2024 Flashback २०२४ वर्षात ‘या’ लोकप्रिय कलाकारांनी बांधली लगीनगाठ
ह्या वेबसिरीजनी गाजवला CCSSAचा कौतुकसोहळा..
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागलं आणि घड्याळाच्या काट्यांवर धावणारी दुनिया घरात कैद झाली. या महामारीच्या ताणतणावापासून दूर राहण्यासाठी लोकांनी मनोरंजन विश्वाला जवळ केलं. जुन्या मालिका, चित्रपट, रिऍलिटी शोज पुन्हा एकदा टीव्हीवर बघता येऊ लागले. थिएटर्स बंद असल्यामुळे चित्रपट व्यावसायिकांसमोर मोठाच पेचप्रसंग उभा राहिला. त्यावरही मात करत त्यांनी ‘ओव्हर द टॉप’ अर्थात ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचा आधार घेत प्रेक्षकांपर्यंत आपले चित्रपट पोचवले. कोरोना येणं, व्यवसाय बंद पडणं आणि ओटीटी च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही प्रक्रिया काही एका रात्रीत घडलेली नाही. थिएटर्समध्ये रमणारा प्रेक्षकवर्ग ओटीटी वर विसंबून राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यावर रिलीज होणाऱ्या वेबसिरिजेस. सेन्सॉरशिपचं कसलंही बंधन नसलेला कंटेंट प्रेक्षकांना या वेबसिरिजेसमधून मिळाला. तीन तासांत संपणाऱ्या चित्रपटांची कथा तीन सिझन झाले तरी संपेचना, असं चित्र या वेबसिरिजेसमधून तयार झालं. बाहेर संचारबंदी चालू आणि घरात बसून मिळणारा फावला वेळ यामुळे साहजिकच प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म्सची भुरळ पडली.
प्रेक्षकांचा वाढता सहभाग पाहता आपली जबाबदारी ओळखून या प्लॅटफॉर्म्सनेदेखील अतिशय दर्जेदार आणि तगड्या कंटेंट्सने समृद्ध असलेल्या वेबसिरिजेसचा खजिना प्रेक्षकांसमोर उघडा केला. २०२०मध्ये रिलीज झालेल्या काही उत्कृष्ट वेबसिरिजेसचा कौतुकसोहळा नुकताच पार पडला. ‘क्रिटिक्स चॉईस शॉर्ट्स अँड सिरिजेस अवॉर्डस’ (CCSSA) च्या निमित्ताने २०२०मध्ये आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर वेबसिरिजेसमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेल्या कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली. चला तर, एक नजर टाकूयात या पुरस्कार विजेत्यांवर..
१. सर्वोत्कृष्ट अभिनेता: प्रतिक गांधी (Pratik Gandhi) (स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी)
१९९२च्या शेअर मार्केट घोटाळ्याचा सूत्रधार हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मार्केटमधला सामान्य ब्रोकर ते दलाल स्ट्रीटचा बादशहा बनण्यापर्यंतचा हर्षदचा प्रवास प्रतिकने अगदी लीलया साकारला. कूटनीतीची झलक असणारं त्याचं स्मितहास्य आणि जबरदस्त संवादफेक या भांडवलाच्या जोरावर त्याने जयदीप अहलावत, बॉबी देओल, के के मेनन आणि दिव्येन्दू शर्मासारख्या तगड्या प्रतिस्पर्धींना मागे टाकत या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.
२. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: सुष्मिता सेन (Sushmita Sen) (आर्या)
प्रदीर्घ कालावधीनंतर ‘आर्या’ (Aarya) वेबसिरीजमधून सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली. ‘हॉटस्टार’वर रिलीज झालेल्या या सिरीजमध्ये सुष्मिताने आर्या सरीन ही व्यक्तिरेखा साकारली होती. एक संसारी, हळवी स्त्री आणि शांत, संयमी तरीही कणखर अशी गँगलीडर ही दोन्ही रूपे सक्षमपणे साकारत सुष्मिताने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे.
३. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) (पाताल लोक)
‘द स्टोरी ऑफ माय अससीन्स’ (The Story of My Assassins) या कादंबरीवर आधारित असलेली ‘पाताल लोक’ ही सिरीज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली. ‘हाथोडा त्यागी’ ही भूमिका साकारणाऱ्या अभिषेकने अगदीच कमी संवाद असूनही आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याची धारदार नजरच त्याचा खुनशीपणा दाखवण्यासाठी पुरेशी होती.
४. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee) (पाताल लोक)
स्वस्तिका मुखर्जीने साकारलेली डॉली मेहरा ही एका पत्रकाराच्या बायकोची भूमिका ‘पाताल लोक’ (Paatal Lok)च्या इतर व्यक्तिरेखांपेक्षा पूर्णतः वेगळी होती. इतर पात्रांप्रमाणे तिला कसल्याही प्रकारची हाव नव्हती, कसलीही लालच नव्हती. नवऱ्याच्या प्रेमासाठी आसुसलेली, मानसिक तणावाला धीराने सामोरे जाणारी, आपल्या पाळीव कुत्रीच्या आधाराने स्वतःच्या आईपणाची जाणीव जपणारी डॉली निश्चितच या पुरस्काराची मानकरी आहे, हे तिचा अभिनय पाहून वाटतं.
५. सर्वोत्कृष्ट लेखन: स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
सुमित पुरोहित, सौरव डे, वैभव विशाल आणि करण व्यास यांच्या लेखणीतून उभी राहिलेली ‘स्कॅम’ (Scam 1992) प्रेक्षकांना भावली, ती त्यातील सहजसोप्या भाषेमुळे. शेअर मार्केट आणि बँकिंग क्षेत्रातल्या किचकट व्याख्या अगदीच सोप्या भाषेत प्रेक्षकांसमोर उलगडत गेल्याने सिरीज कुठेही रटाळवाणी वाटली नाही. शेअर मार्केटशी दूरवर काही संबंध नसलेल्या प्रेक्षकांपर्यंतही ही मालिका व्यवस्थित पोहोचली याचं जास्तीत जास्त श्रेय तिच्या कथा, पटकथा आणि संवादलेखनालाच जाते.
६. सर्वोत्कृष्ट सिरीज: स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी
उत्कृष्ट लेखन, प्रभावी दिग्दर्शन आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय या त्रिसूत्रीचा अचूक मेळ साधत ‘स्कॅम’ने निर्विवादपणे आपलं वर्चस्व गाजवलं. नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ अश्या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला टक्कर देत SonyLIVच्या या सिरीजने सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. हंसल मेहता दिग्दर्शित ही वेबसिरीज पत्रकार सुचेता दलाल आणि देबाशीष बासू यांच्या ‘द स्कॅम: व्हू वोन, व्हू लॉस्ट, व्हू गॉट अवे’ या पुस्तकावर आधारित होती.
CCSSA च्या या पुरस्कार सोहळ्यात लघुपट विभागामध्ये शाझिया इक्बाल दिग्दर्शित ‘बेबाक’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार तसेच शाझिया इक्बाल यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका या पुरस्काराने गौरविण्यात आले. पितृसत्ताक समाजव्यवस्थेने स्त्रियांवर घातलेल्या निर्बंधांना हा लघुपट वाचा फोडतो. या लघुपटात सारा हाश्मी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. आदिल हुसेन यांना ‘मिल’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर अमृता सुभाषला ‘बूथ’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वेगवेगळ्या संवेदनशील विषयांना हात घालत भाष्य करणारे असे हे लघुपट नक्कीच बघायला हवेत, असं मत जाणकारांनी यावेळी प्रदर्शित केलं.