राजा-राणीची हि जणू आगळी कथा…
मेघन मार्कल या ब्रिटनच्या माजी राजकुमारीचा 4 ऑगस्टला वाढदिवस. मेघन ही अमेरिकन अभिनेत्री. एका अमेरिकन अफ्रिकी वंशाच्या महिलेची मुलगी असलेली मेघन ब्रिटनच्या राजघराण्याची सून झाली हिच मोठी ऐतिहासीक घटना होती. त्यात ही राजकुमारी मग सर्व सोडून पुन्हा आपल्या जुन्या, साध्या आयुष्याकडे परतली…ही आणखी एक ऐतिहासीक घटना ठरली…आयुष्यात आलंलं राजकुमारीचं वलय सोडणं सहजसोप्पी गोष्ट नाही…पण मेघन तरी साधी मुलगी थोडीच आहे…अत्यंत महत्त्वकांक्षी असलेल्या मेघनविषयी…
राजकुमारी…हा शब्दच एवढा जादुई आहे की कोणत्याही तरुणीला साधी राजकुमारीची भूमिका जरी मिळाली तरी कोण आनंद होतो ते तिचं तिलाच माहीत…मात्र एका तरुणीला ही राजकुमारीची खऱी पदवी मिळाली होती…त्यासोबतच मान, वैभव, मोठा राजवाडा आणि स्वप्नातला राजकुमार हे सर्व तिला मिळालं होतं. पण ही तरुणी हा मान, सन्मान, वैभव आणि राजकुमारीचा तो मुकूट सोडून वेगळी झाली. तिच्यासोबत तिचा राजकुमारही, राजकुमाराचा मान, रुतबा सोडून वेगळा झाला…आता ही दोघं एक सर्वसामान्य माणसासारखं आयुष्य जगत आहेत. ही तरुणी आहे मेघन मार्कल आणि तिचा राजकुमार आहे ब्रिटनचा राजकुमार, प्रिन्स हॅरी….
अमेरिकन अभिनेत्री असलेली मेघन मार्कल प्रिन्स हॅरीच्या सोबत दिसली आणि तिचं अवघं आयुष्यच बदलून गेलं. वास्तविक मेघन मार्कल अगदी सामान्य घरातील तरुणी. घराचं भाडं भरण्यासाठी ती कॅलिग्राफी करायची, एवढ्या सामान्य घरातील तरुणी थेट ब्रिटनच्या राजघराण्याची सून झाल्यावर ती एकदम लाईम लाईटमध्ये आली.
मेघन अमेरिकेची…तिची आई आफ्रिकन अमेरिकन वंशाची…कॅलिफोर्नियामधील लॉस एंजेलिसमध्ये मेघनचा जन्म झाला. मेघनची आई, डोरिया रॅगलँड समाजसेवेत व्यस्त असते. ती स्वतः योग शिक्षिका म्हणूनही काम करते. थॉमस मार्कल सीनियर हे तिचे वडील. दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्यामुळेच मेघन अभिनयाकडे वळली. मेघन सहा वर्षाची असतांना तिच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला. मेघनची आई स्वतंत्र विचाराची महिला आहे, तिच्या या स्वभावाचा मेघनवर मोठा परिणाम झाला.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून थेअटर अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीजमध्ये तिने पदवी घेतली. याच अभ्यासादरम्यान मेघन दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करु लागली. यासोबत कॅलिग्राफर म्हणूनही ती काम करत होती. सोबत मेघनला लेखनाची आवड आहे. दी टॅग ही स्वतःची वेबसाईट तिनं चालू केली. यात कपड्यांची फॅशन, फूड, ज्वेलरी या सर्वांवर मेघन लिहीत असे. तिची ही वेबसाईट लोकप्रिय होतीच, पुढे मेघनच नाव हॅरीबरोबर जोडलं गेल्यावर या वेबसाईटला भेट देणा-यांची संख्या भलतीच वाढली. त्यातून मेघननं मोठा फायदा मिळवल्याचं बोललं जातं. याशिवाय मेघन कॅलिग्राफर म्हणूनही काम करत होती. यातून आलेले पैसे ती रहात असलेल्या अपार्टमेंटच्या भाड्यासाठी जमा करत असे.
मेघननं हॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख बनवली. सेंचुरी सिटी, द वॉर नॉट होम, हॉरिबल बॉस, रिमेंबर, डेटरर्स हॅन्डबुक, व्हेन स्पार्क फ्लाय, एलिफंट, अ लॉट लाईक लव्ह, रॅन्डम एन्काऊंटर हे तिचे काही गाजलेले चित्रपट. अभिनेता आणि निर्माता ट्रेव्हर एंगेल्सन यांच्याबरोबर 2011 मध्ये तिनं लग्न केलं. हा विवाह अगदी दोन वर्ष टिकला. दोन वर्षांनी या दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर कोरी बाटालो या कॅनेडीयन शेफ बरोबर आणि रोरी मॅकरोरी या आयरीश गोल्फ खेळडूबरोबरही मेघनंच नाव जोडलं गेलं…या सर्वांदरम्यान तिच्या आयुष्यात ब्रिटनच्या राजघराण्याचा राजकुमार प्रिन्स हॅरी याची एन्ट्री झाली. प्रिन्स आणि मेघन यांच्या गाठीभेटी वाढल्या. एका टेनिस मॅचदरम्यान हे लव्हबर्ड माध्यमांसमोर आले…यानंतर मेघनचं अवघं आयुष्यच बदलून गेलं.
