रमेश सिप्पी एक जादुगार
१५ ऑगस्ट १९७५…. ‘शोले ‘ रिलीजचा दिवस आजही ठळकपणे आठवतोय…
गिरगावात राहिल्याने मिनर्व्हा थिएटर सवयीचे आणि ‘शोले ‘ची जबरदस्त पूर्वप्रसिध्दी झाल्याने वातावरण ‘शोले ‘मय झालेले. त्या काळात असे मोठे चित्रपट रिलीज व्हायच्या दिवशी थिएटर डेकोरेशन पाह्यला जायचं जबरा फॅड होते. प्रत्येक काळाची काही खास वैशिष्ट्य असतात, तसेच ते हेही. मिनर्व्हावरचे तर एका टोकापासून सुरु होणारे थिएटर डेकोरेशन पाहावेच असे. त्यावरच्या गब्बरसिंगची भीती वाटल्याचे आठवते. माझे ते शालेय वय होते. अॅडव्हान्स बुकिंगचा चार्ट आठभरचे सगळे शो हाऊस फुल्ल असणे स्वाभाविक होते, पण तिकीट दर अप्पर स्टाॅल चार रुपये चाळीस पैसे आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असलेले पाहून माझ्यातील मध्यमवर्गीय मराठी माणसाला आश्चर्याचा धक्का बसला.
तेव्हा गिरगावातील सेन्ट्रल थिएटरला स्टाॅल एक रुपया पासष्ट पैसे ( मॅटीनी शोला तेच तिकीट एक रुपया पाच पैसे… महत्वाचे म्हणजे खिशात मोजून तेवढेच पैसे असत). मिनर्व्हाबाहेरील गर्दीत पिक्चरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोच्या पब्लिक रिपोर्टबद्दल विलक्षण कुतूहल आणि उत्सुकता होती….. सुरुवातीला ‘शोले ‘ पडला पडला अशीच हवा होती. त्या काळातील चित्रपट समिक्षकेबद्दल विश्वासार्हता होती आणि त्यात तर जवळपास सगळीकडे ‘शोले ‘वर टीका होती. हिंसक चित्रपट, लांबलेला सिनेमा, वगैरे वगैरे बरेच काही. प्रत्यक्षात काय घडले हे सर्वज्ञात आहे. आजही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भात ‘शोले ‘ असतोच. मिनर्व्हामध्येच ‘शोले ‘ बघणे आवश्यक होते. संपूर्ण मुंबईत फक्त तेथेच हा चित्रपट सत्तर एमएमचा पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीमने होता. सीटसवर बसल्या बसल्या वेगळा फिल येई ( अनेक शहरात एकाद्याच थिएटरमध्ये असा सत्तर एमएमचा होता आणि इतरत्र पस्तीस एमएम आणि मोनो साऊंड सिस्टीमचा होता).
पंधराव्या आठवड्यातही अॅडव्हान्स बुकिंगसाठी सकाळपासून रांग लावून एकदाचे तिकीट मिळवले…. सिनेमा संपला तेव्हा मी रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनाने विलक्षण भारावून गेलो होतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. त्याच्या दृष्टिकोनातून चित्रपट पाह्यला हवा. चित्रपट माध्यमात पटकथा ( येथे सलिम जावेद) आणि संकलन ( येथे एम. एस. शिंदे) हे दोन घटक जास्त महत्वाचे. चित्रपट टेबलावर घडतो म्हणतात तो हा असा.
‘अंदाज ‘ ( १९७१) आणि ‘सीता और गीता ‘ ( १९७२) या ज्युबिली हिट चित्रपटानंतरचा रमेश सिप्पीने ‘शोले ‘ दिग्दर्शित केला. ‘सीता और गीता ‘ तर दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेल्या ‘राम और श्याम ‘ ची लेडी रिमेक. तर रमेश सिप्पी यांचे पिता जी. पी. सिप्पी पन्नासच्या दशकापासून चित्रपट निर्मिती क्षेत्रात असल्याने त्यांना व्यवसायाची नस चांगलीच माहित. ‘शोले ‘ जस जसा मुक्काम वाढवू लागला तस तशा अनेक गोष्टी समोर आल्या.
डॅनी डेन्झोपा गब्बरसिंगची भूमिका साकारणार होता, अगदी पहिल्या सिटींगलाही तो धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीवकुमार, अमिताभ बच्चन आणि जया भादुरीसोबत हजर होता. पण त्याच वेळेस तो नरेंद्र बेदी दिग्दर्शित ‘खोटे सिक्के ‘मध्ये अशीच भूमिका साकारत असल्याने आणि फिरोझ खान दिग्दर्शित ‘धर्मात्मा ‘च्या शूटिंगसाठी अफगाणिस्तानला जायचे असल्याने त्याने ‘शोले ‘ नाकारला…. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक उलटसुलट चर्चा झालेला आणि या देशाची जणू लोककथा ठरलेला चित्रपट ‘शोले ‘ आहे हे लक्षात आले.
