मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
शम्मी कपूरला मिळाला डच्चू आणि राजेन्द्रकुमारची झाली एन्ट्री…
सिनेमाच्या सुवर्णकाळात म्हणजेच पन्नास आणि साठच्या दशकामध्ये अनेक दाक्षिणात्य निर्माते आणि दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन सिनेमे दिग्दर्शित करीत होते. गाजलेले चित्रपट हिंदी मध्ये पुन्हा एकदा रिमेक होत होते किंवा काही काही सिनेमे तर दक्षिणेतील भाषा आणि हिंदी भाषा या दोन्हीमध्ये एकाच वेळी बनत होते. याचा फायदा नेमका असा व्हायचा की, एकाच सेटवर दोन भाषातील चित्रपट तयार होत असत. (Lesser known story of Shammi Kapoor and T. Prakash Rao)
१९५५ साली आलेल्या ‘आजाद’ या चित्रपटाचा किस्सा तर सर्वश्रुत असाच आहे. पन्नासच्या दशकाच्या अखेरीस अभिनेता शम्मी कपूरला घेऊन बी एल रावळ आणि एल व्ही प्रसाद या दोघांनी दोन चित्रपटांची घोषणा केली. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन टी प्रकाशराव हे गाजलेले साउथ इंडियन डायरेक्टर करणार होते. टी प्रकाशराव दक्षिणेत तर लोकप्रिय होतेच, पण हिंदीत देखील त्यांनी त्यापूर्वी काही सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं
दक्षिणेतील एम जी रामचंद्रन, एन टी रामाराव, शिवाजी गणेशन या सुपरस्टार कलाकारांचे ते लाडके दिग्दर्शक होते. साउथकडे त्यांचा प्रचंड बोलबाला होता. देव आनंद- वैजयंतीमालाच्या ‘अमर दीप’ या सिनेमापासून ते हिंदीत आले. ते करड्या शिस्तीचे दिग्दर्शक होते. नायक नायिकांचे नखरे ते अजिबात खपवून घेत नसत.
शम्मी कपूर सुरुवातीच्या फ्लॉप चित्रपटानंतर १९५८ सालच्या ‘तुमसा नही देखा’ या सिनेमापासून हिट सिनेमांचा बादशाह बनला होता. दिल देके देखो (१९५९), ‘सिंगापूर (१९६०) या दोन्ही सिनेमाने त्यांची मार्केट व्हॅल्यू वाढली होती. हॉलिवूडच्या ‘एल्विस प्रिस्ले’ याचा त्यांच्यावर खूप मोठा पगडा होता. शम्मी कपूरचा डान्स हा त्याच्या सिनेमाच्या यशाचा एक मोठा प्लस पॉईंट होता.
शम्मीची लोकप्रियता पाहूनच बी एल रावळ आणि एल व्ही प्रसाद यांचे चित्रपट त्याला मिळाले. या दोन्ही सिनेमाचे दिग्दर्शक टी प्रकाशराव होते. यापैकी ‘कॉलेज गर्ल’ हा सिनेमा आधी सुरू झाला. या सिनेमात शम्मीची नायिका होती वैजयंतीमाला. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. या सिनेमात एक युगलगीत होते. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेले. ‘हम भी करते है प्यार समझ गये ना…” रफीने शम्मी कपूरला डोळ्यासमोर ठेवूनच हे गाणे गायले होते.
चित्रीकरणाच्या वेळी शम्मी कपूर गाण्याचे बिट्स आणि गाण्यातील भाव लक्षात घेऊन डान्स स्टेप स्वतःच करू लागला. त्याला कोरिओग्राफीची अजिबात गरज नसे. तो स्वतःच त्याचा डान्स ठरवत असे आणि करत असे. या ‘कॉलेज गर्ल’ सिनेमाच्या वेळीही असंच झालं. या गाण्यांमध्ये शम्मी कपूर त्याच्या डान्स स्टेप्स स्वतः करू लागल्यामुळे दिग्दर्शक टी प्रकाशराव नाराज झाले. कारण त्यांना या गाण्यांमध्ये वेगळ्या स्टेपस हव्या होत्या. शम्मी मात्र त्याच्या मनाप्रमाणे डान्स करत होता. (Lesser known story of Shammi Kapoor and T. Prakash Rao)
दिग्दर्शक टी प्रकाशराव हे सीनियर होते. करड्या शिस्तीचे होते. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे मोठे नाव होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या अहंकाराला ठेच पोचली, इगो दुखावला गेला. त्यांनी शम्मी कपूरला सांगून पाहिले, पण शम्मी कपूर ऐकायला तयार नव्हता. त्या दोघांमधील संवाद पूर्णपणे थांबला. असिस्टंटच्या करवी ते शम्मीला निरोप देत होते. शम्मी कपूरने देखील प्रोफेशनली वागत चित्रपट पूर्ण केला. ‘कॉलेज गर्ल’ हा सिनेमा रिलीज झाला आणि चांगला हिट देखील झाला.
आता एल व्ही प्रसाद यांच्या दुसऱ्या चित्रपटाची सुरुवात केली. हा चित्रपट होता ‘ससुराल’. परंतु दिग्दर्शक टी प्रकाशराव यांना आधीच्या सिनेमातील शम्मीचा ॲटीट्यूड अजिबात आवडला नव्हता. त्यांनी निर्मात्यांसमोर अट ठेवली, “या सिनेमात एक तर मी असेन किंवा शम्मी कपूर. कारण शम्मी कपूरसोबत मी अजिबात काम करणार नाही.” (Lesser known story of Shammi Kapoor and T. Prakash Rao)
=================
हे ही वाचा: मोहब्बते: या चित्रपटात सचिन तेंडुलकर दिसणार होता एका खास भूमिकेत पण…
जीवावर उदार झालेल्या स्टंट मास्टर शेट्टीचा ‘जिगरबाज’ किस्सा
==================
एल व्ही प्रसाद यांनी त्यांना हर तऱ्हेने समजावून सांगितले परंतु टी प्रकाशराव ऐकायला तयार नव्हते. शेवटी निर्मात्याला हार मानवी लागली आणि शम्मी कपूरला चित्रपटातून डच्चू देऊन त्याच्या जागी राजेंद्रकुमारची निवड करण्यात आली. अशा पद्धतीने ‘ससुराल’ या चित्रपटात राजेंद्रकुमारची एन्ट्री झाली. हा सिनेमा राजेंद्रकुमारच्या आयुष्यातील सुपरहिट सिनेमा ठरला आणि पुढे तो ज्युबली कुमार म्हणून लोकप्रिय झाला.