असते. असेच काम करत रहा. भगवंत तुम्हाला सदैव यश देत राहील!”
================================
हे देखील वाचा : गोल्डन इरातील मान्यवर संगीतकारांनी Mukesh यांचा स्वर का कमी वापरला असावा?
=================================
संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी आईच्या या वाक्याने खूप प्रभावीत झाले. आणि इथूनच कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताला नवीन धुमारे फुटले. साठ आणि सत्तर च्या दशकात हे दोघे आघाडीचे संगीतकार होते. सरस्वतीचंद्र, छलिया, उपकार, सफर, कोरा कागज, ब्लॅकमेल , पूरब और पश्चिम…. या त्यांच्या चित्रपटातील गाण्यांनी प्रचंड मोठी लोकप्रियता मिळवली.मनोजकुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या अनेक लोकप्रिय सिनेमांना संगीत कल्याणजी आनंद जी यांचे होते!