दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मराठी चित्रपटसृष्टी कात कधी टाकणार? ‘सिंडिकेट’ बनाना मंगता है!
‘पुष्पा – द रायजिंग’ सिनेमा गाजला. तो गाजल्यानंतर अर्थातच मराठी चित्रपटांसाठी आता नवं आव्हान निर्माण झालं आहे. पण खरंतर ते सध्या कोणी मनावर घेताना दिसत नाही. सध्या मराठी चित्रपटाची लढाई कोण कधी कोणता सिनेमा रिलीज करतो आणि मग आपण कधी करायचा या झोनमध्ये आहे.
अगदीच प्रिसाईजली बोलायचं, तर आता शुक्रवारचं गणित घालता घालता ओटीटीचंही गणित घातलं जातं, इतकाच काय तो फरक झाला आहे. पण आपण म्हणताना मनोरंजनसृष्टीला इंडस्ट्री म्हणत जरी असलो तरी या क्षेत्राला अद्याप तो दर्जा देण्यात आलेला नाही आणि तो मिळावा म्हणून आम्हीही (हिंदी/मराठी इंडस्ट्री) कसून प्रयत्न केलेले नाहीत. पण आत्ताचा मुद्दा हिंदीचा नाहीये.
पुष्पाच्या पहिल्या लेखात आपण केवळ मराठी सिनेमा आणि एकूण त्याची स्थिती यावर बोललो होतो. हा दुसरा भाग जरा जास्त गंभीर आणि टोकदार असणार आहे. अर्थात, व्यक्तीश: यात कुणावरही टिप्पणी नाही. पण काही गोष्टी साकार होण्यासाठी आणि त्याचा स्वीकार व्हावा म्हणून एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं असतं, ते इथे दिसत नाहीत. एक मिनीट… “एकत्र या”, असा डोस इथे अजिबात दिला जाणार नाहीये.
पुष्पा इथे येतो आणि तो चालतो, हे एका दिवसात होत नाही. पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कैक वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमाचं वेड तीळ तीळ मराठी मन काबीज करत आलं आहे. आता मुद्दा हा की, आपण काय करायचं? आपण पुन्हा थिएटर्स मिळत नाहीत म्हणून हंबरडा फोडायचा. मग कुणीतरी थिएटर्स फोडायची. मग कुणीतरी समजुतीची भाषा करायची…आणि मग पुन्हा सगळं आलबेल झालं की, सगळे शांत. पुन्हा एक नवा मोठा सिनेमा आला की, पुन्हा हंबरडा ठरलेला. गेले कैक वर्षं आपण हेच करत आलोय. मुळात आपल्याला रडायची फार सवय होऊन बसली आहे. म्हणजे, गंमत बघा..
इंडस्ट्री कधी कधी रडते? सर्वसाधारणपणे खालील मुद्द्यांवर इंडस्ट्री रडते.
- निर्माता मिळत नाही म्हणून
- दिग्दर्शकाने बजेट कायच्या काय वाढवलं म्हणून
- सिनेमाला थिएटर नाही म्हणून
- थिएटरवर लागला तर प्रेक्षक नाहीत म्हणून
- सिनेमा लगेच उतरवला म्हणून
- सिनेमा झाला तरी अनुदानाला गेला नाही म्हणून
- अनुदानाला गेला, पण ४० लाख मिळाले नाहीत म्हणून
- बडा हिंदी सिनेमा आला म्हणून
- कलाकार प्रमोशनला येत नाहीत म्हणून
- निर्माता युनिटचे पैसे देत नाही म्हणून
अशी अनेत कारणं सतत इंडस्ट्रीला डागण्या देत असतात. पण आपल्याला काय त्याचं..? आपण केवळ आपला मराठी सिनेमा आशयघन असतो नामक जुनी जीर्ण गोधडी डोक्यावर घेऊन पाय ताणून देण्यात धन्यता मानतो.
कुठलाही नवा सिनेमा आला की, त्याबद्दल बोलताना सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक यांचं ठरलेलं वाक्य कोणतं असतं माहितीये? “आमचा विषय वेगळा आहे आणि वेगळ्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न यात आम्ही केला आहे.” अरे कशाला पाहिजे प्रत्येकवेळी वेगळा विषय? मराठी सिनेमाच्या मानगुटीवर बसलेलं हे ‘आशयघन’ विषयाचं भूत उतरायचं नाव घेत नाहीये.
