जेव्हा धर्मेंद्रने बसच्या टपावर बसून प्रवास केला आणि कंडक्टरच्या लक्षात आलं तेव्हा…
१९७० साली ऋषिकेश मुखर्जी यांचा एक चित्रपट आला होता ‘गुड्डी’ नावाचा. यातील शाळकरी नायिका जया भादुरी ही सिनेमाची प्रचंड शौकीन असते. ती कायम त्या विश्वातच हरवलेली असते. यात तिच्या स्वप्नातील नायक असतो अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra). या चित्रपटात धर्मेंद्रने धर्मेंद्रचीच भूमिका केली होती. पुढे तोच तिच्या डोक्यातून सिनेमाचे खूळ बाहेर काढतो, असे या सिनेमाचे कथानक होते. पण असेच सिनेमाचे खूळ धर्मेंद्रच्या स्वत:च्या डोक्यातही होते.
लहानपणापासून सिनेमाचे त्याला प्रचंड आकर्षण होते. त्याच्या गावाजवळून जाणाऱ्या ‘फ्रटीयर मेल’ पाहून धर्मेंद्र रोज म्हणायचा “अरे यार, तू कब मुझे मेरे सपनो के शहर ले जायेगी?” पुढे धर्मेंद्रने याच मेलमधून पळून जाऊन माया नगरी गाठली. याच काळातील हा किस्सा आहे. (Lesser Known story of Dharmendra)
त्यावेळी धर्मेंद्र सिनेमात आले नव्हते आणि पंजाबात कॉलेज शिक्षण घेत होते. या काळात त्यांना सिनेमाचा प्रचंड शौक होता. मनोमन त्यांनी सिनेमात जाण्याचा ठरवलं होतं, पण घरच्यांचा विरोध होता. मुंबईला जाऊन सिनेमात काम करण्याला विरोध तर होताच, शिवाय सिनेमा पाहायला देखील त्यांच्या घरून विरोध असायचा. त्यामुळे धर्मेंद्रने एक आयडिया केली होती.
सिनेमा पाहायचा असेल, तर गावात थिएटर नव्हतं. त्याला फगवाड्या वरून जालंदरला जावं लागायचं. जालंदरला ज्योती टॉकीजमध्ये नवीन हिंदी सिनेमा लागायचा. त्यावेळी तिथे प्रदर्शित होणारा प्रत्येक सिनेमा धर्मेंद्र पाहत होता. हे सर्व तो कॉलेजच्या वेळात उरकून टाकायचा आणि साळसूदपणे घरी जायचा. कुणाला काही कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यासाठी त्याला एक आयडिया केली होती, फगवाडाहून जालंदरला तो बसने जात असायचा आणि येताना पुन्हा बसने घरी परत यायचा. परंतु संध्याकाळी घरी जाणारी बस सिनेमा संपायच्या आधीच निघत असायची आणि ती शेवटची बस असल्यामुळे ती पकडणे भाग असायचे. त्यामुळे धर्मेंद्रला बरेचसे सिनेमे हे शेवटी अर्धा तास बाकी असताना सोडावे लागत.
क्लायमॅक्स सोडून थिएटरच्या बाहेर पडायला त्याला खूप जड जात असे. चिडचिड व्हायची पण पर्याय नव्हता. शेवटची बस त्याला मिळवणे गरजेचे असायचे नसता घरी त्याचे बिंग फुटले जाण्याची शक्यता होती. घरच्यांना वाटायचे पोरगं कॉलेजला जात आहे, पण चिरंजीवाचे हे उद्योग चालू होते. हा सिलसिला बरेच दिवस बिन बोभाट चालू होता.
एकदा असेच चित्रपट पाहून शेवटचा अर्धा तास सोडून तो धावत धावत जालंधरच्या एसटी स्टँडवर गेला. तिथे बस अगदी निघण्याच्या तयारीत होती. त्याने हात करून कंडक्टरला थांबण्याचा इशारा केला. पण कंडक्टर काही थांबायला तयार नव्हता. आता पंचाईत झाली होती. ही बस पकडणे भाग होते. त्यामुळे बस सुटल्यानंतर धर्मेंद्र त्या बसच्या पाठीमागे सुसाट पळत गेला आणि शेवटी कसेबसे त्याने बसच्या मागे असलेल्या शिडीवर जाण्यात यश मिळवले. (Lesser Known story of Dharmendra)
=========
हे देखील वाचा – आत्महत्या करायला निघालेला हा गायक परत फिरला आणि बनला ‘सुपर सिंगर’
=========
ही शिडी चढून तो वरती टपावर गेला. थंडीचे दिवस असल्यामुळे तो अक्षरशः गारठून गेला. पण काय करणार सिनेमाचे हौस दांडगी होती. ज्या वेळेला फगवाडा आले त्यावेळी सर्व प्रवासी उतरत असताना हळूहळू तो देखील बसच्या शिडीवरून खाली उतरू लागला. कंडक्टरने ते बघितले आणि त्याला पकडले! आणि त्याला पैसे मागितले. गरम धरम आता चिडला होता. रागारागाने तो म्हणाला, “मी तुम्हाला वारंवार विनंती करून बस थांबव म्हणत होतो तेव्हा थांबवली नाहीस आता कसले पैसे मागतोस? तुला पैसे पण देणार नाही..” असे म्हणून धर्मेंद्र तिथून पळून गेला. पण गाव छोटे होते. कंडक्टरने धरमच्या या लीला तिखट मीठ लावून त्याच्या घरी संगितल्याच आणि यानंतर धरमचे कॉलेज सुटले ते सुटलेच!