
khauff : “खौफ”ची पंचवीशी
एक सुपरहिट पिक्चर फाॅर्मुला सेट करते हे हिंदी चित्रपटाचे वैशिष्ट्य. ते करताना त्यातच काही वेगळे करता येईल का असा व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रयत्न नको का व्हायला?
संजय गुप्ता (Sanjay Gupta) दिग्दर्शित “खौफ” (khauff) (मुंबईत रिलीज २ मार्च २०००) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना हा प्रश्न पडतोय बघा. संजय दत्तच्या बेफिकीर इमेजला साजेसे हे नाव. आपल्या असण्याची, कधी दिसण्याची, कर्तृत्वाची भीती निर्माण करायची. कधी काळी चित्रपटाचा व्हीलन आणि त्याचे बुरे कारनामे याची भीती वाटायची. प्राण हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील सर्वात प्रभावी खलनायक. नजरेतूनच त्यांची खलनायकी सुरु होई. अनेक प्रकारच्या गेटअपमधून त्यांची व्हीलनगिरी गाजली. “शोले“त अमजद खानने साकारलेल्या गब्बर सिंगचीही त्या काळात भीती वाटे. जो डर गया समझो मर गया हा त्याचा सही फंडा.
कालांतराने नायकच एक प्रकारचा खलनायक साकारु लागला. त्याला नकारात्मक व्यक्तिरेखा असेही म्हटले गेले. हा नायक चित्रपटभर क्रूर वागतो आणि क्लायमॅक्सला सुधारतो अशीच काहीशी ही “स्टोरी लाईन”. तो कसा का वागतो वा बनतो याचा एक फ्लॅशबॅक. लहानपणापासूनच्या बर्या वाईट अनुभवातून तो जगाकडे तुच्छतेने बघतो, सगळेच प्रश्न शस्त्राने सुटतील यावर त्याचा विश्वास बसलाय. पिळदार शरीरयष्टी, नजरेत बेफिकीरी, बोलण्यात गुर्मी असा हा नायक त्याच्या आयुष्यात प्रेयसी आल्यावर सुधारतो वगैरे वगैरे अशी वळणे घेत घेत पटकथा बांधली जाई. (khauff)

सुभाष घई दिग्दर्शित “खलनायक” (१९९३) याचे उत्तम उदाहरण. संजय दत्तचं यातले खुनशी नजरेतील केसाळ रुपडे भारी होते. राज कंवर दिग्दर्शित “दीवाना” (१९९३) मध्ये नायिकेवर फिदा झालेला नायक (शाहरुख खान) पुरता वेडापिसा होतो असाही एक सुपरहिट चित्रपट. अब्बास मुस्तान दिग्दर्शित “बाजीगर” (१९९३), यश चोप्रा दिग्दर्शित “डर” (१९९३) यातील शाहरुख खानने साकारलेल्या विक्षिप्त वाटणार्या व्यक्तिरेखा रसिकांनी डोक्यावर घेतल्या. डरमधील त्याचा क…क..क… किरण हा मास्टर स्ट्रोक रसिकांना आवडला. (Bollywood mix masala)
संजय दत्तच्या व्यक्तिमत्वाला अशा भूमिका जास्त फिट्ट बसल्या. दिग्दर्शक संजय गुप्ता व संजय दत्त यांची जोडी अशाच स्टोरी लाईनवर जास्त जमली असे दिसून आले. संजय दत्तच्या शारीरिक ताकदीचा संजय गुप्ताने जास्त विचार केला असावा. संजय गुप्ताची समजच तेवढी असेल. संजय दत्तमधील गुणवत्ता दिग्दर्शक राजकुमार हिरानीला जास्त उमजली. मुन्नाभाई एम. बी. बी. एस., लगे रहो मुन्नाभाई ही त्यात उत्तम उदाहरणे. हे चित्रपट कितीही वेळा आणि कुठुनही पहावेत अतिशय निखळ मनोरंजन. सहज जाता आयुष्याचे तत्वज्ञान सांगणारे. संजय दत्तच्या सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटातील हे दोन नक्कीच. संजय गुप्ताने संजय दत्तच्या हाती कायमच शस्त्र दिले. त्याला ॲक्शन हिरो केला. (khauff)

