एमएक्स प्लेअरवर अवतरणार रामयुग!
एमएक्स प्लेअरच्या माध्यमातून आता वेबसिरीजच्या जगातामध्ये रामयुगाचा प्रारंभ होत आहे. एमएक्स प्लेअर वर 6 मे पासून रामयुग ही भव्यदिव्य वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. रामायण हा प्रत्येक भारतीयाचा आत्मा आहे. आत्तापर्यंत रामायणावर अनेक मालिका येऊन गेल्या आहेत. रामाच्या जीवनावर चित्रपटही आले आहेत. आणि काही येतही आहेत, तरीही रामायण हा कायम उत्सुकतेचाच विषय ठरणार आहे. हे जाणून दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी रामयुग या वेबसिरीजची घोषणा केली. वास्तविक कुणाल कोहली रामयुग नावाचा चित्रपट काढणार होते. मात्र रामायणाचा आवाका काही तीन तासांचा नाही, याचा अंदाज आल्यानं त्यांनी वेबसिरीज काढण्याचा निर्णय घेतला. आता ही वेबसिरीज 6 मे पासून एमएक्स प्लेअरवर पहाता येणार आहे.
रामयुगचा सोशल मिडीयावरील ट्रेलर सध्या चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. यात सीता स्वयंवराचे दृश्य दाखवण्यात आले आहे. राम शिवधनुष्य तोडून पण जिंकतो यापासून ट्रेलरची सुरुवात होते. रामयुग वेबसिरीजमध्ये व्हीएफएक्स आणि स्पेशल इफेक्टचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. युद्धाचे प्रसंग, अयोध्या नगरी, भव्य राजवाडे, लंकेतील रावणाचा महल आदी दृष्यात मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करण्यात आला आहे.
रामयुगमध्ये दिगनाथ मनचले, अक्षय डोगरा, ऐश्वर्या ओझा, कबीर दुहन सिंह, विवान भाटेना, नवदीप पल्लापोलु, अनीश जॉन कोक्कन, शिशिर मोहम शर्मा, जतिन सियाल, श्वेता गुलाटी हे कलाकार आपल्याला दिसणार आहेत. या सर्वांच्या लूकवर खूप परीश्रम घेण्यात आले आहेत. रामायणावर आत्तापर्यंत अनेक मालिका येऊन गेल्या आहेत. त्यामुळे रामयुगमध्ये नाविन्य दाखवण्याचे आव्हान दिग्दर्शकांसमोर होते. यासाठी रामयुगमध्ये कपडे आणि लूक यावर मेहनत घेण्यात आली आहे.
दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी 2018 मध्ये रामयुग या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ साहित्यकार नरेंद्र कोहली यांचीही मदत घेतली. मात्र या प्रोजेक्टची व्याप्ती वाढल्यानं चित्रपट गुंडाळावा लागला. आत्ता तिच टीम या वेबसिरीजवर काम करीत आहे. छोट्या पडद्यावर रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. अरुण गोविल आणि दिपिका चिखलिया यांनी केलेल्या राम – सीता या भुमिका अजरामर झाल्या. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या दरम्यान रामायण मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर दाखवण्यात आली, तेव्हाही या मालिकेच्या टीआरपीनं रेकॉर्ड केला होता. त्यामुळेच कुणाल कोहली यांची जबाबदारी वाढली आहे. अर्थात कुणाल कोहली रामयुग वेबसिरीजबाबतही खूप उत्सुक आहेत. सर्व कलाकारांनी उत्तम काम केले असून त्यातील स्पेशल इफेक्ट खास असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
रामयुग ही वेबसिरीज असली तरी प्रभु श्रीराम यांच्यावर आदिपुरुष हा थ्रीडी चित्रपटही येत आहे. दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा भव्य प्रोजेक्ट असून त्यात सुपरस्टार प्रभास रामाच्या भुमिकेत आहे. हिंदी, तेलुगु भाषेत येणारा आदिपुरुष तमिळ, मलयालम आणि कन्ऩड भाषेमध्ये डब करण्यात येणार आहे.
यात प्रभाससोबत कृती सेनॉन आणि सैफ अली खानही दिसणार आहेत. याशिवाय अक्षय कुमारचा रामसेतू चित्रपटही प्रभू श्रीरामाच्या जीवनावर नव्यानं प्रकाश टाकणारा असणार आहे. या चित्रपटाचा मुहर्त अक्षयनं थेट अयोध्येमध्ये श्रीरामाच्या आशिर्वादानं केल्यानं या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्थात या चित्रपटांपूर्वी रामयुग पहाता येणार आहे. एमएक्स प्लेअरवर 6 मे पासून या रामयुगमुळे पुन्हा रामायण मालिकेच्या आठवणी ताज्या होणार हे नक्की…