सलग तिसऱ्यांदा स्पृहा करतेय सूर नवाचं सूत्रसंचालन!
१) ‘सूर नवा ध्यास नवा’चं हे चौथं पर्व आणि सलग तिसऱ्यांदा तू सूत्रसंचालन करतेयस, कसा होता प्रवास?
अवॉर्ड शो, लाईव्ह शो, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचं निवेदन मी अगोदर केलं होतं पण रिऍलिटी शो चा अनुभव माझ्याकडे नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा कलर्स मराठीकडून विचारणा झाली तेव्हा थोडीशी धाकधूक होती पण लहान मुलांचं ते पर्व खूप गाजलं. संपूर्ण पर्वात आम्ही खूप धमाल केली. टीमसोबत वेव्हलेंथ छान जुळली आणि त्यामुळेच पुढचं बचपन ते पचपन पर्व करायला सुद्धा खूप मज्जा आली.
२) सूर नवाच्या… या पर्वाविषयी काय सांगशील?
दरवेळेला एक वेगळी संकल्पना घेऊन प्रेक्षकांसमोर यायचा आम्ही प्रयत्न करतो. या कोविड काळातसुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी सगळी काळजी घेऊन, नियम पाळून आम्ही हे पर्व सुरु केलं. पूर्ण टीमचं खरंतर कौतुक करायला हवं सगळीकडे भीतीचं वातावरण असतानासुद्धा अत्यंत धाडसाने सगळी टीम कार्यरत आहे हे या पर्वाचं मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल. महिला विशेष असलेल्या या पर्वामध्ये १५ ते ३० वयोगटातील मुली असून आशा उद्याची हि या पर्वाची टॅगलाईन आहे.
३) महिला विशेष पर्व हि संकल्पना पहिल्यांदा ऐकलीस तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?
सुरुवातीला मलाही काही प्रश्न पडले होते. महिला विशेष पर्व म्हणजे फक्त गायिकांचीच गाणी असणार का? कोणती गाणी असतील? डुएटसचं काय?
पण आता जवळपास ४ आठवडे झाले शूट सुरु करून, या पर्वातही तितकीच धमाल आहे. मुलींचा आवाज अगदी जोशपूर्ण आहे, उदाहरण द्यायचं झालं तर, अजय-अतुल यांची गाणी, देशभक्तीपर किंवा इतर अनेक गाणी जी मेल व्हॉइसेस मध्ये आहेत ती सगळी गाणी मुली ज्या आवेशाने, उत्साहाने, शक्तीपूर्ण सादर करतांना पाहून चकित व्हायला होतं.
४) तुझ्या लूकची सुद्धा नेहमीच चर्चा होत असते, त्यावर कशी मेहनत घेतली जाते?
त्याचं संपूर्ण श्रेय मी माझी स्टायलिस्ट नेहा चौधरीला देईन. प्रत्येक पर्वाच्या दृष्टीने वेगळे लुक्स आम्ही चर्चा करून ठरवतो. या वर्षी मुलीचं पर्व आहे आणि जवळजवळ सगळ्या मुलींना फ्लोरल पॅटर्न हा आवडत असतो त्यामुळे अगदी प्रोमोपासूनच आम्ही माझ्या स्टाईलमध्ये फ्लोरल एलिमेंट आणण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रेसफुल दिसण्यासोबतच कोणताही पेहराव कम्फर्टेबल असावा याकडे विशेष लक्ष दिलं जातं.
५) अवधूत गुप्ते, महेश काळे यांच्याविषयी…
अवधूतला मी अगोदरपासून ओळखत होते, मोरया हा सिनेमा आम्ही एकत्र केला आणि त्यानंतर सूर नवाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकत्र काम करतोय त्यात या पर्वाचा तो निर्माताही आहे. परीक्षक आणि निर्माता या दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरीत्या हाताळतांना पाहून खूप छान वाटतं. अवधूत आणि महेश दोघेही खूप जिनिअस आहेत, दोघांच्या पर्सनॅलिटीज खूप वेगळ्या आहेत. अवधूतची एनर्जी, महेशचा अभ्यास हे सगळं जवळून पाहतांना खूप मज्जा येते. दोघांसोबतही वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात.
६) आत्तापर्यंतचा तुला सगळ्यात जास्त आवडलेला सूर नवा… मधील परफॉर्मन्स कोणता?
हा खूप अवघड प्रश्न आहे अगं. तिथे येणारी सगळीच मुलं माझी खूप लाडकी असतात त्यामुळे सगळेच परफॉर्मन्स आवडतात पण एक असा सांगायचा झाला तर, हर्षुने (हर्षद नायबळ) जेव्हा ‘हंबरून वासराले’ सादर केलं त्यांनतर सगळंच वातावरण भारावून गेलं होत. पुढे अर्धा पाऊण तास तो मला घट्ट बिलगून होता, आम्ही शूट थांबवलं, खूप वेळ तो सोडायलाच तयार नव्हता आणि मलासुद्धा खूप भरून आलं होतं. तो क्षण माझ्यासाठी खूप सुंदर, अविस्मरणीय असा आहे.
