महात्मा गांधींनी आयुष्यभरात पाहिला एकच हिंदी चित्रपट!
अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘आदीपुरुष’ या रामायणावरील चित्रपटाला फार मोठ्या टीकेला सामोरे जावं लागलं. त्यावेळी सर्व प्रेक्षकांना आठवलं ते ऐंशीच्या दशकातील रामानंद सागर यांनी निर्माण केलेले ‘रामायण’ हे धारावाहिक. दोन-तीन वर्षांपूर्वी करोनाच्या काळामध्ये पुन्हा एकदा हे धारावाहिक दूरदर्शनवर झळकल्यामुळे आजच्या पिढीला देखील हे रामायण खूप आवडले होते. आज लोक विचार करतात तीस-चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा टेक्नॉलॉजी आजच्या एवढी प्रगत नव्हती, माहितीचा खजिना आजच्या इतका सहज उपलब्ध होत नव्हता अशा प्रतिकूल काळात देखील रामानंद सागर यांनी हे सिरीयल इतक्या चांगल्या पद्धतीने कसे काय बनवले? आणि आज सर्व काही उपलब्ध असताना ‘आदी पुरुष’ इतका वाईट का बनवला गेला? खरोखरच विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. पण तुम्हाला माहिती आहे कां? रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेच्या तब्बल चाळीस–पन्नास वर्ष आधी देखील ‘रामायणा’वर एक चित्रपट आला होता! ज्या चित्रपटाने मोठा इतिहास निर्माण केला होता. (Mahatma Gandhi)
आजही हा चित्रपट रामायणावरील पहिला सुपरहिट सिनेमा समजला जातो. तो चित्रपट होता ‘रामराज्य’ हा चित्रपट १९४३ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते विजय भट. या चित्रपटात प्रेम आदिब आणि शोभना समर्थ यांच्या प्रमुख होत्या. हा चित्रपट आणखी लोकप्रिय बनण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देखील कारणीभूत होते. खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Mahatma Gandhi)
दिग्दर्शक विजय भट हे तीसच्या दशकात एकदा बलसाड येथे महात्मा गांधींना भेटले. जेव्हा महात्मा गांधींना कळाले की, ते चित्रपट निर्माते आहेत तेव्हा त्यांनी विजय भट यांना विचारले,” तुम्ही नरसी भगत यांच्यावर का चित्रपट निर्माण करत नाहीत?” नरसी भगत यांची भजने बापूंना खूप आवडत होती. ‘वैष्णव जन तो तैणे कहिए जे पीड पराई जाणे रे…’ हे बापूंचे प्रिय भजन त्यांचेच होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विनंती ऐकून विजय भट यांनी नरसी भगत हा चित्रपट १९४० साली निर्माण केला. या चित्रपटात विष्णुपंत पागनीस आणि दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. (Mahatma Gandhi)
हा चित्रपट काही ते बापूंना दाखवू शकले नाही परंतु त्यानंतर त्यांनी ‘रामराज्य’ हा रामायणावरील चित्रपट १९४३ साली बनवला. हा चित्रपट मात्र महात्मा गांधी यांनी दोन जून १९४३ रोजी पाहिला खरंतर हा चित्रपट महात्मा गांधी केवळ चाळीस मिनिटे बघणार होते. तेवढाच वेळ त्यांनी विजय भट यांना दिला होता. जुहूच्या शांतीकुमार मोरारजी यांच्या बंगल्यामध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग महात्मा गांधींसाठी ठेवले होते. परंतु महात्मा गांधी यांना हा चित्रपट इतका आवडला की, त्यांनी चाळीस मिनिटांची अट सोडून दिली आणि हा संपूर्ण चित्रपट आवडीने पाहिला. असे म्हणतात, महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव हिंदी चित्रपट आहे. रामराज्य हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरला. तेव्हा पाकिस्तान काही वेगळा झाला नव्हता त्यामुळे कराची, लाहोर, रावळपिंडी इथे देखील हा सिनेमा सुपरहिट ठरला. (Mahatma Gandhi)
या सिनेमाचे खास उर्दूमध्ये पोस्टर बनवून घेण्यात आले होते. या चित्रपटाची लोकप्रियता पाहून हा चित्रपट १९४४ साली मराठी मध्ये डब करून प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला संगीत शंकरराव व्यास यांनी दिलं होतं. रामराज्य या चित्रपटाचे मराठी कनेक्शन देखील खूप महत्त्वाचे होते आणि ते सांगितलेच पाहिजे. या चित्रपटाला संगीत शंकरराव व्यास यांचं होतं आणि या चित्रपटातील एक गाणे सरस्वती राणे यांनी गायलेले होते. ‘वीणा मधुर मधुर कुछ बोल’ हेच ते गाणे! सरस्वती राणे नंतर आयुष्याच्या उतार वयात पुण्यात राहत होत्या. त्यांची त्या काळात जेव्हा मी भेट घेतली होती तेव्हा याच गाण्याचा उल्लेख प्रामुख्याने झाला होता. (Mahatma Gandhi)
=======
हे देखील वाचा : स्ट्रगल पिरीयडमध्ये बनवलेली धून झाली १५ वर्षांनी सुपर हिट
=======
या चित्रपटामध्ये सीतेवर संशय घेणाऱ्या धोबीणीची भूमिका चक्क पार्श्वगायिका अमीर भाई कर्नाटकी यांनी केली होती. पार्श्वगायक मन्नाडे यांची देखील गाण्याची कारकीर्द याच चित्रपटापासून खऱ्या अर्थाने सुरू झाली. विजय भट यांच्या नरसी भगत, भरत मिलाप आणि रामराज्य या तिन्ही चित्रपटांचे संगीत शंकरराव व्यास यांनी दिले होते. त्यामुळे जेव्हा विजय भट यांनी आपल्या ‘रामराज्य’चा रिमेक १९६७ साली केला तेव्हा त्या चित्रपटाचे संगीतकार होते वसंत देसाई यांना या तिन्ही चित्रपटाचे संगीत त्यांनी पुन्हा एकदा ऐकवले होते आणि या चित्रपटाचा शुभारंभ शंकरराव व्यास यांच्या फोटोला हार घालून करण्यात आला होता.भारतातील रामायणावरील हा पहिला लोकप्रिय चित्रपट होता.