
लीना चंदावरकरला प्रपोज करताना Kishore Kumarने तिच्या घरासमोर चक्क धरणे आंदोलन केले होते!
भारतीय सिनेमाच्या दुनियेतील लीजेंडरी ऍक्टर किशोर कुमार त्यांच्या अभिनय गायन आणि इतर अष्टपैलू कलागुणांमुळे जितके लोकप्रिय होते; तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींबाबत. त्यांनी आयुष्यात चार लग्नं केली. त्यांच्या चौथ्या लग्नाचा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे. तिच्या घरच्यांना पटवण्यासाठी किशोरने तिच्या दारात चक्क धरणे आंदोलन केले होते आणि त्याच्याच एका सुपर हिट गाण्यातून तो आपल्या भावना व्यक्त करत होता! कोण होती त्याची चौथी पत्नी आणि काय होता नेमका हा किस्सा?

अभिनेता गायक किशोर कुमारचा पहिला विवाह १९५१ साली बंगाली कलावंत रूमा घोष यांच्यासोबत झाला. या दोघांचा पुत्र अमित कुमार याचा १९५३ साली झाला. आज तो हिंदी सिनेमातील नामवंत पार्श्वगायक आहे पण हा विवाह फारसा टिकला नाही पन्नास च्या दशकाच्या मध्यावर रुमा घोष यांच्याशी मतभेद झाल्यावर त्यानी घटस्फोट घेतला . त्या नंतर किशोर कुमार यांनी मधुबाला या रुपेरी पडद्यावरील सर्वात सुंदर अभिनेत्री शी १६ ऑक्टोबर १९६० रोजी कोर्टात जाऊन लग्न केले. पण हे लग्न देखील फारसे सक्सेसफुल झाले नाही. कारण मधुबाला ही हृदयरोगाने त्रस्त होती. त्यामुळे त्यांचे हे वैवाहिक जीवन देखील सुखी झाले नाही. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी तिचे याच आजारांने निधन झाले आणि किशोर कुमार पुन्हा एकटा पडला. यानंतर आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ४ ऑगस्ट १९७६ या दिवशी त्याने अभिनेत्री योगिता बाली हिच्या सोबत लग्न केले. हे लग्न तर अक्षरशः एक दोन वर्षातच मोडले.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
यानंतर किशोर कुमारने अभिनेत्री लीना चंदावरकर हिच्या सोबत संसार थाटला. पण हा विवाह काही सोपा नव्हता. यासाठी किशोर कुमारला खूप झगडावे लागले. अभिनेत्री लीना चंदावरकर हिने १९७४ साली गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे चिरंजीव सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न झाले होते. त्यावेळी सिद्धार्थची बहीण शशिकला बांदोडकर या गोव्याच्या मुख्यमंत्री होत्या. लग्न मोठं थाटामाटात झालं. पण लग्नानंतर काही दिवसातच सिद्धार्थ कडे असलेल्या बंदुकीला साफ करताना एक्सीडेंटली गोळी त्याच्याच पोटात लागली आणि तो जखमी झाला. पुढची ११ महिने तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता.

