दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘हिंदी पिक्चरमधील मराठी बाणा’ कायमच सुपरहिट
हिंदी पिक्चरमधील मराठीचा ठसा, ठसका, गाण्याचा मुखडा, एखाद्या डायलॉगची मेजवानी महाराष्ट्रीय चित्रपट रसिकांना कायमच भारी पसंती. आपलीशी वाटणारी. या गोष्टींना थेटरातील हाऊसफुल गर्दीतून हमखास टाळ्या नि शिट्ट्या. ‘ॲनिमल’ हे ताज उदाहरण. अनेकांनी आपल्या उपेंद्र लिमयेच्या भन्नाट दृश्यांसाठी हा लांबलचक पिक्चर एन्जाॅय केला.
फ्लॅशबॅकमध्ये गेल्यावर ‘हिंदी पिक्चरमधील मराठी बाणा’ कायमच सुपरहिट झाल्याचं दिसतेय आणि व्हायलाच हवा. आता माझी सटकली. फार हिट झालं नाही का ? असाच एक तुकडा, पांडोबा पोरगी पटली रे पटली…अग ये जवळ ये लाजू नको…जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना ‘कहानी किस्मत की’ (मुंबईत रिलीज २१ डिसेंबर १९७३. चक्क पन्नास वर्ष पूर्ण) मधील धर्मेंद्र आणि रेखाचे छेडछाडीचे प्रेमगीत आले असेलच. बिनाका गीतमालात हे गाणे फेवरेट होते.(Superhit)
अरे रफ्ता रफ्ता देखो.. ऑख मेरी लडी है.. दक्षिण मुंबईतील हुतात्मा चौक परिसरात क्रेनच्या मोठ्याच पाळण्यात हे दोघे आणि गर्दीतील मुंबईकर पब्लिक यांची मजा एन्जाॅय करतेय. मुंबईतील विविध स्पाॅटवर रंगत रंगत (जत्रेतील पाळण्यातही) छेडछाडीचं हे गाणं शेतजमिनीवर येते आणि धर्मेंद्र व रेखाचं महाराष्ट्रीय रुप दिसते. दोघांच्या भोवतीच्या डान्सरनीही तसेच महाराष्ट्रीय रुपडं घेतलयं. मराठी माणूस हमखास खूश होणारच. त्या काळात मनापासून झालाच. पंजाबी धर्मेंद्र आणि दक्षिण भारतीय रेखा महाराष्ट्रीय रुपात पिक्चरमध्ये दिसताहेत म्हटल्यावर मराठी मन आनंदले. आता हा मराठी टच मनोरंजनाचा भाग.
गीतकार राजेंद्र कृष्ण आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या अपेक्षेबाहेर किशोरने गाण्यात मस्त रंग भरलाय, मस्ती केलीय. किशोरकुमारला एकदा का गाण्याची पडद्यावरची सिच्युएशन आणि आपण कोणासाठी गाणार आहोत हे समजलं रे समजलं की, त्याला सूर सापडलाच समजा. गाणे अधिकाधिक रंगत जाणारच. हा महाराष्ट्रीय तुकडा का बरे ? कालांतराने मी मिडियात आल्यावर या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांच्या मुलाखतीचा योग आला असता मी त्यांना आठवणीने विचारले असता त्यांच्या उत्तराने मी सुखावलो. (Superhit)
ते म्हणाले, दादा कोंडकेचा ‘सोंगाड्या’ मी एन्जाॅय केल्यापासून ठरवले आपल्याही पिक्चरमध्ये दादा कोंडके रंग हवा. मला फारसं मराठी येत नाही. दादांच्याच ‘एकटा जीव सदाशिव’ मधील गाण्यात ये जवळ ये लाजू नको आहे ते आमच्या गाण्यात फिट्ट बसले आणि गाणे हिट झाले. खरं तर ही भन्नाट कल्पना कल्याणजी आनंदजीना सुचली. त्याना मराठी चांगले येते. त्यांनी गाण्याची सिच्युएशन राजेंद्र कृष्णना सांगताना हा पंचही सांगितला. तो चांगलाच हिट झाला, अर्जुन हिंगोरानी म्हणाले.
