
Kishore Kumar : सवेरे का सूरज… गाण्याच्या मेकिंगची भन्नाट स्टोरी!
क्लासिकल बेस गाणं आले की किशोर कुमार (Kishore Kumar) थोडासा नर्वस असायचा. कारण त्याने कुठलेही शास्त्रीय संगीताचे अधिकृत शिक्षण घेतलं नव्हतं. असं असलं तरी किशोर कुमारच्या कारकीर्दीकडे बघितल्यानंतर त्याने कितीतरी क्लासिकल गाणी अतिशय सुंदर आणि सुरीली गायली आहेत ही बाब देखील सत्य आहे. पण ती गाणी जाताना मात्र त्याला टेन्शन यायचं हे नक्की. एकदा संगीतकार ओपी नय्यर यांच्याकडे गाताना असाच एक बाका प्रसंग घडला होता. पण किशोर कुमारने चॅलेंज घेवून अतिशय सुरेलतेने हे गाणे गायले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी ओ पी नय्यर यांनी किशोर कुमार याला चक्क बेसुरा देखील म्हटलं होतं. पण किशोर कुमारने ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते गाणे अतिशय भावपूर्ण रीतीने गायले. कोणते होते ते गाणे ? आणि कोणता होता तो चित्रपट?

हा चित्रपट होता एक बार मुस्कुरा दो (Ek Bar Mooskura Do). हा १९७२ साली प्रदर्शित झाला होता. खरंतर किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी ओपी नय्यर यांच्याकडे या सिनेमापूर्वी भरपूर गाणी गायली होती. यातील विशेष उल्लेख करावी म्हणजे ‘मेरे नींदों में तुम मेरे खाबो मे तुम’(नया अंदाज) पिया पिया पिया मोरा जिया पुकारे (बाप रे बाप) सुरमा मेरा निराला आंखो मे जिसने डाला (कभी अंधेरा कभी उजाला) प्रस्तुत ‘एक बार मुस्कुरा दो’ हा चित्रपट शशधर मुखर्जी यांच्या बॅनरखाली तयार झाला होता.
शशधर मुखर्जी यांचे तीन पुत्र. जॉय मुखर्जी, शोमू मुखर्जी आणि देब मुखर्जी. या चित्रपटाचे निर्माते शोमू मुखर्जी होते. शशधर मुखर्जी यांची पत्नी किशोर कुमार (Kishore Kumar) यांची सख्खी बहीण होती. याचा अर्थ जॉय, शोमू आणि देव हे तीन मुखर्जी बंधू किशोर कुमार यांचे सख्खे भाचे होते. ‘एक बार मुस्कुरा दो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राम मुखर्जी यांनी केले होते. ते देखील मुखर्जी यांच्या फॅमिली तीलच होते!

या चित्रपटात देब मुखर्जी आणि जॉय मुखर्जी नायकाच्या रूपात तर तनुजा नायिका होती. या चित्रपटाची गाणी इंदीवर, एस एच बिहारी आणि शेवन रिझवी यांनी लिहिली होती. संगीतकार ओपी नय्यर यांचा हा शेवटचा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटात एकूण सात गाणी होती त्यातली चार गाणी किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायलेली होती. दोन गाणी मुकेश यांनी गायलेली होती. तर एक गाणे रफी यांनी गायलेले होते. किशोर कुमार यांच्या पाच गाण्यांपैकी ‘रूप तेरा ऐसा दर्पण में न समाये’, ‘तू औरो क्यू हो गई’, एक बार मुस्कुरा दो… ही चार रेकॉर्ड झाली होती.
यात एक गाणे जे क्लासिकल बेस होते ते रेकॉर्ड करायचे राहिले होते. गाण्याचे बोल होते ‘सवेरे का सूरज तुम्हारे लिये है’ हे गाणं ओ पी नय्यर यांनी भैरवी या रागात बांधलं होतं. त्यांनी रिहर्सलच्या वेळेला किशोर कुमार (Kishore Kumar) यांना सांगितलं होतं, “देखो किशोर ठीक से रिहर्सल करना. ये एक क्लासिकल बेस गाना है.” किशोर कुमारने दोन तीनदा रिहर्सल केली पण फारसे सिरीयसली घेतले नाही. जेव्हा रेकॉर्डिंगची वेळ आली तेव्हा किशोरकडून चुका होऊ लागल्या. तेव्हा मात्र ओ पी चिडले म्हणाले, ”किशोर तुम्हारे सूर भटक रहे है. तुम्हे मैने पहले ही कहा था ये क्लासिकल गाना है. तैय्यारी करके आना.” तरी किशोर कुमारला काही जमत नव्हतं.

शेवटी ओ पी रागात म्हणाले, ”किशोर तुम ये बेसुरा गाना बंद करो.” तेव्हा मात्र किशोर कुमार म्हणाला, ”अगर मै बेसुरा हूं तो मुझे गाना आपने दिया हि क्यूं? किसी क्लासिकल सिंगर से गवा लेते? मुझे क्यूं दिया?” त्यावर ओ पी म्हणाले, ”मैने कहा दिया है? तुम्हारे भांजोने तुम्हे दिया है. उन्हे तो ये गाने में अपना मामा हि चाहिये!” यावर किशोर कुमार हसू लागला. तो म्हणाला, ”तो ठीक है. मै ये चॅलेंज लेता हूं. मै कल पुरी तैय्यारी करके आऊंगा और अच्छी तरह से गाऊगा. आखिर मेरे भांजे के इज्जत का सवाल है!”
===========
हे देखील वाचा : Jeetendra : जितेंद्र ऐंशीच्या दशकात दक्षिणात्य सिनेमात का बिझी झाले ?
===========
रात्रभर किशोर कुमार (Kishore Kumar) या गाण्याची प्रचंड प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने हे गाणं गायला. हे गाणं गायला खरं तर खूप अवघड आहे. यातील उतार चढाव आणि ठहराव जबरदस्त आहेत. किशोर कुमारने हे गाणे आपल्या स्वरात गाऊन अजरामर करून ठेवले. या गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यानंतर ओ पी नय्यर यांनी किशोर कुमारला आलिंगन दिले. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते म्हणाले, ”किशोर तू ग्रेट है. कल भी तुम अच्छा हि गा रहे थे लेकीन ये गाना और अच्छा हो जाये इसलिये मैने तुझे बेसुरा कहा.” किशोर कुमारने ओ पीकडे गायलेलं हे शेवटचं हिट गाणं ठरलं. यानंतर ओ पी नय्यर यांचा डाऊन फॉल सुरू झाला. मात्र या चित्रपटातील सर्वच गाणी जबरदस्त बनली होती.