Aishwarya Rai: ऐश्वर्याच्या कारकिर्दीची सिल्व्हर ज्यूबली
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)! “ती आली, तिने पाहिलं आणि तिने जिंकलं…!” खरंतर हे तिच्याबाबतीत झालं नाही. १९९४ साली ती जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हाच निश्चित झालं होतं की, ही मुलगी बॉलिवूडमध्ये नक्की येणार! पण बॉलिवूडमध्ये तिचं आगमन होण्यासाठी बराच काळ जावा लागला.
निळे डोळे, गोड चेहरा आणि तब्बल ५ फूट ७ इंच उंची असं आसमानी सौंदर्य लाभलेल्या ऐश्वर्याचा बॉलिवूड प्रवास अजिबात सोपा नव्हता. मुळात तिला पहिला ब्रेक मिळाला तो दाक्षिणात्य चित्रपटामध्ये. मणिरत्नम या गुणी दिग्दर्शकाने आपल्या ‘इरुवर’ या चित्रपटामध्ये तिला पहिला ब्रेक दिला, तो ही चक्क डबल रोल!
‘मिस वर्ल्डच्या मुकुटाने ऐश्वर्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली असली, तरी ती कॉलेजमध्ये असतानापासूनच मॉडेलिंग करायची. त्यामुळे या क्षेत्रामध्ये ऐश्वर्या अगदीच नवखी नव्हती. पेप्सीच्या जाहिरातीत अमीर खानच्या घराबाहेर उभी राहून, “हाय आयम संजना. गॉट अनादर पेप्सी?” म्हणत तिने कित्येकांचा कलेजा ‘खल्लास’ केला होता. परंतु, एवढं सगळं असूनही तिचा ‘स्ट्रगल’ मात्र सुरूच होता.
जसं वाटलं होतं, तशी तिची बॉलिवूडमधली सुरुवात काही भव्यदिव्य, आकर्षक झाली नाही. बॉबी देओल सोबतच्या ‘और प्यार हो गया’ या चित्रपटापासून तिची बॉलिवूडमधली कारकीर्द सुरू झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला, मात्र या चित्रपटामधली गाणी मात्र लोकांच्या लक्षात राहिली. “मेरे सासो में बसा हैं तेराही एक नाम” या गाण्यामधल्या अल्लड, खेळकर ऐश्वर्याने तर, तेव्हा कित्येकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. परंतु, यश मात्र तिच्यापासून कोसो दूर होतं.
जीन्स, आ अब लौट चले, असा एकामागून एक फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला चालूच होता. या चित्रपटांमध्ये तिचा अभिनयही यथातथाच होता. अर्थात या चित्रपटांमध्ये तिला फारसा वावही मिळाला नव्हता. ऐश्वर्या म्हणजे फक्त शोभेची बाहुली अशी प्रतिमा बनत चालली होती. पण अखेर या विश्वसुंदरीला बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो ‘हम दिल दे चुके सनम’ हा म्युझिकल हिटने!
सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या यांचा लव्ह ट्रँगल असणाऱ्या या चित्रपटाची कथा फारशी आकर्षक नव्हती. पण भव्यदिव्य सेट्स, कर्णमधुर संगीत आणि उत्तम दिग्दर्शन यांच्या जोरावर हा चित्रपट सुपरहिट चित्रपटांच्या यादीत जाऊन बसला. या चित्रपटामधली ‘नंदिनी’ साकारताना ऐश्वर्या कुठेही कमी पडली नाही. अर्थात या चित्रपटाने तिच्यावरचा ‘अभिनय येत नाही’ हा ठपका जरी पुसला असला, तरी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविण्यासाठी ऐश्वर्याला बरीच मेहनत घ्यावी लागणार होती.
