Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची गोष्ट २’ चा हटके टीझर प्रदर्शित!
बऱ्याच दिवसांनी अभिनेता ललित प्रभाकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे… एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट सांगणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपटाचा हटके टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
दरम्यान, २०१३ मध्ये आलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. घटस्फोटासारख्या सामाजिक विषयावर भाष्य करत, या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केला. तरुण आणि वयस्क अशा दोन्ही प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दर्शवली. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग’ प्रेमाची गोष्ट २’ प्रेक्षकांचं मन जिंकेल का हे पाहणं गरजेचं असणार आहे…

चित्रपटाच्या टीझरमध्ये ललित प्रभाकरसह अभिनेता स्वप्नील जोशी व भाऊ कदमही दिसत आहेत. आबुराव आणि बाबुराव अशी यांच्या पात्राची नावे असून त्यांनी चित्रपटाला अजूनच रंगत आणली आहे. ललित घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात आलेला दिसत असून प्रेमात त्याचा निर्णय चुकल्यामुळे तो देवाला दोष देत असल्याने प्रत्यक्ष देवानेच ‘होऊ दे तुझ्या मनासारखं’ म्हणत त्याला त्याच्या नशीबातलं प्रेम बदलण्याचा एक चान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संधीने ललितचे नशीब खुलेल का? हे पाहाणे नक्कीच रंजक ठरेल. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरसह अभिनेत्री ऋचा वैद्य व रिधिमा पंडित यांचा दमदार अभिनय पाहायला मिळेल.
==================================
हे देखील वाचा: Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या गाथा !
==================================
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.