तब्बेत ठीक नसतानाही मोहम्मद रफी यांनी ‘या’ अभिनेत्यासाठी केले पुन्हा रेकॉर्डिंग
पार्श्वगायक मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्या निधनाला चाळीस वर्षांहून अधिक कालावधी उलटला असला, तरी त्यांच्याबाबतचे किस्से आजही चाहत्यांमध्ये मोठ्या चवीने चर्चिले जातात. मोहम्मद रफी यांनी कायमच तुलनेने छोटे संगीतकार, छोटे कलाकार यांच्यासाठी खूप मोठं असं काम केलं होतं. हा किस्सा आहे प्रकाश मेहरा यांच्या १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ या चित्रपटाच्या एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचा!
जंजीर चित्रपटात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं एक गाणं त्या दिवशी रेकॉर्ड होणार होतं. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. रेकॉर्डिंगच्या दिवशी रफी साहेबांची तब्येत बरी नव्हती. तसेच तो रमजानचा महिना असल्यामुळे, त्यांचा उपास होता. त्यामुळे त्यांना थोडा अशक्तपणा जाणवत होता. पण रफी आपल्या वक्तशीरपणासाठी खूप प्रसिद्ध होते; त्यामुळे ठरलेल्या वेळी रफी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले.
सुरुवातीला गाण्याच्या रिहर्सल्स झाल्या. फायनल टेक घ्यायची वेळ आली. रफी आणि लता मंगेशकर मोठ्या समरसून हे गाणे गात होते. त्या दिवशी काय अडचण झाली कळत नाही, पण फायनल टेकच्या वेळी अडथळे येत होते (तो काळ लाईव्ह रेकॉर्डिंगचा होता.) कधी कुठला वादक चुकत होता, तर कधी कुठल्या वाद्यातून हवा तो सूर मिळत नव्हता. अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सलग पाच-सहा टेक झाले, पण सर्व एन जी म्हणजे नॉट गुड प्रकारचे टेक होते.
रफी साहेब वैतागले. लता दीदी आणि रफी देखील जाऊन बसले. शेवटी कल्याणजी आनंदजी यांनी आणखी एक टेक घेऊयात असे सांगितले. पुन्हा एकदा दोघे माईकच्या जवळ आले. गाण्याचा टेक सुरू झाला, संपला. कानाचा हेडफोन बाजूला काढून रफीने विचारले, “आता गाणे ओके झाले ना?” त्यावेळी कल्याणजी आनंदीजीपैकी कल्याणजी यांनी मान डोलावली. (Lesser Known story of Mohammed Rafi)
रफी साहेब लगेच रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडले आणि गाडीत जाऊन बसले. इकडे लता मंगेशकर आणि संगीतकार जोडीने ते रेकॉर्ड झालेलं गाणं पुन्हा ऐकून पाहिलं. त्यावेळी त्यांना त्या गाण्यात पुन्हा काही त्रुटी आढळल्या आणि गाणं पुन्हा एकदा रेकॉर्ड करायचे ठरले.
कल्याणजी भाई स्वतः बाहेर गेले आणि त्यांनी रफीला सांगितले, “रफी साहब आणखी एक टेक घ्यावा लागेल..” त्यावेळेला मात्र रफी नाराज झाले आणि म्हणाले , “तुम्ही आत्ता तर ‘ओके’ म्हणाला होतात, आता पुन्हा कसं का नाही म्हणता?” त्यावर, “काय करणार? टेक्निकल प्रॉब्लेम झालाय कृपया तुम्ही पुन्हा रेकॉर्डिंगला या.” असे म्हणून कल्याणजी निघून गेले. (Lesser Known story of Mohammed Rafi)
रफीची तब्येत बरी नव्हती. प्रचंड अशक्तपणा आला होता. काय करावे? तितक्यात गीतकार गुलशन बावरा पळत पळत रफीकडे आले आणि म्हणाले, “रफी साब प्लीज दोबारा इस गाने को रेकॉर्ड कीजिए. आप जानते है ये गाना किस पर पिक्चराइज होने वाला है?” रफी थोडे नाराज होते त्यामुळे त्रासिक स्वरातच त्यांनी चिचारले, “किस पर? दिलीप कुमार पर या देवानंद पर?” त्यावर गुलशन बावरा म्हणाले , “नही रफी साब, ये गाना तुम्हारे सामने खडे हुए इस बच्चे यानी मुझपर पिक्चराइज होनेवाला है. और इसका शुटींग कल होने वाला है. आप प्लीज मेरे लिये दुबारा गाईये. मै जानता हूं आपकी तबीयत नासाज है. प्लीज.मेरे करीयर का सवाल है.”
गुलशन बावराच्या डोळ्यातील आर्जवी भाव पाहून रफी यांचे मन द्रवले. त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून त्याच्या पाठीवर थाप मारली, “ये बात है, तो चल…अरे तुने मुझे पहिले क्यू नही बताया?” असं म्हणून रफी पुन्हा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आले आणि गाणे रेकॉर्ड केले. हे गाणे होते, “दिवाने है दिवानो को ना घर चाहिये ना घर चाहिए, मोहब्बत भरी एक नजर चाहिए…” (Lesser Known story of Mohammed Rafi)
=======
हे देखील वाचा – ‘दे दे प्यार दे’ गाण्याचा रुना लैलाशी होता जवळचा संबंध; कोण आहे रुना लैला
=======
या गाण्यामध्ये गुलशन बावरा सोबत नाचणारी अभिनेत्री आहे संजना. या अभिनेत्रीचे खरे नाव रेहाना खान होते. तिने अनेक कलावंतांसोबत चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका केल्या. पण तिचा अंत अतिशय दुर्दैवी झाला. ती स्वतः शेवटी कॅन्सरची शिकार झाली. आयुष्यात कमावलेलं होतं नव्हतं ते सर्व विकावं लागलं आणि सरते शेवटी ती अक्षरशः रस्त्यावर आली. शेवटी २०१२ साली तिने इंडिया टीव्हीवर आपली कैफियत मांडली. करोडो रुपयांचा बिझनेस करणारे बॉलिवूड तिचे प्राण वाचवू शकले नाही. या गाण्याच्या निमित्ताने अभिनेत्री संजनाची हे दर्दभरी आठवण देखील सांगावीशी वाटली.