यानंतर मात्र ऐश्वर्याने मागे वळून बघितलं नाही. एका हिटने तिला स्टारडम मिळवून दिलं होतं, तर त्यानंतर आलेल्या ‘ताल’ या चित्रपटाने तिला ते राखायला मदत केली. या चित्रपटात अक्षय खन्ना, अनिल कपूर यांच्यासमवेत ऐश्वर्याची मध्यवर्ती भूमिका होती. कथानकामध्ये दम नसूनही निव्वळ गाण्यांच्या आधारे हा चित्रपट ठीकठाक चालला आणि ऐश्वर्याच्या खात्यात सुपरहिट नाही, पण अजून एका हिट चित्रपटाची भर पडली. शिवाय सुभाष घई सारख्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम केल्यामुळे ती थेट ‘स्टार’ नायिकांच्या पंक्तीत जाऊन बसली.
त्यानंतर हमारा दिल आपके पास हैं, जोश असे एकामागून एक तगडी स्टारकास्ट असणारे चित्रपट आले, शिवाय काही दाक्षिणात्य चित्रपटातही तिने भूमिका केली, पण ऐश्वर्या केवळ ‘स्टार’च राहिली. अजूनही एक गुणी अभिनेत्री म्हणून तिला रसिकांनी मान्यता दिली नव्हती.
=====
कलाकृती मीडिया ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा – कलाकृती मीडिया इंस्टाग्राम
=====
त्यावेळी खानांची त्रिकुट चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत होती. त्यातही शाहरुख नावाचं वादळ बॉलिवूडमध्ये घोंगावत होतं. परंतु, ‘जोश’ या चित्रपटामध्ये शाहरूखच्या बहिणीची भूमिका केल्यामुळे, दिग्दर्शक ऐश्वर्याचा शाहरुखची नायिका म्हणून विचार करत नव्हते. अखेर मोहब्बते या चित्रपटाने तिला मदतीचा हात दिला. या चित्रपटामध्ये तिला लोकांनी शाहरुखची नायिका म्हणून स्वीकारलं. छोट्याशा पण लक्षवेधी भूमिकेत ऐश्वर्या राय भाव खाऊन गेली. याच काळात दक्षिणेत तिचा ‘कोंडुकांदैन कोंडुकांदैन’ हा चित्रपट गाजत होता.
ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) या नावाचा दबदबा बॉलिवूडमध्ये निर्माणझाला होता. यशाचं एक एक शिखर ती सर करत होती. त्याच सुमारास बॉलिवूडमध्ये ‘माधुरी’ नावाच्या पर्वाचा अस्त झाल्यात जमा होता. राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, करिश्मा या नायिका नंबर १ पदासाठी धडपडत होत्या. मोहब्बतेच्या यशाने ऐश्वर्याही थेट ‘नंबर १’ च्या यादीमध्ये विराजमान झाली.
सन २००२ मध्ये आलेला ‘देवदास’ हा ऐश्वर्याच्या करिअरमधला ‘माईलस्टोन’ म्हणावा लागेल. शाहरुख आणि माधुरीसारख्या कसलेल्या कलाकारांसमोर (स्टार नाही, कलाकार! इथे मुद्दाम कलाकार हा शब्द वापरला आहे) ऐश्वर्या तितक्याच ताकदीने उभी राहिली. इतकंच नव्हे तर, माधुरीसारख्या नर्तकीसोबत ‘डोला रे डोला रे’, या गाण्यावरआत्मविश्वासाने थिरकली. माधुरीसोबतच्या या नृत्यामध्ये ती कुठेही कमी पडली नाही. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ‘सर्वोकृष्ट अभिनेत्री’ म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं. यानंतर मात्र ऐश्वर्या राय (Aishwarya Rai )केवळ स्टार म्हणून नाही, तर अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
अलबेला, ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, अशा चित्रपटांमध्ये केवळ शोभेची बाहुली बनून राहिलेली ऐश्वर्या देवदासच्या यशानंतर मात्र बॉलिवूडमधली नंबर १ ची अभिनेत्री बनली. यानंतर २००३ मध्ये आलेल्या ‘चोखेर बाली’ या बंगाली चित्रपटामधील तिच्या ‘बिंदोनी’ या भूमिकेचे कौतुक झाले, तर रेनकोट चित्रपटातील ‘नीरजा’ या भूमिकेने प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याची नवी ओळख निर्माण केली.
=====
हे देखील वाचा: ऐश्वर्या राय बच्चन ने नाकारलेले पाच चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का??
=====
बॉलिवूडमध्ये नंबर १ पदावर विराजमान झाल्यावर ऐश्वर्याने आपला मोर्चा हॉलिवूडकडे वळवला. ब्राईड अँड प्रिन्यूडईज, द मिस्ट्रेस ऑफ स्पाईसेस, प्रोव्होकड, द लास्ट लीजन, द पिंक पार्टनर २ अशा काही हॉलीवूडचे चित्रपट तिने केले.
याच दरम्यान तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ झाली होती. सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं, पण पुढे २००७ मध्ये ती अभिषेश बच्चनशी विवाहबद्ध झाली आणि या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी ‘ऑनस्क्रीन’ फारशी पसंत केली गेली नाही. अपवाद फक्त ‘गुरू’ या चित्रपटाचा. पण हृतिकची आणि तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री मात्र झकास! धूम २ या चित्रपटामध्ये तर या जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला. परंतु, या जोडीला म्हणावी तेवढी लोकप्रियता मिळाली नाही.
सन २००६ मध्ये धूम २, २००७ मध्ये गुरू, २००८ मध्ये जोधा अकबर, २०१० मध्ये गुजारीश आणि २०१६ मधील सरबजीत या चित्रपटांमधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्डसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ म्हणून नामांकन मिळालं होतं, पण दुर्दैवाने तिला यापैकी एकाही चित्रपटासाठी अवॉर्ड मिळालं नाही. २०१६ साली आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटामधील ‘सबा’ लोकांना भावली. तिच्यासमोर अनुष्का सारखी तरुण अभिनेत्री अगदीच फिकी पडली.
इरूवर पासून सुरू झालेली ऐश्वर्याची कारकीर्द ‘विशेष लक्षवेधी’ अशी म्हणता आली नाही तरी काही काळ तिने ‘नंबर १’ च्या पदावर राज्य केलं आहे, हे विसरून चालणार नाही. तिला तिच्या अभिनयाच्या मर्यादा माहिती होत्या. ‘बोलके डोळे’ या निसर्गदत्त देणगीचा तिने अभिनयासाठी पुरेपूर वापर करून घेतला. सौंदर्याची अनभिज्ञ साम्राज्ञी असणाऱ्या ‘ॲश’ने आजवर ५ भाषांमध्ये मिळून एकूण ४६ चित्रपट केले आहेत. काल तिच्या कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाली. १४ जानेवारीला २५ वर्षांपूर्वी ‘इरुवर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
मंगलोरच्या एका तुळू कुटुंबामध्ये १ नोव्हेंबर १९७३ रोजी जन्माला आलेल्या ऐश्वर्याला मुळात आर्किटेक्ट व्हायचं होतं. परंतु, हौस म्हणून सुरू केलेल्या मॉडेलिंगने तिचं आयुष्यच बदललं.
आयुष्याच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना बॉलिवूडमधल्या कारकिर्दीची सिल्व्हर ज्यूबली साजरी करणाऱ्या या सौंदर्यवतीने प्रचंड मेहनतीने स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं आहे. तिचा हा प्रवास असाच चालू राहू दे. सध्या ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रापंचिक जबाबदाऱ्या निभावण्यात व्यग्र आहे. पण तिचे चाहते मात्र तिच्या नव्या इनिंगच्या प्रतीक्षेत आहेत.
=====
कलाकृती मीडिया ला युट्यूब वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा – कलाकृती मीडिया युट्यूब
=====