जी. पी. सिप्पी निर्मित “आतिश” (१९९४) ही दिग्दर्शक संजय गुप्ता आणि उघड्या निधड्या छातीचा संजय दत्त अशी जोडी जमली. आतिश चित्रपट यश चोप्रा दिग्दर्शित “दीवार” (१९७५) ची फसलेली रिमेक. संजय दत्त अमिताभ बच्चनची उंची गाठू शकत नाही हे खुद्द संजय दत्त नक्कीच जाणून असेल तेवढा तो समंजस नक्कीच आहे. अतिशय जाणकार अशा कलावंत दाम्पत्याचा तो मुलगा आहे.
पण संजय गुप्ताला ते लक्षात यायला हवे होते. या दिग्दर्शक व कलाकार जोडीने त्यानंतर रामशस्र (१९९५), खौफ (khauff) (२०००), जंग (२०००), कांटे (२००२), मुसाफिर (२००४), जिंदा (२००६), शूटआऊट लोखंडवाला (२००७), दस कहानिया (२००७) इतके चित्रपट एकत्र केले. सगळेच सर्वसाधारण होते. पाॅवरपॅक एकही नाही. थीम नाट्यमय हवी. संजय गुप्ता निर्मित “प्लॅन” या चित्रपटातही संजय दत्त आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक ह्रदय शेट्टी आहे.

या जोडीच्या “खौफ“चा (khauff) निर्माता विजय तोलानी आहे. १९९७ साली सेटवर गेलेला हा चित्रपट पूर्ण होता होता २००० साल उजाडले. आतिशमधील संजय दत्त बाबा नावाने वावरला, खौफमध्ये बाबू या नावाने इतकेच. अशा ढिश्यूम ढिश्यूम देमार चित्रपटांना छोट्या शहरात तसेच रिपीट रनला चांगले यश मिळते असे मानले जाई. तोपर्यंत एक पडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचा काळ होतो आणि अशा धमाकेदार मसालेदार मनोरंजक पिक्चर्सचा आपला एक हुकमी प्रेक्षकवर्ग होता. त्यांना टाईमपास हवा असे. म्हणून काय सरधोपट चित्रपट पडद्यावर आणणे योग्य नव्हे. काही तरी रंगत हवी. तेही तिकीट काढूनच चित्रपटाला गर्दी करतात. चित्रपटावर प्रेम करतात.
==============
हे देखील वाचा : Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….
==============
“खौफ” (khauff) मध्ये मनिषा कोईराला, शरद कपूर, सुरेश ओबेरॉय, मुकेश खन्ना, टीनू आनंद, जसपाल भट्टी, फरिदा जलाल, परमीत सेठी, नवीन निश्चल, बीना, इशरत अली, अच्युत पोतदार, सत्येन कप्पू असे बरेच कलाकार. त्यात संजय दत्त महत्वाचा. अमेरिकन चित्रपट “The juror” यावर खौफ बेतलेला. आनंद वर्धन यांचे लेखन व संजय गुप्ता-सुतानू गुप्ता यांची पटकथा.
दिग्दर्शक व कलाकार जोडी ही गोष्टही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक उल्लेखनीय गोष्ट. विजय आनंद व देव आनंद, शक्ती सामंता व राजेश खन्ना, यश चोप्रा व अमिताभ बच्चन, ह्रषिकेश मुखर्जी व अमिताभ बच्चन, मनमोहन देसाई व अमिताभ बच्चन, डेव्हिड धवन व गोविंदा, बी. आर. इशारा व रेहाना सुलतान, रामगोपाल वर्मा व उर्मिला मातोंडकर, करण जोहर व शाहरुख खान, राकेश रोशन व ह्रतिक रोशन अशी उदाहरणे उल्लेखनीय. संजय गुप्ता व संजय दत्त या जोडीला अनेक चित्रपटातून एकत्र काम करुनही अशी ओळख निर्माण करता आली नाही… “खौफ”च्या (khauff) पंवीशीनिमित्त हा फोकस.