ब्रिटनचं राजघराणं हे पारंपारिक रुढींसाठी प्रसिद्ध आहे. या राजघराण्याची सून म्हणून मेघनची निवड हॅरीनं केली. पण या त्याच्या निवडीला प्रारंभिक विरोध झाला. त्याला अनेक कारणं होती. त्यातील एक म्हणजे मेघनची आई…मेघनची आई ही अमेरिकन अफ्रिकन वंशाची…त्यामुळे मेघनबरोबर लग्न ही खूप ऐतिहासिक घटना ठरली. याशिवायही मेघनला विरोध झाला होता. खुद्द प्रिन्स हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यम यानंही या लग्नाला पहिल्यांदा विरोध दर्शवला होता. कारण मेघन ही घटस्फोटीता होतीच, शिवाय ती वयानंही हॅरीपेक्षा तीन वर्षांनं मोठी…पण मोठ्या भावाची ही नारीजी दूर झाली. आणि त्यानेच या लग्नात मध्यस्थाची भूमिका पार पाडली. त्यात हॅरी हा लहानपणापासून अतिशय भावूक. प्रिन्सेंस डायनाच्या अपघाती आणि अकाली मृत्यूनंतर राणीनं त्यांची विशेष काळजी घेतली. हा धाकटा राजकुमार प्रेमात पडल्यावर कुठलाही अनुचित प्रकार करु नये, म्हणून या लग्नाला राजघराण्यानं मान्यता दिली. खुद्द राणीनं काही प्रथा ही मेघनच्या स्वागतासाठी मोडल्या. 19 मे 2018 रोजी हा ऐतिहासिक विवाह सेंट जॉर्ज चॅपल, विंडसर कॅसल येथे पार पडला. मेघन डचेस ऑफ ससेक्स झाली.
ब्रिटनच्या राजघराण्याची सून होण्याआगोदर मेघननं अभिनयातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले. तसेच तिची सर्व सोशल मिडीया अकाऊंटही बंद करण्यात आले. राजघराण्याची प्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची…त्यामुळे मेघननं आपले काही फोटोही सोशल मिडीयावरुन हटवले. राजघराण्याचे चाकोरीबद्ध जीवन काय याचा अनुभव मेघनला येत होता. लग्नानंतर एक वर्षात तिला मुलगा झाला. मेघन आणि हॅरी यांच्या मुलाचे नाव आर्ची माउंटबॅटन-विंडसर ठेवण्यात आले. मेघन आणि हॅरी हे जोडपं ब्रिटनमध्ये चांगलेच लोकप्रिय ठरले.
मेघन ही पहिल्यापासून आपल्या फॅशननं लक्ष वेधून घेत असे. आता तर ती डचेस होती. तिनं घातलेल्या कपड्यांची फॅशन ब्रिटनमध्ये आली. ब्रिटनच्या सर्वोत्तम पोशाख असलेल्या लोकांच्या यादीमध्ये या डचेसचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं. मात्र राजघराण्याचे कपड्यांबाबतचे नियम असतात. मेघननं अनेकवेळा या नियमांना बगल दिली. एका महिला दिनाच्या सोहळ्यात ही डचेस मिनी ड्रेसमध्ये सहभागी झाली. मेघनच्या या लूकवर परंपरा जपणा-या ब्रिटनमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.
याशिवाय कुठल्याही राजकीय वादावर प्रतिक्रीया व्यक्त करायची नाही, हाही राजघराण्याचा नियम. मात्र मेघन अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. मेघनची ही भूमिकाही वादाची ठरली. एकीकडे मेघन लोकप्रिय ठरत होती. टाईम मासिकाने तिचा समावेश जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तीच्या यादीमध्ये केला. ब्रिटिश व्होग मॅगझिनने तिची युनायटेड किंगडममधील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवड केली. असे असले तरी मेघन राजघराण्याच्या साच्यात स्वतःला बंद करु शकली नव्हती. राजघराण्याचे दौरे आणि कार्यक्रम ही तिची दैनंदिनी होती. आर्चीचा जन्म झाल्यावर मेघन या दिनक्रमापासून स्वतःला वेगळं ठेवीत होती.
अखेर एक दिवस तिनं आपल्या राजकुमारासोबत ही राजघराण्याची चौकट ओलांडण्याचे जाहीर केले. मेघन आणि हॅरी यांनी राजघराणे सोडून सर्वमानान्यांसारखे जीवन जगायचे असल्याचे जाहीर केले. त्यांचा हा निर्णय राजघराण्यासाठी मोठा आघात होता. कारण हॅरीनं ही गोष्ट आपल्या मोठ्या भावापासूनही लपवून ठेवली होती. या सर्वांत मेघनलाच दोषी ठरवण्यात आले. पण राणीनं मोठेपणा घेऊन या जोडप्यानं घेतलेल्या निर्णयाला मान्यता दिली. 2020 च्या पहिल्याच महिन्यात या शाही जोडप्यानं आपलं शाहीपण सोडून दिलं. मेघन, हॅरी आणि आर्चीसह अमेरिकेमध्ये स्थलांतरीत झाली. लाईमलाईट पासून दूर तिनं आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात केली.
मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तोंडाला पट्टी लावून फिरणारं मेघन आणि हॅरी कॅमे-यात टिपले गेले होते. मेघननं घेतलेला निर्णय चुकीचा की बरोबर यावर अनेक वादविवाद झाले. अर्थात मेघनंनं यावर आपलं जाहीर मत कधीच व्यक्त केलं नाही….आणि बहुधा ती करणारही नाही…लहानपणापासून संघर्ष करीत स्वतःसा सिद्ध करणारी मेघन या लढाईतही स्वतःला आणि तिच्या राजकुमाराला यशस्वी करेल…
सई बने