जेव्हा पाकिस्तानी राष्ट्राध्याक्षांकडून फिरोज खान यांच्या सिनेमांवर बंदी घातली गेली!
हिंदी चित्रपटाच्या दुनियेत अजूनही ज्यांचा उल्लेख ‘स्टायलिश खान’ म्हणून होतो त्या फिरोज खान यांच्या चित्रपटांवर पाकिस्तान मध्ये बंदी घालण्यात आली होती. एवढंच नाही तर, त्यांना पाकिस्तानमध्ये प्रवेश बंदीदेखील घालण्यात आली आणि त्यांना तत्काळ पाकिस्तान देश सोडण्याचा आदेश दिला होता! (When Pakistan bans Feroz Khan)
फिरोज खान त्या काळात जगभर जिथे जिथे हिंदी चित्रपट पोहोचतोय तिथे त्यांच्या ‘स्टायलिश’ अदाकारीने प्रेक्षकांमध्ये जबरदस्त फेमस होते. त्यांचे अपराध, धर्मात्मा, कुर्बानी, जांबाज, दयावान हे चित्रपट सर्वत्र प्रचंड लोकप्रिय ठरले होते. पाकिस्तानमध्ये देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. असं असतानाही पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या चित्रपटांवर बंदी घातली. काय होता हा किस्सा?
२००५ साली फिरोज खान यांचे धाकटे बंधू अकबर खान यांनी ‘ताजमहल: द इटरनल लव्ह स्टोरी’ हा चित्रपट बनवला होता. हा चित्रपट भारतात फारसा चालला नाही. पण या चित्रपटाबाबत महत्त्वाची नोंद म्हणजे या चित्रपटाला संगीतकार नौशाद यांनी स्वरबद्ध केलं होतं. नौशाद यांनी स्वरबद्ध केलेला हा शेवटचा चित्रपट ठरला. (When Pakistan bans Feroz Khan)
अतिशय भव्य आणि दिव्य अशा प्रमाणात अकबर खान हा चित्रपट बनवला होता. जगभरातील सर्व मुस्लिम राष्ट्रांमध्ये हा चित्रपट त्यांना रिलीज करायचा होता. त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये एप्रिल २००६ मध्ये त्यांनी हा सिनेमा प्रदर्शित करायचा ठरवला. त्यासाठी लाहोरला एक मोठा प्रीमियर शो देखील ठेवला गेला. यासाठी भारतातून ताजमहाल चित्रपटाची संपूर्ण टीम, तसंच अभिनेता फिरोज खान, फरदीन खान, शत्रुघ्न सिन्हा, मनिषा कोईराला आणि दिग्दर्शक महेश भट हे देखील तिथे गेले होते.
लाहोरला मीडियासोबत वार्तालाप करण्यासाठी ही सर्व मंडळी व्यासपीठावर विराजमान झाली. पाकिस्तानातील अनेक सिने शौकीन या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे पाकिस्तानच्या काही वाहिन्यांवरून याचे थेट प्रसारणही करण्यात आलं. या कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकार या कलावंतांना काही प्रश्न विचारत होते. हे प्रश्न जोवर सिनेमाशी निगडीत होते तोवर हा सुसंवाद चांगला चालू होता. परंतु अचानक काही पत्रकारांनी राजकीय, धार्मिक प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यावेळी अभिनेता फिरोज खान यांचा पारा चढला. त्यांनी रागारागात उत्तर द्यायला सुरुवात केली. (When Pakistan bans Feroz Khan)
फिरोज खान म्हणाले, “आमच्या भारत देशात मुस्लिम बांधव सर्वात सुरक्षित आहे. या देशात सर्वधर्मसमभाव, समता आणि शांततेचं वातावरण आहे. इथे राष्ट्रपती मुस्लिम होऊ शकतात. शीख धर्माची व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते. येथील सामान्य लोकांमध्ये चांगला ‘भाईचारा’ आहे. या उलट काही मुस्लीम देशांमध्ये मुस्लिम धर्मीयच परस्परांमध्ये वाद घालून एकमेकांचे मुडदे पाडत आहेत.” या उत्तराने पाकिस्तानी मीडियातील काही पत्रकारांना मिरच्या झोंबल्या.
