‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व… राजा परांजपे!
मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अगणित महत्वाच्या व्यक्तिमत्वांतील एक महत्वाचे नाव राजा परांजपे! आपल्या सामाजिक भान आणि कर्तृत्वाने त्यांनी आपल्या नावाला कायमस्वरुपी ओळख मिळवून दिली. कला माध्यम हा जणू आपला श्वास आणि ध्यास आहे अशा भावनेने ते वावरले. त्यांच्या अफाट कर्तृत्वावर थोडक्यात फोकस टाकणे निव्वळ अशक्य आहे. तरी त्यांच्या वाटचालीचा थोडक्यात वेध घेण्याचा हा प्रयत्न.
राजा परांजपे, ‘स्वातंत्र्योत्तर काळात’ मराठी चित्रपटांना एक वेगळी दिशा देणारा दिग्दर्शक, त्याचबरोबर ते अभिनेते म्हणूनही कार्यरत होते. अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली ती तीसच्या दशकात कलामहर्षि बाबूराव पेंटर यांच्या ‘सावकारी पाश’ व ‘प्रतिभा’ या चित्रपटांत. मराठी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत राजा परांजपे यांचे स्थान खूपच वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. चित्रपट या माध्यम व व्यवसायाकडे गंभीर विचारमूल्ये या दृष्टिकोनातून पाहणे आणि खेळकर शैली ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये मानली गेली.
आई वडिलांच्या संगीत आणि नाटक यांच्या आवडीचे संस्कार राजा परांजपे यांच्यावर झाले. राजा परांजपे यांचा या क्षेत्रातील प्रवास खूप मोठा. त्यात आकार येत गेला तो, दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याकडे थोरांताची कमळा’ (१९४१), ‘सूनबाई’ (१९४२), ‘सासूरवास’ (१९४४) या चित्रपटाच्या वेळी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करु लागले तेव्हा ! त्यांनी काही काळ नजम नकवी, शाहिद लतीफ यांच्याकडे हिंदी चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर निर्माते जी. एम. शहा यांनी राजा परांजपे यांना स्वतंत्रपणे दिग्दर्शनाची संधी दिली तेव्हा त्यांनी वि. स. सुखटणकर यांच्या ‘जाई जुई’ या कथेवर ‘बलिदान’ (१९४८) या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मागोमाग वामनराव कुलकर्णी यांनी ‘जिवाचा सखा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी दिली, त्यात राजाभाऊंनी प्रमुख भूमिकाही केली आणि याच चित्रपटापासून राजा परांजपे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके हे त्रिकूट उदयास आले. मराठी चित्रपटाचे नवे पर्व सुरु झाले आणि त्याचा कायमस्वरुपी ठसा उमटला. एका त्रिकूटाचे सुवर्ण युगच ते जणू.
कर्तृत्वाची केमिस्ट्री म्हणजे काय हे या तिघांच्या एकत्र येण्याने दिसतेय. या तिघांच्या एकत्र चित्रपटांची नावे जरी द्यायची झाली तरी ती वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे दिसतेय. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, गंगेत घोडं न्हालं, आंधळा मागतो डोळा, देवघर, जगाच्या पाठीवर, आधी कळस मग पाया, सुवासिनी, बायको माहेरी जाते, गुरुकिल्ली आणि आधार हे ते चित्रपट आहेत म्हणजे १९४८ ते १९६९ असा हा दोन दशकांचा मोठा प्रवास आहे. याच काळात मराठी चित्रपट आपली स्वतंत्र ओळख निर्माण करीत होता आणि त्यात या त्रिमूर्तीने महत्वाची भूमिका आणि भावना बजावली. मराठी चित्रपटाचे जे वेगळेपण आहे, स्वतंत्र अस्तित्व आहे, ते यात दिसतेय. या चित्रपटात विविध प्रकारची कथाबीज आहेत आणि यातील अनेक चित्रपटांना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला हे विशेष उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे राजा परांजपे दिग्दर्शित काही मराठी चित्रपटांची हिंदीत रिमेक करण्यात आली. उदाहरणार्थ, पेडगावचे शहाणे या चित्रपटावरुन चाचा चौधरी (दिग्दर्शन राजा परांजपे) तर गंगेत घोडं न्हालं या चित्रपटावरुन एक दिल सौ अफसाने. तर ऊन पाऊस या चित्रपटावरुन हिंदीत रवि टंडन दिग्दर्शित ‘जिंदगी’ (संजीवकुमार आणि माला सिन्हा) आणि मग रवि चोप्रा दिग्दर्शित ‘बागबान’ (अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी) अशी रिमेक करण्यात आली.
