
प्लेबॅकसाठी Kishore Kumar यांच्याच नावाचा आग्रह पंचम यांनी का धरला होता?
काही निर्माता आणि दिग्दर्शकांचा आपल्या सिनेमातील गाण्यांसाठी विशिष्ट पार्श्वगायकासाठी आग्रह असायचा. एकतर त्यांची त्या पार्श्वगायकावर किंवा गायिकेवर प्रचंड श्रद्धा असायची. त्यांच्या पूर्वीच्या चित्रपटात त्यांनीच गाणी गायल्यामुळे चित्रपट हिट झालेले असायचे त्यामुळे सहसा ते बदलाला सामोरे जात नाही. पण कधी कधी संगीतकारांच्या आग्रहासाठी त्यांना नवीन प्लेबॅक सिंगर घ्यावा लागायचा त्यातून काही वाद निर्माण व्हायचे पण नवीन बदल देखील स्वागतार्ह असायचे.
असाच काहीसा प्रकार किशोर कुमारच्या एका गाण्यासाठी झाला होता. चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक काही केल्या किशोर कुमारला ते गाणे द्यायला तयार नव्हते. त्यांच्या मते ते गाणे रफी यांनीच गायला हवे होते. पण संगीतकाराने खूप आग्रह करून हे गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलं आणि सत्तरच्या दशकातील ते गाणं कल्ट क्लासिक बनलं आज आज इतक्या वर्षानंतर आपण तेव्हा ते गाणं ऐकतो तेव्हा देखील ते तितकंच फ्रेश वाटतं. ही कमाल किशोर कुमारच्या स्वरा सोबतच संगीतकाराच्या कौशल्याची होती! कोणतं होतं ते गाणं आणि काय होता नेमका किस्सा?

साठच्या दशकामध्ये चित्रपट दिग्दर्शनात उतरलेल्या भप्पी सोनी यांनी सत्तरच्या दशकामध्ये एक चित्रपट दिग्दर्शित करायला घेतला होता. या चित्रपटातील एका गाण्याचा हा किस्सा आहे. भप्पी सोनी यांनी सिनेमाच्या दुनियेत एक लेखक म्हणून एन्ट्री केली होती. पन्नासच्या दशकात ‘मिलाप’, ‘सोलवा साल’, ‘काला पानी’ या चित्रपटाच्या कथा त्यांनी लिहिल्या होत्या. हे सर्व चित्रपट राज खोसला यांनी दिग्दर्शित केले होते. १९६० साली सुनील दत्त आणि वहिदा रहमान यांना घेऊन त्यांनी ‘एक फुल चार काटे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला.
दिग्दर्शनातील त्यांच्या या चित्रपटाला चांगले यश मिळाले. यानंतर त्यांनी शम्मी कपूर आणि राजश्री ला घेऊन जानवर आणि ब्रह्मचारी हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. हे दोन्ही सिनेमे सुपर हिट ठरले. यानंतर एक श्रीमान एक श्रीमती,प्यार हि प्यार , तुम हसी मै जवान, प्रीतम, जवां मोहब्बत हे चित्रपट भप्पी सोनी यांनी दिग्दर्शित केले. या सर्व चित्रपटातील गाणी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली होती. अपवाद फक्त तुम हसी मै जवान या चित्रपटातील ‘मुन्ने की अम्मा ये तो बता तेरे बेटे के अब्बा का नाम क्या है….’ हे गाणं किशोर कुमारने गायलं होतं.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
रफी आणि लता यांच्या स्वरावर भप्पी सोनी यांची प्रचंड श्रद्धा होती. त्यांच्या शिवाय इतर गायकांचा ते विचार देखील करत नव्हते. सत्तरच्या दशकात मात्र चित्र बदलले. या काळात किशोर कुमार यांचा झंजावात प्रचंड मोठा होता. प्रत्येक नायक, संगीतकार आणि निर्माता दिग्दर्शक किशोर कुमार यांचा स्वर आपल्या चित्रपटात असावा याचा प्रयत्न करत होते. किशोर कुमारचे गाणे आपल्या चित्रपटात असले तर सिनेमा हिट होण्याची शंभर टक्के खात्री त्यांना वाटत होती. याच काळात भप्पी सोनी यांनी गुलशन नंदा यांच्या एका कथानकवर एक चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित करायचे ठरवले.