यानंतर पाकिस्तानी पत्रकारा ‘फकर- ए -आलम’ याने अभिनेत्री मनिषा कोईराला एक प्रश्न विचारला तो पूर्णपणे राजकीय प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना मनिषा कोईराला गडबडून गेली. त्यावर तो पत्रकार गर्विष्ठपणे तिला म्हणाला “मॅडम, ऐसा लगता है मेरे सवाल से आप तो कांपने लगी है. ऐसा करता हूं मै सवाल ही बदल देता हूं.”
मोठ्या उपरोधिकपणे त्याने हा टोमणा मनिषा कोईराला मारला. त्या पत्रकाराचा हा पवित्रा फिरोज खान यांना अजिबात आवडला नाही. ते अतिशय क्रुद्ध झाले आणि उठून जोरात ते पत्रकाराला म्हणाले, “जनाब, अगर आप ने इसी वक्त इस मोहतरमा से माफी नही मांगी, तो मै नही जानता मै आपके साथ मैं क्या करुंगा!”
त्या पत्रकाराने माफी मागायला नकार दिल्यानंतर फिरोज खान रागाने त्या पत्रकारावर धावून गेला. शत्रुघ्न सिन्हा आणि अकबर खान यांनी फिरोज खान यांना पकडलं. त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. पण फिरोज खान प्रचंड चिडले होते. चूक पूर्णपणे त्या पत्रकाराची होती. त्याने मुद्दामहून फिरोज खान यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. कशीबशी पत्रकार परिषद आटोपण्यात आली. हा मुद्दा खूप तापला. पाकिस्तानी जनतेला फिरोज खान यांनी आरसाच दाखवला होता. (When Pakistan bans Feroz Khan)
पाकिस्तानी मिडियाने याला वेगळा रंग दिला. त्या कार्यक्रमात फिरोज दारू पिऊन गेला होता व या नशेतच तो बरळत होता. त्याने आमच्या आदर सन्मानाचा अपमान केला. त्याने पत्रकारावर हात टाकला. वगैरे वगैरे. पुढे फिरोज खान यांची तक्रार थेट पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यापर्यंत गेली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी सल्लामसलत करून चक्क फिरोज खान यांच्या चित्रपटांवर पाकिस्तानमध्ये बंदी घातली. तसंच फिरोज खानला ताबडतोब देश सोडून जाण्याचे फरमान काढले.
महेश भट यांनी प्रकरणाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी देखील फिरोज खान यांनी सांगितलं की, “मी स्वतःहून या देशात आलेलो नाही मला इथे इन्व्हाईट केले आहे. असे असताना येथील मीडिया जाणून-बुजून असे प्रकार करत असेल, तर ते चुकीचं आहे.” या सर्व मंडळींना पाकिस्तानचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. (When Pakistan bans Feroz Khan)
=====
हे देखील वाचा – ‘केजीएफ चॅप्टर २’ चित्रपटाबद्दलच्या १० अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील
====
पाकिस्तानच्या वकिलातीत यावर खूप वातावरण तापले. दिल्लीला तसे कळविण्यात आले. फिरोज खान यांनी दिल्लीत येऊन आपल्या सरकारकडे आपली बाजू स्पष्ट सांगितली. त्यांनी असंही सांगितले की “आमची सिने इंडस्ट्री आमचे चित्रपट इतके जबरदस्त आहेत की, कुठलाही देश फार काळ बंदी घालून आम्हाला रोकू शकत नाही.”
स्वाभिमानी फिरोज खान यांनी आपली बाजू मोठ्या बाणेदारपणे पाकिस्तानमध्ये मांडली होती. त्याचप्रमाणे सोबत असलेल्या महिलेचा परक्या देशात होणारा अपमान देखील त्यांनी तिथल्या तिथे परतवून लावला होता!