
‘या’ मराठी महिला दिग्दर्शकांनी गाजवलाय Indian Cinema!
मराठी सिनेमा म्हणजे केवळ एखादी गोष्ट सांगण्याचं माध्यम नाही, तर मानवी भावना, समाजातील नाजूक प्रश्न आणि आयुष्यातील वास्तव या सगळ्या गोष्टींचं सूक्ष्म पद्धतीने केलेलं निरीक्षण दाखवण्याचं महत्वाचं माध्यम आहे आणि मराठी सिनेमाच्या याच प्रवासात काही महिला दिग्दर्शिकांनी आपल्या अनोख्या दृष्टीकोनाने चित्रपटांना एक ‘फिमेल टच’ दिला आहे. मराठी चित्रपटसृष्टी आपल्या टॅलेंटने समृद्ध करणाऱ्या महिला दिग्दर्शकांबद्दल आपण आज जाणून घेऊयात… (Marathi Female Directors)
या दिग्गजांमध्ये सर्वात अग्रस्थानी असलेलं नाव म्हणजे सुमित्रा भावे (Sumitra Bhave). त्यांच्या सिनेमांमध्ये सामान्य माणसाचं अंतरंग, सामाजिक अन्याय, आणि भावनिक गुंतागुंत इतक्या सौम्यपणे सादर केली जायची की त्यातूनच त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. सुमित्रा भावे यांनी १९८५ साली सुरुवात केली ‘बाई’ या लघुपटाने, ज्यात मुंबईच्या एका वस्तीत राहणाऱ्या महिलेच्या जीवनाची कठीण वास्तविकता दाखवली होती. या चित्रपटानेच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला आणि ‘मानवी स्वभावाभोवती फिरणारे चित्रपट’ अशी त्यांची एक ठळक शैली चित्रपटसृष्टीत निर्माण झाली. यानंतर त्यांनी दिग्दर्शक सुनील सुखठणकर यांच्यासोबत तब्बल १७ चित्रपट, ५० पेक्षा जास्त लघुपट आणि सिरियल्स एकत्र केल्या. १९९५ साली आलेला त्यांचा पहिला फीचर चित्रपट ‘दोघी’ यात दोन बहिणींच्या आयुष्यातील सामाजिक दबाव आणि मनोवैज्ञानिक गुंतागुंतीची गोष्ट होती. त्यानंतर ‘दहावी ‘फ’ (२००२) मध्ये शालेय शिक्षणातील अस्वस्थता, ‘वास्तुपुरुष’ (२००२) मध्ये परंपरा आणि आधुनिकतेतील संघर्ष आणि त्यांच्या इतर चित्रपटांमध्ये एकूणच स्त्री विषयक अनुभव, कुटुंब, नैराश्य, स्मृती आणि निसर्ग हे विषय नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट दिठीमध्ये जीवन, मृत्यू आणि आध्यात्मिकतेचा सुंदर मिलाफ पाहता येतो. (Sumitra Bhave Movies)

या नंतरच्या ग्रेट दिग्दर्शिका आहेत सई परांजपे, ज्यांनी हिंदीमध्ये ‘स्पर्श’, ‘चश्मेबद्दूर’ आणि ‘कथा’ या चित्रपटांतून मानवी जीवनातील सूक्ष्म भावनांच चित्रण तर केलंच, शिवाय मराठी रंगभूमीला त्यांनी नवा आयाम दिला. त्यांचे सिनेमे दैनंदिन विषयाभोवती फिरतात. सामान्य माणसांचं जीवन पडद्यावर जिवंत करणारी चित्रपट निर्माती म्हणून त्यांची विशेष ओळख . याशिवाय रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांनीही मराठी चित्रपटविश्वात दिग्दर्शिकेची ओळख निर्माण केली. त्यांचा २००९ साली आलेला मराठीतला ‘रीटा’ आणि २०२१ साली नेटफ्लिक्सवर आलेला ‘त्रिभंगा’ हा चित्रपट स्त्री जीवनावर भाष्य करणारा संवेदनशील चित्रपट ठरला.

यानंतर श्रावणी देवधर (Shravani Deodhar) यांनीही मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये साहित्यिक दृष्टीकोनातून सिनेमा केला. त्यांचा लपंडाव हा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा चित्रपट आणि हिंदी सिनेमात केलेला ‘पहेचान: द फेस ऑफ ट्रुथ’ अतिशय गाजला. याशिवाय स्वप्ना वाघमारे जोशी, प्रतिमा जोशी यासुद्धा आज घडीच्या Prominent Directors पैकी एक आहेत. या व्यतिरिक्त नव्याने दिग्दर्शकीय क्षेत्रात आलेल्या मृण्मयी देशपांडे, मनवा नाईक, क्रांती रेडकर, समृद्धी पोरे यासुद्धा मानवी भावनांचे विविध पैलू उलगडत स्त्रीच्या जीवनाचे कंगोरे आपल्या समोर वेगळ्या पद्धतीने मांडू पाहत आहेत.
================================
हे देखील वाचा : Dharmaveer 2 मधील शिवरायांची ‘ती’ फ्रेम खास का आहे?
================================
दिग्दर्शन क्षेत्रातलं आणखी एक महत्त्वाचं मराठी नाव म्हणजे गौरी शिंदे. त्यांचे ‘ इंग्लिश विंगलिश’ आणि ‘डीअर जिंदगी’ हे चित्रपट चांगलेच गाजले. महिलांचं भावविश्व त्यांनी उत्तमरित्या रेखाटलं होतं. या सर्व महिलांनी मराठी तसच हिंदी सिनेमा क्षेत्रांत नातेसंबंध, समाज, माणुसकी, स्त्रीविश्व या विषयांना हात घालत त्यांच्या दिग्दर्शनाने आकार दिला. सुपरहीरो आणि scifi चित्रपटांच्या आजच्या जगात त्यांचा सिनेमा मानवी भावनांची फुंकर घालत आजही प्रेक्षकांवर प्रभाव टाकतो आणि येणाऱ्या काळातही त्यांच्याकडून आपल्याला असेच अनेकानेक यशस्वी प्रयोग पहायला मिळतील अशी खात्री वाटते.
-श्रेया अरुण
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi