जेव्हा शायर Kaifi Azmi यांनी आपल्या बेगमला रक्ताने पत्र लिहिले

Kishore Kumar : जेव्हा किशोर कुमारनेच किशोर कुमार सोबत एक युगलगीत गायले!
सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये किशोर कुमार हा टॉपचा गायक होता. प्रत्येक नायक अगदी दिलीप कुमार पासून कुणाल गोस्वामी पर्यंत सर्वांना त्याचा प्लेबॅक हवा असायचा. त्यामुळे या काळात किशोर कुमार प्रचंड बिझी होते. एकदा मात्र मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता. चित्रपटात काम करणाऱ्या दोन कलावंतांना; जे दोघेही आघाडीचे कलाकार होते त्याना स्वतःसाठी प्लेबॅक किशोर कुमारचाच हवा होता. किशोर कुमारसाठी हे दोघेही खूप जवळचे मित्र होते.

आता दोघांना एकाच गाण्यात प्लेबॅक कसा देणार? एक जण कुणीतरी नाराज होणार हे नक्की. त्यात पुन्हा संगीतकाराने ही अवघड जबाबदारी किशोर कुमार वरच टाकली होती. तुम्हीच ठरवा तुम्ही कोणासाठी पार्श्वगायन करणार? किशोर कुमार यांच्यापुढे मोठे धर्मसंकट उभे राहिले. करायचे तर काय? त्याने यातून सुटका करून घेण्यासाठी,” या गाण्यात माझ्या ऐवजी कुठल्यातरी दोन वेगळ्या गायकांना तुम्ही वापरा. माझी अजून सुटका करा.” असे सांगून स्वतःच माघार घेतली.
परंतु संगीतकार बप्पी लहरी यांना मात्र या गाण्याला न्याय फक्त आणि फक्त किशोर कुमार दऊ शकतो याची खात्री होती. त्यामुळे पेच आणखी वाढत होता. यानंतर मात्र सर्वांनी मिळून एक अभूतपूर्व असा प्रयोग केला जो त्या काळाच्या मानाने खूप पुढचा होता. आणि तो यशस्वी देखील झाला. पुढे एका चित्रपटात तो रिपीट देखील झाला. कोणता होता तो जुगाड? काय होता नेमका किस्सा आणि कोणत्या चित्रपटाच्या वेळी हा बाका प्रसंग निर्माण झाला होता?
सत्तर आणि ऐंशी चे दशक हे राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचे जरी असलं तरी जितेंद्र, धर्मेंद्र, फिरोज खान, संजीव कुमार, विनोद खन्ना हे देखील यशस्वी सिनेमांचे हिरो होते. या सर्वांना किशोर कुमारचा यांचाच प्लेबॅक हवा असायचा. राजेश खन्नाची तर संपूर्ण कारकीर्द किशोर कुमारच्या स्वराने बहरली होती. सत्तरच्या दशकाच्या मध्यावर राजेश खन्नाच्या स्टारडमचा ऱ्हास सुरू झाला आणि अमिताभ सुपरस्टार बनला.पण किशोर कुमार आता अमिताभ बच्चनचा स्वर बनला. ऐंशी च्या दशकात हा सिलसिला चालू राहिला.
या दशकात दक्षिणात्य निर्माते दिग्दर्शक यांनी बॉलीवूडकडे नजर वळवली. आता बॉलीवूडचे अनेक अभिनेते तिकडे काम करताना दिसू लागले. तिथे देखील किशोर कुमार यांचाच स्वर अग्रेसर होता. या काळात जितेंद्रचा मोठा बोलबाला होता. साउथ सिनेमाचा तो पेटंट नायक होता. दिग्दर्शक के . बाप्पय्या या यांनी १९८४ साली ‘मकसद’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. यात जितेंद्र, राजेश खन्ना,श्रीदेवी, जयाप्रदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा डी रामा नायडू यांनी निर्मिला होता. सिनेमाची सर्व गाणी इंदीवर यांनी लिहिली होती तर संगीत बप्पी लाहिरी यांचे होते.

