लता मंगेशकर : एक विद्यापीठ
मुंबईतील अंधेरीतील भव्य क्रीडा संकुलात राज ठाकरे यांनी १९९६ साली ‘लता मंगेशकर संगीत रजनी’चे आयोजन केले असताची आठवण. भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्टेजपासून अवघ्या चौथ्या रांगेतच मी असल्याने लतादीदी यांच्या गायनाचा आनंद तर झालेच पण अगदी त्या स्टेजवरील वादकाना एकादी छोटी सूचना करत याचेही दर्शन घडे. तेव्हा प्रकर्षाने लक्षात आले की, आपणच यापूर्वी गायलेल्या अनेक गाण्यातील बारकावे आजही त्यांच्या लक्षात आहेत. तात्पर्य, त्यांनी चित्रपटासाठी पाश्वगायन करताना ‘आजचे रेकाॅर्डिंग झाले’ अशा भावनेने त्या बाहेर पडल्या नाहीत, तर त्यांनी त्यावेळच्या गाण्याचा अनुभवही आपल्यासोबत ठेवला. आपल्या कामातील भावनिक गुंतवणूक आणि बांधिलकी म्हणतात ती हीच.
लता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे.
भारतीय चित्रपट, त्याचे संगीत आणि सर्व प्रकारचे संगीत यांची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर!
एक प्रकारचे विद्यापीठ. ज्यात एकीकडे संगीत कला आहे तर दुसरीकडे छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद/आस्वाद घेण्याचा स्वभाव आहे. एकीकडे भारतातील संगीत वाटचालीतील त्या दीर्घकालीन सहभागी/साक्षीदार आहोत तर दुसरीकडे त्याने भावगीते असोत अथवा चित्रपटातील विविध मूडची गाणी असोत त्या सगळ्याना न्याय देताना स्वतः आनंद घेत तोच आनंद इतरांनाही दिला आहे. त्यानी आजपर्यंत किती गाणी गायली, किती प्रकारची गाणी गायली, किती भाषांतील गाणी गायली या सगळ्याच्या पलिकडे जाऊन त्यांची ‘संगीत क्षेत्रातील यशस्वी आणि चौफेर वाटचाल सुरु आहे’. लता मंगेशकर हा असा एका लेखाचा अथवा स्फूट यांचा विषय नाही, तर त्यावर कितीही ऐकावे/सांगावे तितके थोडेच आहे.
हे वाचलेत का ? मराठी संगीताच्या सुवर्णयुगाचे आधारस्तंभ श्रीनिवास खळे
एकच व्यक्ती इतकी व्यापक आणि चौफेर कारागिरी करुनही वयाच्या ९२ व्या वर्षीही दररोज ट्वीट करत आपण आजच्या डिजिटल युगातही कार्यरत आहोत हे सिद्ध करते आता आणखीन काय हवं? संगीत क्षेत्रातील अनेकांच्या वाढदिवस अथवा स्मृतीदिनी लताजींचे ट्वीट हमखास असतेच. त्यानी १९४२ साली ‘किती हंसाल’ या मराठी चित्रपटासाठी संगीतकार सदाशिवराव नेवरेकर यांच्याकडे पहिले गाणे गायले तेव्हा फक्त मुद्रित माध्यम होते (दुर्दैवाने ते गाणे त्या चित्रपटात समाविष्ट करण्यात आले नाही), त्याच वर्षी त्यानी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात भूमिकाही साकारली. ‘छत्रपती शिवाजी’ (१९५२) या हिंदी चित्रपटापर्यंत त्यांनी मराठी व हिंदी मिळून नऊ चित्रपटात भूमिका साकारल्या. त्यानी आनंदघन या राम राम पाव्हणं (१९५०), मोहित्यांची मंजुळा(१९६२), मराठा तितुका मेळवावा (१९६४), साधी माणसं (१९६५), तांबडी माती (१९६९) या चित्रपटांना संगीत दिले. लताजींचे अष्टपैलूत्व इतक्यावरच थांबत नाही. तर ‘वादळ’ (१९५३) या मराठी चित्रपटाबरोबरच त्यांनी ‘झांझर’ (१९५३), ‘कंचन’ (१९५५) , ‘लेकिन’ (१९८८) या चित्रपटांचीही निर्मिती केली आहे. ‘लेकिन’ या पुनर्जन्माची थीम असलेल्या चित्रपटाचा मुहूर्त परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओत रंगला. हा मुहूर्त लताजींच्या वाढदिवशी म्हणजे २८ सप्टेंबर १९८७ रोजी झाला. चित्रपती व्ही शांताराम आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
तेव्हा लताजींना या चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी झालेली औपचारिक भेटही माझ्या कायमच लक्षात राहणारी ठरली. तेव्हा मी मिडियात नवखा होतो आणि लताजींसारख्या मोठ्या व्यक्तीमत्वाला भेटताना माझ्यावर दबाव असणे स्वाभाविक होतेच आणि त्यात गैर काहीच नाही. या चित्रपटात विनोद खन्ना, डिंपल कपाडिया आणि अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लताजींच्या प्रगती पुस्तकातील चांगले गुण सांगावे तेवढे थोडेच. नायिका, गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक इतकेच नव्हे तर प्रेक्षकांचीही पिढी बदलली, पण त्यात लताजींची गायनाची वाटचाल दुतर्फा कायम राहिली. एका बाजूला त्या चित्रपटासाठी गायल्या, दुसरीकडे त्या स्वतंत्र म्हणजे चित्रपटाबाहेरही गायल्यात. दोन्हीच्या शैलीत मोठा फरक आहे आणि तो त्यांनी आत्मसात केला. चित्रपटासाठी पाश्वगायन करताना आपण कोणत्या अभिनेत्रीसाठी गातोय, तिचे व्यक्तीमत्व कसे आहे, बोलण्याची पध्दत कशी आहे, चित्रपटात तिची व्यक्तिरेखा कशी आहे, पटकथेत या गाण्याचे स्थान कसे आहे हे सगळे जाणून त्या गात राहिल्याने पडद्यावर गाणी पाहताना ती अभिनेत्रीच जणू गात आहे असा फिल देण्यात त्या कायमच यशस्वी ठरल्या. त्या गाण्याचे व्यक्तीमत्व आपल्या गायकीत साध्य करण्याची त्यांची खुबी कौतुकाची आहे. नायिकांची पिढी बदलूनही ती आपल्या त्याच आवाजात गात राहिल्या आहेत. काजोलसाठी त्या जशा गायल्यात तशाच त्या तिची आई तनुजा आणि मावशी नूतन यांच्यासाठीही गायल्या.
गैरफिल्मी गाण्यात तर त्यांनी भावगीते, भजन, कीर्तन, कोळीगीते वगैरे वगैरे बरेच काही ‘सूर ‘ रसिकांना दिले. इतक्या प्रकारची गाणी आणि तेही तेवढ्याच सातत्याने गायचे हे फक्त आणि फक्त विलक्षण प्रतिभा असल्यानेच साध्य होते आणि त्यासाठी रियाज, आवड, सकारात्मक दृष्टिकोन अशा गोष्टी अंगी असाव्या लागतात.
लताजींच्या इतर आवडीनिवडीही खूप. पेडर रोडवरील आपल्या प्रभू कुंज या निवासस्थानी अनेक वर्षे त्यांनी स्वयंपाकाची हौस कायम ठेवली. तसेच क्रिकेट पाहणे, अनेक नामवंत क्रिकेटर्सना आपल्या घरी बोलावणे, देश विदेशात कुठेही फिरायला गेल्यावर आवडीने एकादा फोटो काढणे याची हौस कायम ठेवली.
हे तर वाचायलाच हवे : ह्यांचा उल्लेख नेहमी ‘फ्लॉप सिनेमाचा हिट संगीतकार’ असा होतो! का…?
लताजींच्या बाबतीत लहान मोठ्या अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्या अनुभवच त्यांच्या गायनाची एक मोठी वाटचाल आज या टप्प्यावर येऊन पोहचलीय. आणि अशा वेळी त्यांची आवडती गाणी सांगावीत तितकी थोडीच आहेत हेही लक्षात येते आणि हे त्यांचे केवढे तरी मोठे यश आहे.
लताजी गायिका म्हणूनही श्रेष्ठ आणि व्यक्ती म्हणूनही ग्रेट. आपल्या गायनाचा आज विशिष्ट टप्पा त्यांनी गाठल्याने त्यांचे खूप खूप अभिनंदन!