लीना चंदावरकरने त्याची खूप सेवा केली. पण १९७५ साली सिद्धार्थ यांचे निधन झाले आणि वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लीना चंदावरकर विधवा झाली. इतक्या मोठ्या घटनेनंतर काही काळ डिप्रेशनमध्ये गेली होती. यातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा ती सिनेमात काम करू लागली. याच काळात किशोर कुमार सोबत ती ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटात काम करत होती. हा चित्रपट तर काही पूर्ण झाला नाही पण या चित्रपटाच्या दरम्यान दोघांच्या तारा जुळल्या. किशोर कुमारने त्या वेळेला योगिता बाली सोबत घटस्फोट घेतला होता त्याने एकदा सहज लीना ला सेटवर विचारले की,” मी पुन्हा एकदा माझे घर बसवण्याचा प्रयत्न करत आहे तू त्याला मदत करशील का?” लीना चंदावरकर ला काहीच कळाले नाही. जेव्हा किशोरने तिला प्रपोज केले तेव्हा तिने त्याला विरोध केला. लीना चंदावरकर हिच्या आई-वडिलांचा देखील या विवाहाला विरोध होता. कारण किशोर कुमार त्यांच्या दृष्टीने कुठल्याच बाबतीत रिलायबल वाटत नव्हता. एक तर या दोघांमध्ये तब्बल वीस वर्षाच्या अंतर होते. ऑल रेडी त्याची तीन लग्न झाली होती. त्यामुळे त्यांनी या विवाहला प्रचंड विरोध केला!
या काळात किशोर कुमार मात्र लीना चंदावरकर च्या मागे पिच्छा पुरवत होता. तो एकदा धारवाडला लीना चंदावरकर च्या घरी जाऊन तिच्या घरासमोर धरणे आंदोलन करत बसला आणि तिच्या वडिलांसमोर ‘ नफरत करने वालो के सीने मे प्यार भर दू अरे मै वो परवाना हू पत्थर को मोम कर दू …’ हे गाणं गाऊन तिला प्रपोज करू लागला. पण पालकांच्या मनात काहीही फरक पडला नाही त्यांचा लग्नाला विरोध कायम होता. याच काळात लीनाचे आणि तिच्या वडिलांचे काही मतभेद झाले आणि ते तिला रागाच्या ‘मनहूस’ म्हणत वाईट साईट बोलून बोलले! त्यामुळे लीना वडिलांचे घर सोडून मुंबईत आली आणि थेट कार्टर रोड ला जावून किशोर कुमारला तिने फोन केला. त्यात तिने विचारले,” तू मला सात आठ महिन्यापूर्वी प्रपोज केले होते. हे प्रपोजल अजून तर कायम असेल तर मी लग्न करायला तयार आहे!” किशोर कुमार चा नकार द्यायचा प्रश्नच नव्हता. त्या दोघांनी ताबडतोब कोर्टात जाऊन १९७९ साली लग्न केले. कालांतराने घरच्यांचा देखील विरोध हळूहळू मावळू लागला आणि त्यांनी पुन्हा एकदा किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचे विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने लग्न करून द्यायचे ठरवले. या लग्नाच्या वेळी लीना चंदावरकर प्रेग्नेंट होती!

मध्यंतरी एका रियालिटी शोमध्ये लीना चंदावरकर आली होती. त्यावेळी तिने सांगितले की,” लग्नाच्या वेळी मी खूप विनोदी दिसत होती . कारण त्या वेळी चक्क माझे पोट दिसत होते. मी सात महिन्याची प्रेग्नेंट होते. आणि मी सप्तपदी चे फेरे घेत होते. सप्तपदीच्या वेळी मी थकत होते आणि खाली बसत होते!” अशा पद्धतीने किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचे दोन वेळेला लग्न झाले. एकदा रजिस्टर पद्धतीने आणि एकदा वैदिक पद्धतीने. त्यानंतर १९८० साली किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांच्या सुमित या मुलाचा जन्म झाला. पुढची सात वर्ष किशोर कुमार चे वैवाहिक आयुष्य खूप आनंदात गेले. या कार्यक्रमात लीना चंदावरकरने एक खूप मजेदार आठवण सांगितली.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांनी एक गाणे देखील गायले आहे. मनचली (१९७२) या चित्रपटातील ‘गम का फसाना बन गया अच्छा…’ या गाण्यात किशोर कुमारला साथ लीना चंदावरकरने दिली होती. या ‘मनचली’ चित्रपटाचा नायक होता संजीव कुमार. त्यावेळेला संजीव कुमार लीना चंदावरकर ला हळूच म्हणाला,” तू किशोर कुमार सोबत जास्त बोलू नकोस. तो तुला लगेच प्रपोज करेल!” कारण दुसऱ्या बाजूला संजीव कुमार देखील लीना चंदावरकर वर फिदा होताच. लीना – किशोर यांनी नंतर ‘ममता की छाव में’ हा सिनेमा ऐंशी च्या दशकात सुरु केला पण सर्व व्यवस्थित चालू असताना 13 ऑक्टोबर 1987 या दिवशी किशोर कुमारचे हार्ट अटॅकने निधन झाले.