मिनर्व्हा थिएटरमध्ये दिवसा तीन खेळ याप्रमाणे तीन वर्षे आणि मग मॅटीनीला शिफ्ट होऊन आणखीन दोन वर्षे चालला, तोपर्यंत मी काॅलजमध्ये शिकत होतो. आणि रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान ‘ ( १९८०) आला. ‘सहा कोटीचा सिनेमा ‘ अशी ‘शान ‘ची दणदणीत पब्लिसिटी झाली ( चाळीस वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय मराठी माणसाला मासिक एक हजार रुपये पगारही भारी वाटे. बघा, कुटुंबातील वडीलधारी मंडळीना विचारुन) ‘शाकाल ‘च्या खर्चिक सेट आणि ती भूमिका साकारलेल्या कुलभूषण खरबंदाच्या महागड्या ड्रेसची भारी हवा होती.
अमिताभ बच्चनने खतरनाक मगरीशी डमी न घेता फायटींग केली वगैरे वगैरे किती टीट बिट्स विचारु नका. ‘शान ‘च्या शूटिंगला सुरुवात होतानाच धर्मेंद्रने काही कारणास्तव सिनेमा सोडला म्हणून हेमा मालिनीनेही सोडला आणि शशी कपूर आणि बिंदीया गोस्वामी आले. पब्लिकला उत्सुकता होती, शाकाल गब्बरसिंगपेक्षा जास्त डेंजरस ठरणार काय हे जाणून घेण्याची! ‘शान ‘ एकदम पाॅलीश्ड अॅक्शन सिनेमा , रमेश सिप्पीने याचे भान कुठेही सोडले नव्हते. पण पब्लिकने ‘शोले ‘च्या हॅन्गओव्हरमध्ये ‘शान ‘ पाहिला आणि अर्थातच वो बात कुछ जमी नही. तरीही ‘शान ‘ने मिनर्व्हा थिएटरमध्ये ज्युबिली हिट यश संपादले.
‘शक्ती ‘ ( १९८२) साठी रमेश सिप्पीने दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र आणले हीच हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक माईल स्टोन गोष्ट . आजच्या काळातील ती ‘ब्रेकिंग न्यूज ‘च! दोघांचा चाहतावर्गही प्रचंड आणि दिग्दर्शक रमेश सिप्पीने हे आव्हान स्वीकारले म्हणून त्याच्याबद्दल प्रचंड आदर. खरं तर रमेश सिप्पी ‘शोले ‘ला मागे ठेवून पुढे चालला होता, पण समाजावर ‘शोले ‘चा पगडा होता. तो विसरला जाईल असे काही त्यांना अपेक्षित होते आणि नव्हतेही आणि हीच दिग्दर्शकाची मोठी कसोटी असते. (मोठे यश सतत पाठलाग करते ते हे असे)
खलप्रवृतीशी ( अमरीश पुरी) केलेल्या संगतीवर कर्तबगार पोलीस अधिकारी पिता ( दिलीपकुमार) आपल्या पुत्रालाच ( अमिताभ बच्चन) शासन करतो आणि या संघर्षात या पुत्राच्या आईची ( राखी) घुसमट होते असे सलिम जावेदच्या पटकथेचे मध्यवर्ती कथासूत्र. पण चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. तरीही मिनर्व्हा थिएटरमध्ये ज्युबिली हिट यश. एक दिग्दर्शक आणि त्याच्या चार चित्रपटांचे ( सीता और गीताही) मेन थिएटर सेम अर्थात मिनर्व्हा हादेखील एक विक्रमच. आणि ‘अंदाज ‘पासून पाचही चित्रपट सलिम जावेदच्या लेखनावर हेही विशेष. रमेश सिप्पीने डिंपल खन्नाला ‘सागर ‘ ( १९८५) साठी पुनरागमनाची संधी दिली हीदेखील ब्रेकिंग न्यूज. ती ‘बाॅबी ‘ ( १९७३) नंतर बारा वर्षानी स्क्रीनवर कशी दिसेल/असेल याचे कुतूहल आणि दिग्दर्शक म्हणून रमेश सिप्पी तिच्यातील अभिनेत्री आणि ग्लॅमर इतक्या वर्षानी कसे खुलवतोय याकडे लक्ष.