राजा परांजपे दिग्दर्शित अनेक मराठी चित्रपटांनी मानाचे अनेक पुरस्कार प्राप्त केले. ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. इतरही काही चित्रपटांना पुरस्कार प्राप्त झाले. तर त्यांनी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे जाऊन ‘बाप बेटे’ (१९५९) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तेथून आल्यावर त्यांनी आपली श्रीपाद चित्र ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. आणि तेव्हा त्यांचा पहिला चित्रपट होता, जगाच्या पाठीवर. या चित्रपटातील एक धागा सुखाचा, बाई मी विकत घेतला श्याम, नाच नाचुनी अती मी दमले ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. तर त्यांचा रहस्यपट ‘पाठलाग’वरुन निर्माते प्रेमजी यांनी राज खोसला यांच्याकडे दिग्दर्शन सोपवत ‘मेरा साया’ पडद्यावर आणला.
अभिनेता म्हणून राजा परांजपे यांची एक वेगळी ओळख आणि वाटचाल होती. आपल्याच दिग्दर्शनातील एकूण १७ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारलीय. त्याशिवाय इतरही काही चित्रपटात भूमिका साकारल्या. राजदत्त दिग्दर्शित मधुचंद्र, अपराध, या सुखांनो या, वराडी आणि वाजंत्री, बाळ कोरडे यांचा तिथे नांदते लक्ष्मी, दत्ता धर्माधिकारी यांचा नसती उठाठेव, प्रभाकर पेंढारकर यांचा प्रीत तुझी माझी या चित्रपटांचा उल्लेख करायला हवा. राजा परांजपे यांची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. १९५५ साली पृथ्वीराज कपूर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत चीनला गेलेल्या चित्रपट कलाकारांच्या शिष्टमंडळात राजा परांजपे यांचा सहभाग होता.
‘पेडगावचे शहाणे’ (१९५२) हा राजा परांजपे यांच्या अभिनेता आणि दिग्दर्शनीय कारकिर्दीतील माईल स्टोन चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा ग. दि. माडगूळकर आणि ग. रा. कामत यांची आहे. राजा परांजपे यांची या चित्रपटात दुहेरी भूमिका आहे. मनोरुग्णालयातून निसटलेल्या एका रुग्णाला शहाणे कुटुंबिय आपले झांजीबारहून येणारे काका समजतात. आणि जेव्हा खरे काका येतात तेव्हा त्यांची रवानगी मनोरुग्णालयात होते. हे सगळे विनोदाच्या अंगाने होते. शहाणे कुटुंबात काका म्हणून वावरणारा मनोरुग्ण दरम्यानच्या काळात या बेशिस्त कुटुंबाला व्यवस्थित शिस्त लावतो, वठणीवर आणतो. आणि खरोखरच ‘शहाणे’ करतो. ही या चित्रपटाची गोष्ट आहे. या चित्रपटाच्या निर्मीतीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणी आल्या पण ध्येयवादी राजा परांजपे यांनी हा चित्रपट पडद्यावर आणला आणि रसिकांना एक उत्तम कलाकृती पाह्यला मिळाली.
राजा परांजपे यांच्या इतरही काही कसदार कलाकृतींबाबत असे काही वैशिष्ट्यपूर्ण सांगता येईल. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने त्या काळातील सिनेमाचे जग वावरत होते. आणि ते खरेपण तेव्हाच्या चित्रपटात दिसते आणि काळ पुढे सरकला तरी ते टिकून आहे. अनेक मराठी कलाकारांच्या यशोगाथेत राजा परांजपे यांचे विशेष स्थान आहे. त्यातील काही उदाहरणे देता येतील. राजा परांजपे यांनी आपल्या ‘हा माझा मार्ग एकला’ (१९६३) या चित्रपटात तेव्हा चार वर्षांचा असलेल्या सचिन पिळगावकरला संधी दिली आणि त्याची ‘वंडरबाॅय’ म्हणून जाहिरात केली. सचिनने तो विश्वास सार्थ ठरवलाच पण तो कायमच राजा परांजपे यांचे नाव विशेष आदराने घेतो. सीमा देव यांच्या रुपेरी जीवनाला राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ (१९६०) या चित्रपटातील आंधळीच्या भूमिकेने दिशा मिळाली. त्यानंतर राजा परांजपे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. त्यातील ‘सुवासिनी’ हा त्यांचा अतिशय आवडता चित्रपट असल्याचे त्यांनी अनेकदा तरी मला सांगितलयं. या चित्रपटाची व्हिडिओ कॅसेटच त्यानी जपून ठेवली आणि पुन्हा पुन्हा तो पाहिला. ही राजा परांजपे यांच्या कर्तृत्वालाच दाद आहे.
राजा परांजपे यांच्या चौफेर वाटचालीचा हा फक्त ट्रेलर ठरावा असे त्यांचे कर्तृत्व अफाट आहे याची आपणांस कल्पना आली असेलच. अशाच अनेक बहुगुणी व्यक्तिमत्वांनी मराठी चित्रपटाला कायमच मोठे केले, समाजात मराठी चित्रपटाला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. हे त्यांचे देणे मोजता न येणारे आहे.