या चित्रपटाच्या एका गाण्याच्या वेळी अभूतपूर्व असा बाका प्रसंग निर्माण झाला.या सिनेमात एक गाणे जितेंद्र आणि राजेश खन्ना या दोन नायकांवर चित्रित होणार होते. साहजिकच बप्पी लहरी यांनी दोन गायकांना यासाठी निवडले होते त्यापैकी एक होते किशोर कुमार. आता जितेंद्र आणि राजेश खन्ना या दोघांनाही किशोर कुमारचा प्लेबॅक हवा होता. आम्ही कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या गायकाचा प्लेबॅक घेणार नाही या मुद्द्यावर दोघे अडून होते. युगल गीत असल्याने दोन स्वर असणे क्रमप्राप्त होते. बप्पी लहरी यांनी हा प्रश्न किशोर कुमार यांच्याकडे नेला.
किशोर कुमार यांनी सोपे उत्तर दिले. “तुम्ही माझे नाव काढून टाका आणि दोन दुसरे गायक घेऊन गाणे गाऊन घ्या.” परंतु बप्पी लहरी म्हणाले “या गाण्यात किशोर कुमार यांचाच स्वर गरजेचा आहे तेच या गाण्याला न्याय देऊ शकतील.” आता काय करायचे? दोघेही नायक राजेश खन्ना आणि जितेंद्र मागे हटायला तयार नव्हते. इगो आडवा येत होता. शेवटी दिग्दर्शक संगीतकार यांनी एक जुगाड करायचे ठरवले. त्यांनी किशोर कुमारला रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये बोलावले.आणि त्यांना सांगितले की “ दादा, तुम्ही जितेंद्र साठी किशोर कुमारकरीता गाणार आहात.” मग किशोर ने विचारले,” राजेश के लिये कौन गायेगा?” तेव्हा बप्पी लहरी म्हणाला,’ किशोर मामा आप ही राजेश खन्ना के लिए भी गाओगे!!”.
किशोर कुमारने डोक्याला हात लावला. हा काय वेडेपणा आहे? त्यावर बप्पी लहरीने सांगितले,” दोघेही आपापल्या भूमिकेवर अटल आहेत तेव्हा हे गाणे संपूर्ण गाणे तुम्हीच गायचे. फक्त ज्या वेळेला दोन्ही नायक एकत्र गातात त्यावेळी आपण पुन्हा एकदा त्या ओळी रेकॉर्ड करायच्या आणि तिथे मिक्स करायच्या!” काळाच्या मानाने हा फार मोठा जुगाड होता. आज हे सहज शक्य आहे. याचा अर्थ किशोर कुमारनेच किशोर कुमार सोबत युगलगीत गायले! गाण्याचे बोल होते ‘आ जाओ आ जाओ नागराजा तुम आ जाओ..’ आज हे गाणं तुम्ही जेव्हा टीव्हीवर किंवा युट्युब वर पहाल तुम्हाला गंमत वाटेल. या गाण्याच्या मुखड्याच्या वेळी तुम्हाला दोन किशोर कुमार एकाच वेळी गाताना दिसतील!
======================
हे देखील वाचा: Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
======================
हा जुगाड यशस्वी झाल्यानंतर आणखी काही महिन्यांनी पुन्हा एकदा असाच प्रसंग आला नायक पुन्हा हेच दोघे होते. चित्रपट होता निशान. या चित्रपटात देखील ते गाणे त्यांनी अशाच पद्धतीने रेकॉर्ड केलं. इथं त्यांनी आणखी एक वेगळा प्रयोग केला. पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकर ला वापरले आणि चित्रपटात ते गाणे पुनम दिलं आणि रेखा यांच्यावर चित्रित केले. म्हणजे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे जितेंद्र, राजेश खन्ना, पूनम धिल्लन आणि रेखा यांच्यावर चित्रित केले.बेलीया अब कि ये बहार कोई गुल नया खिलायेगी!’ ‘निशान’ या सिनेमाला संगीत मात्र राजेश रोशन यांचे होते! ‘मकसद’ सिनेमाचे गाणे आधी रेकॉर्ड होवून देखील ‘निशान’ एक वर्ष आधी प्रदर्शित झाला.