तिचा ‘बाॅबी ‘ नायक ऋषि कपूर आणि अष्टपैलू कमल हसन असे दोन नायक आणि ही प्रेमत्रिकोणाची जावेद अख्तरची पटकथा आणि संवाद म्हणूनही उत्सुकता. ( एव्हाना सलिम जावेद जोडी फुटली होती) यावेळी मी मिडियात आलो होतो आणि ‘सागर ‘साठी मढच्या अक्सा बीचवर वस्तीचा भला मोठा आणि दीर्घकालीन सेट लागल्याचे समजले. ( चित्रपटातील कोळी वस्ती) त्या काळात मिडियाला सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी थेट जाता येई. ‘शांतता शूटिंग सुरु आहे ‘ अशी सदरे वाचनीय असत. ‘सागर ‘च्या सेटवर शूटिंग कव्हरेजसाठी जाणे झाले तेव्हा रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनातील नेमकेपणाचा हव्यास अनुभवता आला.
चेहरा है या चांद खिला है… या संपूर्ण गाण्यात एका ठराविक वेळचेच उन हवे होते म्हणून दररोज फक्त अकरा ते दोन याच अवधीत शूटिंग होई. अशाने संपूर्ण गाणे चित्रीत व्हायला दहा बारा दिवस लागले. पण रिझल्ट पडद्यावर दिसतो. येथे रमेश सिप्पीतील दिग्दर्शक दिसतो. मोठी माणसे उगाच मोठी होत नसतात. त्यांच्याकडे असे व्हीजन असते. प्रेक्षकांना काही चांगले देऊ अशी भावना असते. रमेश सिप्पीनेच ‘भष्ट्राचार ‘ ( १९८९) आणि ‘अकेला ‘ ( १९९१) दिग्दर्शित केले आहेत असे त्यात काहीही जाणवले नाही आणि रमेश सिप्पी म्हणजे शोले हे नाते अधिकाधिक घट्ट झाले. अगदी ‘शोले ‘च्या अनेक रिमेक ( आंधी तुफान वगैरे) पडद्यावर आल्या त्या पडण्यासाठीच, त्यामुळे तर ‘शोले ‘ जास्तच प्रभावी वाटला.
‘जमाना दीवाना ‘( १९९५) ही रमेश सिप्पीच्या दर्जाचा नाही. या फिल्मच्या निमित्ताने रमेश सिप्पीची त्याच्या खार येथील ऑफिसमध्ये मुलाखतीचा योग आला आणि मी ‘शोले ‘च्या हॅन्गओव्हरमध्ये असल्याने त्यावरच प्रश्न विचारायला सुरुवात केली. रमेश सिप्पीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. एक प्रश्न महत्वाचा केला, ‘शोले ‘ पब्लिकला आवडतोय हे नेमके कधी लक्षात आले? यावरचे त्याचे उत्तर होते, काही दिवसांनी लक्षात आले की, एकाही गाण्याला एकही प्रेक्षक चहा, सिगारेट अथवा टाॅयलेटसाठी बाहेर पडत नाही हे लक्षात आले, याचाच अर्थ सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय…. रमेश सिप्पीचे हे उत्तर ‘सिनेमाच्या अभ्यासाचा विषय आहे ‘. गोष्ट खूप छोटी वाटते, पण त्यात खूप काही दडलयं…. कालांतराने हाच ‘शोले ‘ थ्री डी अर्थात त्रिमीती तंत्रज्ञानातून आला, विशिष्ट पद्धतीचा चष्मा लावून पुन्हा एकदा ‘शोले ‘ पाहताना रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनातील बारकावे इम्प्रेस करीत होते.
याच प्रवासात रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘जमीन ‘ ( १९८७) च्या जुहूच्या एका पंचतारांकित हाॅटेलमधील मुहूर्त कसा विसरुन चालेल? विनोद खन्नासोबत श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित अशा दोघी होत्या. रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनातील चित्रपटात या दोघी एकत्र अथवा आमनेसामने म्हणून मुहूर्ताच्या पार्टीतच केवढे कुतूहल वाढले हो. पण काही दिवसांच्या शूटिंगमध्ये हा चित्रपट बंद पडला. त्या आसपासच रमेश सिप्पीच्या आणखीन एका चित्रपटाच्या मुहूर्ताला हजर राहण्याचा योग आला आणि तोही चित्रपट खास होता.
सिनेमाचे नाव होते, ‘राम की सीता और श्याम की गीता ‘. विशेष म्हणजे अमिताभ आणि श्रीदेवी दोघांच्याही दुहेरी भूमिका होत्या. ही फिल्म डब्यात न जाता पडद्यावर यायला हवी होती. रमेश सिप्पीच्या दिग्दर्शनासाठी तरी… कोणतीही कलाकृती त्याच्यावर खूप तपशीलवार मेहनत घेतल्यावरच मोठी होते यासाठी रमेश सिप्पी आदर्श आहे.
– दिलीप ठाकूर