राजेश खन्नासाठी किशोर कुमारने गायलेलं पाहिलं गाणं!
भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या यशात त्याच्या अभिनयासोबतच त्याच्यावर चित्रित गाण्यांचा देखील मोठा वाटा आहे. किशोर कुमार आणि राजेश खन्ना(rajesh khanna) हे समीकरण त्या काळातील जबरदस्त हिट असं समीकरण होतं. बऱ्याच जणांना ‘आराधना’ हा चित्रपट या दोघांचा पहिला चित्रपट वाटतो. पण तसे नाही. राजेश खन्नावर चित्रित असलेले पहिले गाणे जे किशोर कुमारने गायले होते ते ‘आराधना’च्या आधी ‘खामोशी’ या चित्रपटासाठी गायले होते.गाण्याचे बोल होते ‘वो शाम कुछ अजीब थी…..’ हे गाणे देखील राजेश खन्नाने संगीतकार हेमंत कुमार यांच्याकडे आग्रह करून गाऊन घेतले होते. खरं म्हणजे हे गाणं आधी हेमंत कुमार स्वतःच गाणार होते.मग किशोरकडे कसे आले? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक असीत सेन यांनी आपल्याच एका बंगाली चित्रपटाचा रिमेक साठच्या दशकाच्या उत्तरार्धात करायचे ठरवले. या चित्रपटाची निर्मिती गीतांजली पिक्चर्स म्हणजे स्वत: हेमंत कुमार यांचीच होती. चित्रपटाचे नाव होते ‘खामोशी’. या चित्रपटात राजेश खन्ना(rajesh khanna), वहिदा रहमान आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट कृष्णधवल होता. सिनेमा कृष्णधवल असे दिग्दर्शकाने मुद्दाम केले होते कारण त्यामुळे चित्रपटातील भावोत्कटता आणखी गडद होऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचली होती. या सिनेमाचे सर्व चित्रीकरण कलकत्ता येथे झाले होते. सर्व युनिट कलकत्त्याला पोहोचले. तेव्हा एका गेस्ट हाऊस मध्ये राजेश खन्नाची राहायची सोय केली होती.
गुलजार यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती. ही गाणी जेव्हा कलकत्त्याला पोहोचली तेव्हा या गाण्यावर विस्तृत चर्चा सर्व कलाकार मंडळींमध्ये झाली. या मीटिंगनंतर आपल्या रूममध्ये आपल्या इतर कलाकारांशी बोलताना राजेश खन्नाने(rajesh khanna) सांगितले, ”मला माझ्यावर चित्रित असलेले गाणे हेमंत कुमारने गाऊ नये असे वाटते!” दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश खन्नाच्या रूमची बेल वाजली. राजेश खन्नाने दार उघडले तर सहा फूट उंचीचे संगीतकार हेमंत कुमार दारात उभे होते. राजेश खन्नाला खूपच ऑकवर्ड वाटले. कारण एकतर हेमंत दा सिनेमाचे निर्माते होते आणि त्या वळी राजेश खन्ना सिगारेट पीत होता.
त्याने पटकन सिगारेट विझवली. हेमंत कुमार म्हणाले,” राहू दे. राहू दे. मी या इंडस्ट्रीतलाच आहे. मला या गोष्टी चांगल्या ठाऊक आहेत. डोन्ट वरी.” हेमंत कुमार चित्रपट सृष्टीतील एक सीनियर म्युझिक डायरेक्टर होते. राजेश खन्नाने हेमंत कुमार यांना सांगितले,” दादा तुम्ही मला बोलावून घ्यायचं. तुम्ही स्वतः येण्याचे कष्ट कां केले?” त्यावर हेमंत कुमार यांनी सांगितले, ”काही होत नाही. मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. मी असे ऐकले आहे की या चित्रपटातील एक गाणे जे तुझ्यावर चित्रित होणार आहे ते गाणे मी गाऊ नये असे तुझे मत आहे.” आता राजेश खन्नाचा(rajesh khanna) चेहरा लज्जित झाला.
तो म्हणाला, ”दादा, तसे नाही. मला असे म्हणायचे होते की हे गाणे हेमंत कुमारच्या ऐवजी दुसऱ्या गायकाने गावे. बस्स इतकंच.” त्यावर हेमंत कुमार म्हणाले वाटले की त्यांना रफीचा आवाज हवा आहे कारण तोवर राजेश खन्नाच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये रफीचाच आवाज होता. त्यांनी विचारले, ”हे गाणे रफीने गावे असे तुला वाटते का?” त्यावर राजेश खन्ना(rajesh khanna) म्हणाला, ”नाही. हे गाणे किशोर कुमार यांनी गावे असे मला वाटते!” त्यावर हेमंतदा म्हणाले, ”अरे पण किशोरने आजवर तुझ्यासाठी पार्श्वगायन केलेलेच नाही.” त्यावर राजेश खन्ना म्हणाला,” बरोबर आहे. परंतु या गाण्यातील भावना किशोर कुमारच्या स्वरांमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने येतील असे मला वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घेऊ शकता. कारण शेवटी तुम्ही सीनियर आहात.”
========
हे देखील वाचा : राजकपूरने ‘या’ गानहिऱ्याला ओळखून त्याचे नशीबच घडवले!
========
राजेश खन्नाचा(rajesh khanna) हा नम्रपणा हेमंत कुमार यांना आवडला. ते म्हणाले, ”तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. मी आजच किशोर कुमारची कॉन्टॅक्ट करतो.” अशा पद्धतीने हेमंत कुमार यांनी किशोर कुमारकडून ‘वो शाम कुछ अजीब थी ये शाम भी अजीब है…’ हे गाणं गाऊन घेतलं हे गाणं किशोर कुमार आणि राजेश खन्ना यांचं पहिलं गाणं ठरलं. जे सुपरहिट ठरला. राजेश खन्ना आणि किशोर कुमार या जोडीचा जबरदस्त हंगामा या गाण्यापासूनच सुरू झाला हा किस्सा अमीन सयानी यांनी हेमंत कुमार यांची एक मुलाखत रेडिओ सिलोनसाठी घेतली होती त्यात त्यांनी सांगितला होता.
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी