महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
जेव्हा आशाजी रेकॉर्डिंगसाठी चेन्नईला गेल्या आणि स्टुडिओमध्ये वादकच नव्हते तेव्हा…
गीत, संगीत व नृत्य ही आपली संस्कृती. आपल्याकडच्या सर्वच धर्मातील जवळपास प्रत्येक सणात कमी अधिक प्रमाणात ते असतेच. अगदी गोविंदा गीतापासून भांगडा/गरबा वगैरे पर्यंत ही संस्कृती आपण जपली आहे. याचेच प्रतिबिंब आपल्या हिंदी तसेच मराठीसह सर्वच प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत दिसते. गीत संगीत म्हटल्यावर नृत्यही आलेच (अगदी गीत नसले तरी पाश्वसंगीत असतेच). आपल्याकडच्या चित्रपटांचे हे जगावेगळं वैशिष्ट्य आणि वेगळेपण आहे. आणि त्यात प्रत्येक पार्श्वगायकाची शैली, ओळख, प्रतिभा, क्षमता वेगळी असते आणि तीच त्यांची ओळख बनते. भारतातील प्रतिभासंपंन्न गायकांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे, आशा भोसले (Asha Bhosle).
आशा भोसले यांच्या क्षमतेबद्दल लिहायचं तर, खरोखरच शब्द अपुरे पडतात. वयाच्या ८९ व्या वर्षीही तीच उमेद आणि तोच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवून कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात त्या लोणावळ्याला होत्या. पण आराम करत, छान हवेत रमल्या आणि जुन्या आठवणीत रमल्या आहेत असे काही झाले नाही. ‘वय’ हा त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त एक आकडा आहे.
आशाजी नेहमीच आधुनिक युगाशी समरस होतात. त्यांनी स्वतः यू ट्यूब चॅनलही सुरू केलेय, त्यातून काही जुन्या आठवणी त्या व्यक्त करतात शिवाय नवीन आवाजाला त्यांनी आवाहन केले आणि जगभरातून त्यांना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. नवीन आवाज त्या ऐकतात हा त्यांच्यातील खूप वेगळा गुण आहे. विशेष म्हणजे आजही त्यांना कामाचा कंटाळा नाही. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात त्या आल्या तेव्हा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना दोन तास वाट पहावी लागली, पण त्या अजिबात कंटाळल्या नाहीत. अगदी दिवसभर थांबायचीही तयारी होती, आपल्याला काम करायचेच आहे, तर थांबायला काय हरकत आहे, अशी भावना त्यांनी तेव्हा व्यक्त केली होती.
आशा भोसले यांच्यावर ‘लेख लिहिणे’ म्हणजे फक्त वाळूचा कण आहे. खूपच मोठी यशस्वी मेहनती वाटचाल आणि त्यातील विविधता एका लेखात बसवणे शक्यच नाही. मराठी आणि हिंदी चित्रपट गीते झालीच, अन्य भाषेतील चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले आहे, तर दुसरीकडे भावगीते आणि अनेक प्रकारची गैरफिल्मी गाणीही त्यांनी गेली. पण त्यानी मोजून मापून काम केले अथवा नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी त्या गायल्या/ गातात असे अजिबातच नाही. ती त्यांची वृत्तीच नाही. आपल्या कामाचा भरभरून आनंद घेत इतरांनाही तो द्यावा अशा मोकळ्या ढाकळ्या स्वभावाच्या त्या आहेत. अतिशय गप्पिष्ट असा त्यांचा स्वभाव आहे. एकदा त्यांचा दौरा सुरु होण्यापूर्वी पेडर रोडवरील ‘प्रभू कुंज’ या त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीचा योग आला असता ( फोटो तेव्हाचा आहे) त्यानी सांगितलेल्या गोष्टींतील काही आवर्जून सांगतो. (Lesser known story of Asha Bhosle)
फार पूर्वी एकेका चित्रपटाचे एकेका गाण्याचे रेकाॅर्डिंग म्हणजे खूप मोठा आणि प्रत्येक वेळी वेगळा अनुभव असे. एकेका गाण्यासाठी सिटींग होत असे. त्यात गाण्याची चित्रपटातील जागा, गाण्याचे स्वरुप, कोणावर चित्रीत होणार अशा अनेक लहान मोठ्या तपशिलांचा विचार केला जाई. अनेक तास सिटींग चाले. त्यातच अनेक चाली सुचत. विविध कारणास्तव त्या नाकारल्या जात आणि अखेर एखादी निश्चित केली जाई.
प्रत्यक्ष रेकाॅर्डिंगच्या वेळी त्या चित्रपटातील कलाकार आवर्जून हजर राहत असत. आम्हा गायकांनाही आपले गाणे पडद्यावर साकारणारी अभिनेत्री प्रत्यक्षात कशी बोलते याचा आलेला प्रत्यय गाण्यात वापरता येई आणि आम्ही नेमके कसे गायलोय, कुठे चढ उतार घेतले हे त्या अभिनेत्रींनी प्रत्यक्षात अनुभवल्याने त्याचा उपयोग त्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी करीत. त्यामुळे पूर्वीची अनेक गाणी आम्ही गात नसून ती व्यक्तिरेखा आणि ती अभिनेत्री गातेय असेच वाटते. तसेच त्यावेळी सगळा वाद्यवृंद्य एकसाथ वादन करे आणि आम्ही गायक त्यासह गात असू. रिहसर्लचा त्यासाठी फायदा होत असला तरी अनेक रिटेकही होत. सगळ्यांना परफेक्शनचा ध्यास असे. सर्व पातळीवर मेहनत घेतल्याने तेव्हाची गाणी आजही लोकप्रिय आहेत. (Lesser known story of Asha Bhosle)
आशा भोसले यांच्या बोलण्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. आशा भोसले यांनी चित्रपट गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या बदललेल्या पध्दतीचाही कालांतराने अनुभव घेतला.
रामगोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ (१९९५) निर्मितीवस्थेत असतानाची गोष्ट. आशा भोसले या चित्रपटातील एका गाण्याच्या रेकाॅर्डिंगसाठी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे गेल्या होत्या. रेकाॅर्डिंग स्टुडिओत पोहचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, एकही वादक हजर नाही. असे कसे झाले? गाण्याचे रेकाॅर्डिंग म्हणजे अनेक प्रकारच्या वादनासह वादकांचा प्रचंड ताफा हवा. त्यांना इतकीच सूचना मिळाली होती की, “हे गाणे अशा अशा पध्दतीने (मूडने/शैलीने) गायचे आहे. ‘एक नवीन अनुभव’ असे मानतच त्या गायल्या आणि मुंबईत येऊन आपल्या कामात व्यग्र झाल्या. काही दिवसांनी ‘रंगीला’ चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफीत प्रकाशित झाली आणि आशाजींनी गायलेले तेच गाणे त्यांनी ऐकले आणि त्या अवाक झाल्या. त्या गाण्यावरचा संगीत साझ आणि त्याची उच्च तांत्रिक मूल्ये ‘ऐकून’ त्या गुणगूणू लागल्या – “तनहा तनहा यहां पे जीना. यह कोई बात है….”
त्या काळात आशाजी आपल्या ‘लाईव्ह काॅन्सर्ट’ आणि मुलाखतींमध्ये हा अनुभव अतिशय रंगवून खुलवून सांगत आणि संगीतकार ए. आर. रेहमान यांनाही दाद देत. गाण्याच्या रेकाॅर्डिंगच्या या पध्दतीशी ए. आर. रेहमानने आपल्या प्रतिभेने जुळवून घेतल्याचे त्याना विलक्षण कुतूहल आणि कौतुक वाटत असे. (Lesser known story of Asha Bhosle)
आशा भोसले यांनी महेश कोडियाल दिग्दर्शित ‘माई’ (२०१३) या चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली आहे. या चित्रपटात राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली तेव्हा त्यांचे प्रत्यक्षातील वय ७९ इतके होते, तर ही भूमिका अल्मायझर झालेल्या ६४ वर्षांच्या स्त्रीची होती. गायन असो वा अभिनय यात सोपे असे काहीच नाही, असे मत त्यांनी त्यावेळी व्यक्त केले होते. तर आजच्या चित्रपट गीतामधून ‘एक्सप्रेशन मेलडी’ (गाण्याचा भावार्थ) पूर्णपणे हरवला आहे, प्रत्येक गाण्याला आपलं एक व्यक्तीमत्व असते आणि तेच आज नेमके हरवले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
=================
हे ही वाचा: ‘या’ कारणासाठी किरण रावने आमिर खानला चक्क तीन आठवडे ठेवले कोंडून
बॉलिवूडच्या ‘या’ नायिकांचे होते अंडरलवर्ल्डशी संबंध
=================
आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा वेध घ्यायचा, तर एक महामालिका तयार करावी लागेल, तरीही त्यात काही ना काही कमतरता राहिलच. इतके आणि असे अफाट कर्तृत्व आणि प्रतिभा असलेले आणि मनाने कायमच तारुण्यात असलेले असे आशाजींचे व्यक्तिमत्व आहे.
आजा आजा मै हू प्यार तेरा (तिसरी मंझिल), दिल चीज क्या है मेरी (उमराव जान), मेरा कुछ सामान (इजाजत) ही तीनही गाणी एकाच गायिकेची आहेत यावर पटकन विश्वासबसत नसला तरी ती आशा भोसले यांनीच गायली आहेत ही वस्तुस्थिती आहे. यातच त्यांच्या गायकीची रेंज, त्यावरचे प्रभूत्व लक्षात येते. जगभरातील अनेक देशांत स्टेज शोजमध्येही त्या संपूर्ण स्टेजवर आपल्या उत्फूर्त गायनाचा प्रभाव दाखवतात, अशी त्यांची वैशिष्ट्ये वाढत वाढत जाताहेत….