‘करिश्मा कुदरत का’ (१९८५) या त्यांच्या मनोरंजक चित्रपटाच्या निमित्ताने मी त्यांना वांद्र्यातील पाली मार्केटजवळील घरी भेटलो होतो.
अर्जुन हिंगोरानी यांची दोन वैशिष्ट्य. त्यांनी आपल्या पिक्चरचे नाव कायमच ‘के’वरुन ठेवले (कब क्यू और कहा वगैरे) आणि धर्मेंद्रला पहिली रुपेरी संधी त्यांनीच दिली. चित्रपट होता, “दिल भी तेरा हम भी तेरे “(१९६०).. आणि तेव्हापासून धर्मेंद्रने त्यांच्या दिग्दर्शनातील प्रत्येक चित्रपटात भूमिका साकारली. आपल्याला अनेक प्रकारची मदत करणाऱ्यांना कधीच न विसरणे हे धर्मेंद्रचं वैशिष्ट्य.(Superhit)
‘कहानी किस्मत…’ तद्दन मसालेदार पिक्चर. त्यात थोडं रहस्यही. ‘ज्वेल थीफ’च्या कथालेखनाने के. ए. नारायण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत चांगली मागणी आली. पिक्चर हिट सबकुछ फिट्ट हा तर चित्रपटसृष्टीचा अलिखित नियम आहेच. जाॅनी मेरा नाम, व्हीक्टोरिया नंबर २०३ हेही त्यांनीच लिहीले. कहानी किस्मतची कथा त्यांची, पटकथा अर्जुन हिंगोरानी यांची तर संवाद एस. एम.अब्बास यांचे. छायाचित्रणकार किशोर रेगे, संकलक अनंत आपटे आहेत.
धर्मेंद्र व रेखासह यात अजित, प्रेमनाथ, राजेंद्रनाथ, जयश्री टी, सुलोचना, भारत भूषण, अभी भट्टाचार्य, शेट्टी, युनुस परवेझ, स्वत: अर्जुन हिंगोरानी (ते आपल्या चित्रपटात अनेकदा भूमिका साकारत) आणि लीना दास यांच्या भूमिका. यातील शेट्टी म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टीचे वडील. ते पिक्चरमध्ये आहेत म्हणजे भारी फायटिंग एन्जाॅय करायला मिळणार याची खात्रीच असे. इमेज हो, दुसरं काय? पिक्चरमधील तू यार मेरा दिलबर मेरा (आशा भोसले), दुनिया मुझसे कहती है (किशोरकुमार) ही गाणीही हिट होती. (Superhit)
धर्मेंद्र व रेखाचा १९७३ मध्ये रवि नगाईच दिग्दर्शित ‘कीमत’ हिंदीतील जेम्स बाॅण्ड होता. साठच्या दशकातील सोबर, आदर्शवादी (सत्यकाम, देवर, नया जमाना असे अनेक चित्रपट) धर्मेंद्र ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ‘फूल और पत्थर’ (१९६६) पासून हळूहळू कात टाकत होता आणि आता तो ढिश्यॅव ढिश्यॅववाला हीरो म्हणून पब्लिकला आवडत होता.
==========
हे देखील वाचा : महेश भट यांच्यासोबत भांडून अनुपम यांनी मिळवली भूमिका
=========
रेखा सुरुवातीच्या काळात ‘आजची जणू मल्लीका शेरावत’. बोल्ड आणि ब्युटीफुल. अजूनपर्यंत तिच्याकडून अभिनयाची अपेक्षा ठेवली जात नव्हती. तशी भूमिका मिळावी लागते. माणिक चटर्जी दिग्दर्शित ‘घर’ आणि ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘खूबसूरत’पासून रेखा बदलली ती कायमचीच. तिचे फॅन्स वाढले, तेही कायमचेच.(Superhit)
दोघांसाठीही ‘कहानी किस्मत की’ एक व्यावसायिक वाटचालीत एक मसाला मिक्स पिक्चर. असे अनेक चित्रपट अनेक कलाकार करत असतातच. महत्वाचे आहे, ‘कहानी किस्मत की’ ने ज्युबिली हिट यश मिळवले. मराठा मंदिर चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी आठवड्यांचा मुक्काम केला आणि त्यात जोरदार ठसका होता, अगं ये जवळ ये लाजू नको…