७) सध्याची स्थिती पाहता पर्वाचं पुढचं नियोजन कसं असणार आहे?
सध्यातरी त्याविषयी नक्की काही सांगता येत नाहीये. पण बऱ्यापैकी शूट झालेलं आहे काही एपिसोड्स रेडी आहेत. १५ दिवसांच्या या लॉकडाऊनमुळे एक शूट कॅन्सल जरी झालेलं असलं तरी बँक रेडी असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही असं वाटतंय अगदी काही झालंच तरी रसिकप्रेक्षक समजून घेतील अशी खात्री आहे.
८) गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये ‘खजिना’ सारखे उत्तम उपक्रम तू राबवलेस, ती संकल्पना कशी सुचली?
त्याचं इन्स्पिरेशन प्रसाद ओक आहे. २२ मार्च २०२० ला जेव्हा अगदी पहिल्यांदा २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला गेला. त्यावेळी मी २१ दिवस ‘ग्रॅटिट्युड डायरी’ नावाचा उपक्रम सुरु केला, अपेक्षा हि होती कि २१ दिवसांनंतर आपण सगळेच बाहेर पडू पण तसं झालं नाही आणि सगळ्यांप्रमाणेच माझंही मोरल डाऊन झालं होतं. काही सुरु होणारी कामं थांबली होती. आपण सगळेच कठीण काळातून जात होतो आणि अशातच मी प्रसाद ओकची एक इंस्टाग्राम पोस्ट वाचली ज्यात त्याने लिहलं होत, “मी कलाकार आहे, रसिकांचं मनोरंजन करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे आजपासून दररोज मी लाईव्ह येऊन मनोरंजनासाठी जे करता येईल ते करेन.” तिथून मला प्रेरणा मिळाली. लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त मला वाचनाची मदत झाली. त्यामुळे मी ठरवलं कि आपल्या मित्रांसोबतच आपण वाचन, लेखन, त्यांना आवडणारी पुस्तकं, कविता यांवर गप्पा मारल्या तर ते प्रेक्षकांसोबतच मलाही आवडेल. कारण या विषयांवर एरवी फारशा गप्पा होत नाहीत. या अनुषंगाने सुरुवात केली आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.
९) २०२१ च्या सुरुवातीला तू १२ महिन्यात १२ पुस्तके वाचण्याचा संकल्प केला होतास, कसं चाललंय वाचन?
मी ठरवलं होतं कि, स्वतःला फार चॅलेंज करायचं नाही आणि म्हणून एका महिन्याला निदान एक पुस्तक असा संकल्प केला होता. पण आता मी तुला लिस्ट सांगू शकतेय. जानेवारीमध्ये मी ४ पुस्तकं वाचलीयेत, फेब्रुवारीमध्ये २ पुस्तकं आणि १ दिवाळी अंक, मार्चमध्ये २ आणि सध्या एप्रिलमध्ये १ वाचून झालंय आणि एक वाचतेय. म्हणजेच आत्तापर्यन्त ११ पुस्तकं वाचून मी माझा संकल्प जवळजवळ पूर्णच केलेला आहे.
१०) ‘मोगरा’ या ऑनलाईन नाटकात काम करण्याचा अनुभव कसा होता?
मोगरामुळे आम्हाला एक चॅलेंज, एक आशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही. हृषीकेश जोशींच्या या संकल्पनेमुळे आम्हा कलाकारांना छान संधी मिळाली. एकदाही न भेटता, आपापल्या घरातून, अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत, आम्ही या लाईव्ह नाटक अर्थात नेटकाचे जगभरात ५५ प्रयोग केले. अनेक वर्षांनी मोनोलॉग परफॉर्म करण्याची संधी मिळाली. २०-२५ मिनिटांचा मोनोलॉग मला सादर करता आला. असे नवनवीन प्रयोग रंगभूमीवर होतात आणि प्रेक्षक त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात याचा खूप आनंद आहे.
११) येणाऱ्या काळात कोणते नवीन प्रोजेक्ट्स पाहायला मिळतील?
सध्याच्या स्थितीत काही प्रोजेक्ट्स विषयी फार माहिती देता येत नाहीये. माझी ‘पुनःश्च हरिओम’ हि फिल्म जुलै-ऑगस्ट मध्ये रिलीज होईल. काही जाहिराती, वेब प्रोजेक्ट्स वर काम चालू आहे.
मुलाखत व शब्दांकन : धनश्री गंधे.
=====
हे देखील वाचा: नव्या वर्षात स्पृहा रमणार पुस्तकांच्या राज्यात
=====