या चित्रपटाला संगीत राहुल देव बर्मन देणार होते. चित्रपटाचे नाव ते ‘झील के उस पार’ या चित्रपटात धर्मेंद्र,मुमताज , शत्रुघ्न सिन्हा , योगिता बाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सिनेमात एकून सहा गाणी होती. या पैकी एकच गाणे पुरुष स्वरात होते. चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. भप्पी सोनी यांचा आग्रह मात्र ही गाणी रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड करावी असा होता. पण जेव्हा पंचमने गाण्याचे शब्द बघितले तेव्हा ही गाणी किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात रेकॉर्ड व्हावी असे त्यांना वाटले. या कारणाने संगीतकार आणि दिग्दर्शक यांच्यात वादावादी सुरू झाली. भप्पी सोनी रफीच्या नावावर आग्रही होते तर किशोर कुमार हीच पंचमदाची पहिली पसंत होती.

एक दिवस संध्याकाळी पुन्हा ते भेटले त्यावेळेला भप्पी सोनी म्हणाले की,” पंचम, तू अतिशय प्रतिभावान संगीतकार आहेस. म्हणूनच मी तुला माझ्या चित्रपटाला संगीतासाठी साईन केले आहे!” त्यावर पंचमदाचे म्हणणे होते,” तुम्ही जर मला प्रतिभावान समजत असाल तर माझी विनंती आहे का यातील एकमेव पुरुष गीत जे आहे ते आपण किशोरच्या आवाजात रेकॉर्ड करू. मी गॅरंटीने सांगतो. या किशोरच्या गाण्याने तुमचा सिनेमा सुपरहिट होईल!” आता मात्र भप्पी सोनी यांनी किशोर च्या नावाला ग्रीन सिग्नल दिला. पंचम मात्र एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणाले,” यातील गाणी आशा भोसले यांच्या स्वरात आपण रेकॉर्ड करू.” त्यावर मात्र भप्पी सोनी यांचा आक्षेप होता. ते म्हणाले “यातील एक गाणे आपण आशाच्या स्वरात रेकॉर्ड करू आणि उरलेली सर्व गाणी लताच्या स्वरात!” पंचमने नाईलाजाने होकार दिला.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
‘हाय बिछवा डस गयो रे’ हे आशा भोसलेच्या स्वरात रेकॉर्ड करायचे ठरले. पंचमदा यांचा आग्रह ‘दो घुट मुझे भी पिला दे शराबी देख फिर होता है क्या….’ या गाण्यासाठी होता. त्यांच्या मते ,” हे एक कॅब्रे डान्स नंबर आहे इथे आशाच आवाज जास्त योग्य आहे!” पण भप्पी सोनी यांनी ऐकले नाही ते गाणे लताच्या आवाजातच रेकॉर्ड करण्यात आले. पण किशोर कुमार यांच्या स्वरात ‘क्या नजारे क्या सितारे…’ हे गाणं रेकॉर्ड झालं आणि हेच या चित्रपटातील लोकप्रिय गाणे ठरले .किशोरदाच्या स्वरातील हे सत्तर च्या दशकातील लोकप्रिय असे गीत होते.२८ ऑगस्ट १९७३ रोजी प्रदर्शित झालेला ‘झील के उस पार’ हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाच्या छायाचित्रणासाठी सिनेमॅटोग्राफर जाल मिस्त्री यांना फिल्मफेअर चा पुरस्कार मिळाला होता.