‘बचना ऐ हसीनो’ या गाण्याचे किशोर कुमारचे फॅमिली कनेक्शन
काही गाण्यांच्या खूप गमती जमती असतात. आपण जेव्हा आजच्या परिप्रेक्षात त्या गाण्याचे सर्व पदर जुळवून पाहतो; तेव्हा नवीन संदर्भ आपल्या लक्षात येतात आणि खूप गंमत वाटते. १९७७ साली प्रदर्शित झालेला ‘हम किसी से कम नही’ हा बम्पर हिट होता. ऋषी कपूर, काजल किरण, तारीक, अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा संगीतमय चित्रपट राहुल देव बर्मन यांनी स्वरबद्ध केला होता. नासीर हुसेन दिग्दर्शित हा सिनेमा फुल एंटरटेनमेंट पॅकेज होता. यातील हरेक गाणं प्रचंड लोकप्रिय ठरले होते. राहुल देव बर्मन यांनी या चित्रपटासाठी अनेक नवनवीन प्रयोग केले होते. या सिनेमांमध्ये तीन वेगवेगळ्या गाण्यांना एकत्र करून एक गाणं बनवलं गेलं होतं. हा सर्वार्थाने नवा आणि वेगळा प्रयत्न होता. ही गाणी होती ‘चांद मेरा दिल चांदनी हो तुम…’ हे रफी ने गायलेले गाणं, त्यानंतर आर डी बर्मन यांनी गायलेलं गाणं ‘तुम क्या जानो मुहोब्बत क्या है दिल की महफिल नही दिल है…’ आणि या गाण्याचे तिसरे रूप होतं किशोर-आशाच्या स्वरातील ‘मिल गया हमको साथी मिल गया…’ या तीन छोट्या छोट्या गाण्यांना एकत्र करून एक छान मेडली आर डी बर्मन यांनी बनवली होती. अर्थात या सर्व गाण्यांवर त्या काळात प्रचलित असलेल्या ABBA या बँडचा मोठा ठसा होता. अर्थात त्याला भारतीय रूप आर डी बर्मन यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलं होतं. (Kishore Kumar)
या चित्रपटातील ‘क्या हुआ तेरा वादा…’ हे मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेले गाणं त्या वर्षीचे बिनाका टॉपचं गाणं होतं. ‘हमको तो यारा तेरी यारी जान से प्यारी’ आणि ‘ये लडका हाय अल्लाह कैसा है दीवाना…’ ही गाणी देखील त्या काळात प्रचंड गाजली होती. एकूणच हा सिनेमा म्हणजे कम्प्लीट फॅमिली इंटरटेनमेंट करणारा तर होताच शिवाय म्युझिकली सुपरहिट होता. आज या चित्रपटातील दुसऱ्या एका गाण्याचा किस्सा सांगायचा आहे. हे गाणं होतं ‘बचना ऐ हसीनो लो मै आ गया…’ किशोर कुमार यांनी गायलेल्या या गाण्यांमध्ये सुरुवातीला ट्रंपेटचा अतिशय सुंदर वापर केलेला दिसतो. त्या काळामध्ये हे गाणं देखील प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. यानंतर तब्बल ३१ वर्षांनी ऋषी कपूर यांचे चिरंजीव रणवीर कपूर यांचा चित्रपट आला होता. चित्रपटाचे शीर्षक होते ‘बचना ऐ हसीनो..’ या चित्रपटात रणवीरची नायिका दीपिका पादुकोण होती. चित्रपटाला संगीत विशाल शेखर यांनी दिले होते. सिनेमाचे शीर्षक ज्या जुन्या गाण्यावरून घेतले होते त्या जुन्या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन ते गाणे या चित्रपटात देखील वापरण्यात आले होते! हे गाणे जसेच्या तसे वापरले नाही त्यात थोडा बदल केला. (Kishore Kumar)
हे गाणे वापरताना संगीतकार विशाल शेखर यांनी तीन गायकांचा वापर केला होता. या गाण्याचा सुरुवातीचा पोर्शन हा जुन्या ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटातील ‘बचना ऐ हसीनो’ या किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्याचा काही भाग होता. दुसरा भाग या चित्रपटाचे संगीतकार विशाल शेखर पैकी विशाल ददलानी यांनी गायला होता तर या गाण्याचा तिसरा भाग किशोर कुमार यांची चिरंजीव सुमित कुमार यांनी गायले होते! म्हणजे गंमत पाहा ऋषी कपूरचा मुलगा रणवीर कपूर! तर किशोर कुमारचे चिरंजीव सुमित कुमार! ऋषी कपूरसाठी स्वर किशोर कुमारचा (Kishore Kumar) तर रणवीर कपूर साठीचा स्वर सुमित कुमारचा! बापासाठी बापाचा स्वर मुलांसाठी मुलाचा स्वर!
======
हे देखील वाचा : बोल्ड तरीही मनाला अंतर्मूख करायला लावणारा : ज्युली
======
या स्टोरीचा आणखी एक अँगल आहे. तो देखील खूप इंटरेस्टिंग आहे. हेच गाणं बंगालीमध्ये आर डी बर्मन यांनी बनवले. पण हे गाणे तिकडे किशोर कुमारने (Kishore Kumar) न गाता त्यांचा मोठा मुलगा अमित कुमारने गायले. हे गाणे देखील भन्नाट आहे. म्हणजे एका गाण्यांमध्ये संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आपल्याला इथे दिसतो. या सर्व तीनही गाण्यांच्या युट्युबची लिंक मी खाली दिलेल्या आहेत. वाचकांनी जरूर त्याचा जरूर आनंद घ्यावा.