जीवावर उदार झालेल्या स्टंट मास्टर शेट्टीचा ‘जिगरबाज’ किस्सा
आजच्या युवा पिढीचा लाडका दिग्दर्शक रोहित शेट्टी याचे वडील एम बी शेट्टी (Stuntman M.B. Shetty) भारतीय सिनेमातील एक नावाजलेले फाईट मास्टर होते. अनेक सिनेमातील चित्त थरारक स्टंट त्यांनी स्वतः केले होते. कित्येक सिनेमाचे फाईट सिक्वेन्स त्यांनी शूट केले होते. फिल्म स्टंटमन मग ॲक्शन कोरिओग्राफर, स्टंट डायरेक्टर आणि नंतर व्हिलन अशा पायऱ्या ते चढत गेले.
अमिताभ बच्चन सोबतच्या डॉन, त्रिशूल, द ग्रेट गॅम्बलर, दिवार मधील खलनायक आणि त्याचे फाईट शॉट अजून लक्षात आहेत. संपूर्ण टक्कल असल्याने तो डेंजर व्हिलन वाटायचा. तब्येतीने मजबूत असलेले शेट्टी साठ आणि सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टंटचे बादशहा होते. १९५६ सालच्या ‘हिर’ या सिनेमा पासून ते मायानगरीत आले. १ जानेवारी १९३१ चा त्यांचा जन्म. मूळगाव मंगलोर कर्नाटक. बॉक्सिंग, बॉडी बिल्डींग आणि स्टंटची पहिल्यापासूनच आवड आणि बिनधास्त स्वभाव, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये.
हा किस्सा आहे त्यांच्या साठच्या दशकातील एका चित्रपटाचा. अस्पी इराणी एक चित्रपट दिग्दर्शक करीत होते. चित्रपट होता, कैदी नंबर ९११. या चित्रपटातील एका स्टंटसाठी त्यांनी शेट्टी (Stuntman M.B. Shetty)यांना पाचारण केले होते. शॉट असा होता, एका पुलावरून शेट्टी यांना खाली उडी मारायची होती. या खालच्या रस्त्यावरून काही ट्रक वेगाने जात असतात त्यातील एका ट्रकवर त्यांना उडी मारायची होती. ज्यावेळी अस्पी इराणी यांनी हा शॉट शेट्टी यांना समजावून सांगितला त्यावेळी ते तयार झाले कारण अशा प्रकारचे अनेक शॉट त्यांनी त्यापूर्वी देखील केले होते. तसंच अशा अनेक शॉटचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले होते. पण या शॉटच्या वेळी मात्र शेट्टी थोडेसे कचरले आणि दिग्दर्शकाला म्हणाले, “माझ्याकडून हा शॉट जमणार नाही.”
दिग्दर्शक अस्पी इराणी यांना खूपच आश्चर्य वाटले. कारण स्टंट म्हणजे शेट्टी असे समीकरण हिंदी सिनेमात दृढ झाले होते. त्यांनी शेट्टी यांना आपल्या केबिनमध्ये बोलवून कारण विचारले. त्यावेळी शेट्टी यांनी खरे कारण सांगितले. शेट्टी यांच्या पत्नीने दोन दिवसापूर्वीच एका गोजिरवाण्या मुलीला जन्म दिला होता. त्या मुलीचा चेहरा कायम शेट्टी यांच्यासमोर येत होता. हा शॉट खूप धोकादायक होता. कारण समोरून ट्रेन येत असताना खाली वेगाने जाणाऱ्या ट्रकवर उडी मारायची असते. यात काहीही होऊ शकतं. शेट्टी यांचे प्राण देखील जाऊ शकत होते. (Untold story of Stuntman M.B. Shetty)
स्टंटचे प्रोफेशन ज्यावेळेला त्यांनी स्वीकारले त्यावेळी त्यांना आपल्या भविष्याची कल्पना होती, पण आता परिस्थिती काहीशी बदलली होती. कुटुंबात आलेल्या नवीन चिमुकल्या पाहुण्याने त्यांचा पाय मागे खेचला जात होता. अस्पी इराणींनी शेट्टींना समजावले व ते म्हणाले, “ठीक आहे. तुमची ज्यावेळेला मानसिक तयारी होईल त्यावेळी आपण हा शॉट शूट करूया.” परंतु शेट्टी यांचा नकार हिंदी सिनेमाच्या दुनियेत वेगळ्या अर्थाने घेतला गेला आणि त्यांच्या अनप्रोफेशनल वर्तनाची चर्चा सुरू झाली.
===============
हे ही वाचा: सलग आठ वर्ष ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ला फिल्मफेअर पुरस्काराने दिली हुलकावणी
‘या’ अभिनेत्रीच्या ‘टॉपलेस’ फोटोने देशात उडाली होती मोठी खळबळ!
==============
सर्वत्र शेट्टी यांनी माघार घेतल्याची चर्चा रंगली खरे कारण जाणून न घेता शेट्टी यांची नाहक बदनामी सुरु झाली. ज्यावेळी शेट्टी यांच्या कानावर ही गोष्ट गेली त्यावेळी त्यांना खूपच वाईट वाटले. ताबडतोब ते अस्पी इराणी यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि म्हणाले, “काय होईल ते होऊ दे. पण हा शॉट आपण आजच चित्रित करूया.” त्यावर दिग्दर्शक म्हणाले, “अजिबात घाई नाही आपण नंतरही हा शॉट घेऊ शकतो.” परंतु शेट्टी ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, “इस शॉट मे मेरी जान भी चली जाये तो कोई बात नही लेकिन इज्जत नही जानी चाहिये..” त्यावर अस्पी इराणी यांनी त्यांची पाठ थोपटली आणि लगेच ते शॉट च्या तयारीला लागले. त्या रात्री हा शॉट चित्रित झाला आणि पहिल्याच टेक मध्ये ओके देखील झाला. अशा पद्धतीने शेट्टी यांनी त्यांच्यावर विनाकारण होत असलेल्या टीकेला उत्तर देऊन टीकाकारांची तोंडे बंद केली.