काही तरी अतिशयोक्तीपूर्ण दाखवुनसुद्धा यशस्वी ठरलेले मनमोहन देसाई!
तुझे आवडते पाच दिग्दर्शक कोण असा कोणी प्रश्न करताच मी चित्रपती व्ही. शांताराम, राज कपूर, विजय आनंद, प्रकाश मेहरा आणि मनमोहन देसाई यांची नावे घेताच अनेकांना शेवटच्या दोन नावांवरुन आश्चर्याचा धक्का बसतोच. विशेषतः आमच्या मनजींचे अर्थात मनमोहन देसाईंचे नाव ऐकताच त्यांना काही प्रतिप्रश्न करायचा असतो, तत्पूर्वीच मी म्हणतो, मला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक जास्त श्रेष्ठ वाटतो. याचे कारण म्हणजे समाजातील सर्वच स्तरांवर अगदी खालच्या माणसापर्यंत त्यांचे चित्रपट पोहचले. कोणत्याही कलेला मास अपील असणे आवश्यक आहे. अमूक अमूक चित्रपटातील फारच थोड्यानाच फार कळले म्हणजे ती श्रेष्ठ कलाकृती आहे यावर माझा तरी विश्वास नाही.
मनजींची आताच आठवण येण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या खणखणीत यशस्वी वाटचालीतील हायपॉईंट चित्रपट ‘अमर अकबर अँथनी’ (रिलीज २७ मे १९७७) च्या प्रदर्शनास तब्बल ४३ वर्षे पूर्ण झाली. मी गिरगावात राहिल्याने एक तर मनजींचे घर माझ्या खोताची वाडीतील घरापासून अवघ्या पाच मिनिटावर खेतवाडीतील प्रताप निवासमध्ये होते (अगदी १ मार्च १९९४ रोजी त्यांच्या आयुष्याचा शेवटही त्याच इमारतीच्या गच्चीतून त्यांचा तोल जाऊन ते खाली पडल्याने गेला) तसेच हा चित्रपट माझ्या कॉलेजच्या काळातील आहे. तेव्हा चौपाटीवरील भवन्स कॉलेजला येता जाता कायमच ऑपेरा हाऊस थिएटर लागे तेथे या चित्रपटाने तब्बल पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला, त्यामुळे मनावर त्याचे अगदी भव्य पोस्टर डेकोरेशनही बसले. लांबलचक थिएटर डेकोरेशन हे या थिएटरचे वैशिष्ट्य आणि त्यात हा मल्टी स्टार कास्ट चित्रपट त्यामुळे फुल्ल स्कोप मिळाला.
या चित्रपटाला तात्कालिक समिक्षकांनी फार काही महत्व दिले नव्हते, नॉनसेंस मनोरंजन असे म्हटले होते. मनजींनी आपला हुकमी लॉस्ट अॅण्ड फाऊंड हाच फॉर्म्युला वापरताना हिन्दू मुस्लिम आणि ख्रिश्चन असा सर्वधर्मसमभाव साध्य केला होता. लहानपणी हरवलेले तीन भाऊ मोठेपणी योगायोगाने आपल्या आई बाबासोबत भेटतात असे त्यांचे कथासूत्र. ते होताना खलनायकाचा पाडाव आलाच. जोडीला कादर खानचे शब्दांचे खेळ करणारे संवाद आणि एकाच चित्रपटात साईबाबा भक्ती गीत, मग कव्वाली, हिजडा गीत, पॉप आणि प्रेम गीत अशी विविधता असे हे भरगच्च मनोरंजनाचे पॅकेज आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट पुन्हा वेगळी सांगायला नकोच. या चित्रपटाचे नाव ऐकताच ती डोळ्यासमोर येते. या चित्रपटात तीन नायक (तेच ते लहानपणी हरवलेले भाऊ) एकाच वेळेस एका वृध्देला (त्यांचीच ती आई) रक्तदान करतात असा वैद्यकशास्त्रात नसलेला प्रकार या चित्रपटात आहे, इतकेच नव्हे तर त्या सीनला पब्लिक भावूक होत टाळ्या वाजवत (काय सॉलिड डायरेक्शन आहे असेही मध्यंतरात वडापाव खाताना अनेक जण म्हणत) तर साईबाबा भक्तीचे गाणे सुरु असतानाच त्याच वृध्देचे डोळे येतात. तिला नेत्रलाभ होतो. येथेही वैद्यकशास्त्र हरते पण पब्लिक प्रचंड टाळ्या वाजवून दाद देतो. अगदी मी देखिल टाळ्या वाजवल्या. अन्यथा दिग्दर्शन टच मला समजला नाही अशी अख्खा गिरगावात बातमी पसरली असती. खर तर या चित्रपटासाठी ते अमिताभला साईन करायला गेले तेव्हा त्याला या चित्रपटाचे हे नावच विचित्र वाटले हे त्याने अनेकदा आपल्या मुलाखतीत म्हटलयं. पण या चित्रपटापासून मनजी आणि अमिताभ अशी जोडी जमली.
मनजींचे ‘छलिया’ (१९६०, राज कपूर व नूतन) पासून ‘गंगा जमुना सरस्वती ‘(१९८८ अमिताभ, मिथुन, जयाप्रदा) पर्यंत त्यांच्या अनेक चित्रपटांत असेच काही तरी अतर्क्य आणि अतिशोयोक्तीपूर्ण दिसेल. अपवाद ‘आ गले लग जा’ या चित्रपटाचा. तो संवेदनशील चित्रपट होता.
