खुदा हाफीजचे यश
ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालेल्या खुदा हाफीज या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे. फारुख कबीर दिग्दर्शित या चित्रपटात अॅक्शन हिरो विद्युत जामवालची प्रमुख भूमिका आहे. तामिळ आणि तेलगू मध्ये विद्युतने हिट चित्रपट दिले आहेत. हिंदीमध्ये जंगली, कमांडो या चित्रपटातून बॉलिवूडचा आगामी अॅक्शन हिरो म्हणून त्यांने ओळख मिळवली आहे. आता खुदा हाफीज मध्येही त्याच्या अॅक्शनसीनची जोरदार चर्चा आहे. सुशांत सिंगच्या दिल बेचारानंतर ओटीटीवर खुदा हाफीजला मोठी पसंती मिळाली आहे. त्यामुळे विद्युतने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
विद्युत जामवाल सह या चित्रपटात शिवालिका ओबेरॉय, अनु कपूर, आहना कुमार आणि शिव पंडित यांच्या भूमिका आहेत. समीर आणि नरगीस या विवाहीत जोडप्याची कथा खुदा हाफिजमध्ये आहे. परदेशात नोकरीसाठी गेलेली नरगीस एअरपोर्टवरुन हरवते.आपल्या पत्नीचा काहीच पत्ता लागत नसल्यानं समीर स्वतः तिच्या नोकरीच्या देशात जातो.पत्नीला शोधायचा प्रयत्न करतो. परदेशात हरवलेल्या पत्नीला शोधतांना त्याला काय अनुभव येतो.नरगीस मिळते का आणि त्यासाठी समीरला काय काय करावं लागतं.हे सर्व खुदा हाफीजमध्ये पहाता येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक फारुख कबीर यांनी ही सत्य घटना असल्याचे सांगितले आहे. कुमार मुगत पाठक आणि अभिषेक पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
विद्युत जामवाल या अभिनेत्याकडे बॉलिवूडचा नवा अॅक्शन हिरो म्हणून पाहिले जात आहे. अक्षय कुमार नंतर बहुधा पहिल्यांदाच मार्शल आर्टमध्ये शास्त्रोक्त शिक्षण घेललेला हिरो बॉलिवूडमध्ये आला आहे. काश्मिरमध्ये जन्म झालेल्या विद्युतने वयाच्या तिस-या वर्षापासून मार्शल आर्ट आणि कलारीपयट्टू ही केरळाची कला शिकायला सुरुवात केली. मार्शल आर्टमध्ये पदवी मिळवल्यानंतर विद्युतने जवळपास पंचवीस देशांचा दौरा केला. त्यातून त्यांनी कलारीपयट्टू या केलेचा प्रचार केला.
हिंदी चित्रपट सृष्टीत येण्याआधी विद्युत मॉडेलिंग करत होता. पण तिथे त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर विद्युतने तामिळ आणि तेलगू चित्रपटात काम केले. दाक्षिणात्य चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे त्याला हिंदीमध्ये प्रवेश मिळाला. निशिकांत कामत यांनी त्याला फोर्स या चित्रपटात संधी दिली. विद्युतने जंगली आणि कमांडो या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा आणि अॅक्शनचा परिचय दिला आहे. कमांडो चित्रपटाच्या दोन भागांमध्येही विद्युतच्या अॅक्शन सीनची जोरदार चर्चा होती. त्याने हे अॅक्शन सीन कोणताही डमी न वापरता केले.
खुदा हाफीजचे दिग्दर्शक फारुक कबीर यांनी फिर भी दिल है हिंदुस्तानी आणि अशोक सारख्या चित्रपटांतून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. अजय देवगणच्या अवेकिंग या लघुपटातून त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शनाची सुरुवात केली. अल्लाह के बंदे या त्यांच्या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं. आता खुदा हाफीजमधून फारुख कबीर यांच्या नावाची नव्यानं चर्चा सुरु झाली आहे.
सध्या कोरोनामुळे मोठ्या पडद्यावर चित्रपट कधी प्रदर्शित होतील हे मोठं कोडच आहे. पण त्यातूनही ओटीटी प्लॅटफॉर्मनं अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना साथ दिली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीही काही बीग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. त्यामध्ये अक्षय कुमार आणि कियारा आडवाणीचा लक्मी बॉम्ब, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा भुजः द प्राईड ऑफ इंडीया, अभिषेक बच्चनचा द बिग बुल या चित्रपटांचा समावेश आहे.