दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
स्वतंत्र भारताच्या पहिल्या गवर्नर जनरल समोर लहानग्या वहिदा ने दिला पहिला परफॉर्मन्स!
कलावंतांचे लहानपणीचे किस्से मोठे इंटरेस्टिंग तर असतातच पण इन्स्पिरेशनल देखील असतात. अभिनेत्री वहिदा रहमान हिच्या आयुष्यातील एक घटना हेच सांगून जाते. वहिदा (Wahida) जेव्हा लहान होती त्यावेळेला तिला डॉक्टर बनायचे होते. तिचे वडील ब्रिटिशकालीन आयसीएस ऑफिसर होते. त्यामुळे घरात अभ्यासाचे वातावरण होतेच. परंतु वयाच्या आठव्या वर्षी वहिदा रहमान आजारी पडली आणि तिला परीक्षा देता आले नाही. त्यानंतर तिचा आजारपण वाढत गेला आणि हळूहळू अभ्यासापासून ती दूर जाऊ लागली. ती शाळेत जात होती परंतु अभ्यासात तिचे लक्ष लागत नाही. त्याचवेळी तिने भरतनाट्यम हे नृत्य शिकायला सुरुवात केली. वहिदा (Wahida) शाळेच्या अभ्यासासोबतच आपल्या घरी आरशासमोर पाहून चेहऱ्यावर वेगवेगळे अविर्भाव करत अभिनय करीत असे. वहिदाच्या वडिलांना हा प्रकार फारसा आवडला नाही. ते तिला म्हणाले ,” तू डॉक्टर तर काही बनणार नाहीस. मान्य आहे. पण हे काय डोक्यात खुळ घेतल आहेस?” त्यावर ती म्हणाली,” मला समाजाला अभिनय करून मनोरंजन करायचे आहे. लोकांना हसवायचे आहे. रडवायचे आहे.” लहान मुलीच्या तोंडून हे शब्द ऐकून तिच्या वडिलांना आश्चर्य वाटले. त्यांनी फक्त स्मित हास्य केले. परंतु वहिदा आपल्या मुद्द्यावर कायम होती. ती म्हणाली,” तुम्ही बघा एक दिवस मी माझे नाव आणि माझा फोटो वर्तमानपत्र छापून येईल!” यावर तिच्या बहिणी खूप हसल्या कारण त्यांना वहिदाचे ते बोल खरे वाटले नाही. परंतु वहिदाने (Wahida) आता अभिनय आणि नृत्य यातच करिअर करायची ठरवले होते.ती त्याचाच अभ्यास करू लागली.
ती जेव्हा बारा वर्षाची होती त्यावेळी विशाखापट्टणमला स्वतंत्र भारताचे पहिले गवर्नर जनरल सी राजगोपालचारी येणार होते. तिचे वडील आयसीएस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे गवर्नर जनरल यांच्या विशाखापट्टणम दौऱ्याची जबाबदारी होती. त्यावेळी त्यांच्या सन्मानार्थ संध्याकाळी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करायचे ठरवले. या कार्यक्रमासाठी प्रख्यात कलावंत एम एस सुब्बालक्ष्मी यांना आमंत्रित करायचे ठरले. परंतु त्याच वेळी गवर्नर जनरल यांच्या ऑफिसमधून एक सूचना रहमान साहेब यांच्याकडे आली. त्यात त्यांनी त्यांना लोकल आर्टिस्ट यांची कला पाहायची आहे असे सांगितले. आता रहमान साहेबांना प्रश्न पडला. आयत्या वेळी कोणते लोकल कलावंत उभे करायचे ? या विचारात असताना त्यांचे सहकारी त्यांना म्हणाले ,”रहमान साहेब तुमची मुलगी देखील चांगला अभिनय आणि नृत्य करते तिलाच आपण इथे संधी देऊया!” त्यावर रहमान साहेब म्हणाले , नको, ती अजून शिकत आहे आणि तिने अजून कुठलाही पब्लिक परफॉर्मन्स दिलेला नाही! आणि थेट गवर्नर जनरल यांच्यासमोर ती कसं काय आपली कला दाखवू शकते?” त्यावर त्यांचे सहकारी म्हणाले,” इथे कुठे स्पर्धा आहे? साहेबांना स्थानिक कलावंतांची कला पाहायचे आहे!” शेवटी हो नाही करत असताना रहमान साहेबांनी होकार दिला.
संध्याकाळी त्यांनी घरी गेल्यानंतर वहीदा ला या कार्यक्रमाची कल्पना होती. वहिदाला (Wahida) अर्थातच खूप आनंद झाला. तिने ताबडतोब काय करायचे ते ठरवले. एक स्कीट तिने स्वत:च फायनल केले. या स्कीटमध्ये सर्व काही होते. नृत्य होते, अभिनय होता, मिमिक्री होती! ऑल-इन-वन असे ते पॅकेज होते. गवर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांच्यासमोर वाहिदाने मोठ्या दणक्यात आपले स्कीट सादर केले . गवर्नर जनरल साहेबांना ते स्कीट खूप आवडले. त्यांनी जवळ बोलून वहीदाची चौकशी केली. तिला शाबासकी दिली. आणि तिला एक मेडल बक्षीस दिले. अशा पद्धतीने भारताच्या पहिल्या गवर्नर जनरलच्या समोर वहिदाने (Wahida) आपले पहिले स्कीट सादर केले. ज्या वेळी सी राजगोपालाचारी यांना स्कीट करणारी मुलगी वहिदा ही मुस्लीम आहे कळले तेंव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले कारण त्यातील भरत नाट्यमच्या मुद्रा एक छोटी मुस्लीम मुलगी कशी काय करू शकेल? त्यांनी वाहिदाच्या वडिलांचे कौतुक केले. तेंव्हा तिचे वडील म्हणाले ,” कला का कोई मजहब नही होता…!”
======
हे देखील वाचा : पन्नास वर्षापूर्वीचा प्रोतिमा बेदीचा ‘बोल्ड’ धमाका!
======
दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचा संपूर्ण वृत्तांत तिथल्या स्थानिक व वृत्तपत्रात छापून आला त्यात वहिदा(Wahida) रहमानचा फोटो देखील होता. तिने तो पेपर पुढे खूप वर्ष जपून ठेवला होता. वर्तमानपत्रात आपले छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर तिने आपल्या वडिलांना सांगितले,” मी म्हणाले होते ना एक दिवस माझा फोटो पेपरमध्ये छापून येईल म्हणून!” हा किस्सा वहिदा ने टीव्ही वर एका मुलाखतीत सांगितला होता तिच्या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहेच!
धनंजय कुलकर्णी