मनजीं आमचे गिरगावकर आणि चांगले मराठी बोलणारे त्यामुळे भेटीचे योग येत. अनेकदा रविवारी गिल्डन लेन मैदानात टेनिस चेंडूने क्रिकेट खेळत, ते ज्या जी. टी. क्रिकेट क्लबचे पदाधिकारी होते तो फलक आजही मला तेथे पाहायला मिळतोय. कधी त्यांच्या चित्रपटाच्या सेटवरही जाण्याचा योग येई. मिडिया आपल्या चित्रपटाच्या सेटवर यावा यासाठी ते आग्रही असत आणि काही गोष्टी जाणूनही घेत. ते राज कपूरचे चाहते असल्याने आर. के. स्टुडिओत त्यांच्या चित्रपटाचा सेट लागे. क्रिकेटच्या दिवसात त्यांच्या चित्रपटाच्या सेटवरही ते वेळ काढून टीव्हीवर सामने पाहत.
तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? यातून एक गोष्ट लक्षात येते, त्यांनी आपल्यातील ‘कॉमन मॅन’ कायम ठेवला आणि म्हणूनच तर ते जनसामान्यांना समजेल अशा भाषेतील/गोष्टीतील/दृश्यातील चित्रपट देत आणि ते चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत चालत. आजच्या ग्लोबल युगात अर्थात मल्टीप्लेक्स युगात त्यांचे चित्रपट हास्यास्पद ठरले असते, नापास झाले असते पण ज्या काळात कॉमन मॅन स्वप्नाळू, आशावादी होता, सिनेमाच्या पडद्यावरच्या जगात हरखून जायचा त्या काळात मनजींच्या चित्रपटांचे हुकमी पर्व होते. ‘गंगा जमुना सरस्वती ‘ (१९८८) रिलीज होईपर्यंत प्रेक्षकांची नवीन पिढी आल्याचे भान त्यांना न आल्याने हा चित्रपट फस्ट डे फर्स्ट शोलाच पडला. विशेष म्हणजे आम्हा समिक्षकांना हा चित्रपट मेन थिएटर मेट्रोत पब्लिकसोबतच दाखवण्यात आला असता मध्यंतरमध्ये मनजी आवर्जून भेटायला आले असता ते धास्तावलेले दिसते. मी पहिल्यांदाच त्यांना तसे पाहिले. तर हा चित्रपट दणकून फ्लॉप झाल्यावर टाईम्स ग्रुपच्या इलेस्ट्रेटेड विकलीच्या मुखपृष्ठावर हताश अमिताभ बच्चनचा फोटो आणि जोडीला ‘माझे दिवस संपले ‘ अशी त्याची भावना प्रसिद्ध झाली आणि त्याची सर्वत्र प्रतिक्रिया उमटली.
मनजींशी झालेल्या काही भेटीतून काही गोष्टी जाणून घेता आल्या. त्यानुसार ते मध्यमवर्गीय संस्कारांचा पगडा असलेल्या परिसरात राहिल्याने आणि विभागातील सिनेमा थिएटरमध्ये येणारे पब्लिक आवडीने काय पाहतेय याची कल्पना असल्याने त्यांनी आपल्या चित्रपटाचा फोकस तसा ठेवला. येथे गोविंदा संस्कृती पाहिली आणि ‘ब्लफमास्टर ‘ चित्रपटात शम्मी कपूरवर गोविंदा आला रे आला गाणे टाकले. त्याचे शूटिंग गिरगावातील मंगल वाडी, बोरभाट लेन वगैरे परिसरात केले.
आपल्या देशात घरात माणूस आजारी पडला की एक कुटुंबिय त्याला डॉक्टरकडे नेतो तर एक कुटुंबिय देवळात जातो, याच मानसिकेचा त्यांनी चित्रपटातून उपयोग केला.
‘कुली’ च्या सेटवर पुनीत इस्सारचा ठोसा पोटात बसल्याने अमिताभ आजारी पडला आणि देशभरात त्याच्या तब्येतीला आराम पडावा म्हणून सर्व जातीधर्मात प्रार्थना झाली हे सगळेच अलौकिक असल्याने चित्रपटात ते दृश्य जाणीवपूर्वक स्लो मोशन ठेवले. तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर नसेलही पण आपण करोडो प्रेक्षकांच्या मनाचा, भावनांचा विचार केला.
ते संगीतकार नौशाद यांचे चाहते होते, पण त्यांच्यासोबत काम करावे अशी पटकथा आपल्याकडे नाही याची त्यांना खंत वाटे. अमिताभ राजकारणात गेला, खासदार झाला हे त्यांना अजिबात आवडले नव्हते. आपल्या मुलाखतीत तसे ते म्हणत. तसे ते अतिशय फटकळ आणि स्पष्टवक्ते होते आणि गंगा जमुना सरस्वती सेटवर असतानाच त्यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली आणि तसेच ते वागले.
आपण जनसामान्यांत रहावे म्हणूनच खेतवाडीत रहातो हे ते आवर्जून सांगत आणि तेच त्यांच्या चित्रपटाच्या संस्कृतीशी मिळतेजुळते आहे. आणि तेच तर एक प्रकारचे खरेपण आहे.