साधे, सुटसुटीत.. गल्लाभरू, व्यावसायिक सिनेमे असायला हरकत नाही. आपण जर तद्दन व्यावसायिक सिनेमा केला, तर जणू कोण महापाप आपल्या हातून घडेल असं इथल्या बहुतांश सिनेमेकर्सना वाटत असतं. असं वाटून कित्येक लोक सामान्यच सिनेमा बनवतात हा भाग वेगळा. पण तद्दन व्यावसायिक, गल्लाभरू सिनेमा बनवणं खायचं काम नसतं भाऊ! त्याला भलती तयारी करावी लागते, माणसांची नस ओळखावी लागते, हे लक्षात येत नाही.
=====
हे देखील वाचा: पुष्पा..आय हेट टिअर्स! मराठी चित्रपटांसमोर आता नवं आव्हान
=====
सध्या आपण केवळ आपला स्वत:चा विचार करू लागलो आहोत. इंडस्ट्रीतला प्रत्येकजण आज मिळतंय ना घ्या. याच तत्वावर काम करतोय. ते पूर्णत: चूक आहे असंही नाही. पण त्यापुढेही काही असायला हवं. आपलं काम करता करता हळूहळू आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहोत, त्याचा आलेख कुठे चालला आहे, याकेडही लक्ष द्यायला हवं. पण होतंय नेमकं उलट!
म्हणजे, असं बघा. आज आपल्या मराठी इंडस्ट्रीतले बहुतांश कलाकार वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सदस्य आहेत. त्यात गैर काहीच नाही. असूदेत. प्रत्येकाची विचारसरणी असते. त्यानुसार ज्याला त्याला तो पक्ष जवळचा वाटतो, आपला वाटतो. ओक्के. पण पुढं काय?
सर्वसाधारणपणे कलाकार कोणताही राजकीय पक्ष का जॉईन करतो? वैचारिक साम्य हा एक भाग झाला. पण त्याही पलिकडे, हे कलाकार अडीअडचणीत सापडले तर त्यांच्या मदतीला सो कॉल्ड पालकसंस्था येत नाहीत, म्हणून आलेल्या असुरक्षिततेतून हे कलाकार पक्षप्रवेश करतात.
कधी कुणाचे पैसे वेळेत दिले जात नाहीत. कधी कुणाचे सिनेमे थिएटरवर लागत नाहीत. बऱ्याचदा सेन्सॉरवेळी अडवणूक होते. चित्रिकरण करताना, करण्याआधी अडचणी येतात. या सगळ्यावर पक्षाला जवळ करणं हा रामबाण उपाय असतो. उघड उघड पक्षप्रवेश करणारे जसे आपल्याकडे आहेत, तशी अनेक अदृश्य मंडळीही आहेतच. पण त्यालाही हरकत नाही. शेवटी अडचणीत सापडलेल्या मला कुणीतरी बाहेर काढणारं असेल, तर मी त्याला जवळ करणार आहेच. पण त्यापुढे काय?
आज महाराष्ट्राच्या विविध राजकीय पक्षांमध्ये बरेच अनुभवी कलाकार आहेत. जे विचार करतात, पण त्याचं पुढं काही होताना दिसत नाही. या सगळ्या कलाकारांना एकत्र करून इंडस्ट्रीमध्ये भरभक्कम आणि कायमस्वरुपी इन्स्टिट्युशनल सुधारणा करावी, बदल करावा असं कोणत्याही राजकीय पक्षाला वाटत नाही. इनफॅक्ट कलाकार म्हणूनही अपवाद वगळता कुणी तसा प्रयत्न केलेला दिसत नाही. ती आजची खरी गरज आहे.
फार लांब कशाला, गेल्या वर्षी राजू सापते या कुशल कलादिग्दर्शकाने कारण सांगून आत्महत्या केली. काय झालं पुढं? राजू यांनी ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, ते पोलीसांच्या हाती लागून पुन्हा संघटनेत जामीन घेऊन रूजू झाले. त्यानंतर बऱ्याच हालचाली झाल्या.
आदेश बांदेकर, सुबोध भावे यांनी यावेळी पुढाकार घेऊन अनेक गोष्टी केल्या. लॉकडाऊनमध्येही त्याचा प्रत्यय आला. झूम मिटिंग्ज घेतल्या गेल्या, ही इंडस्ट्री पुन्हा सुरू कशी करता येईल, याबद्दल चर्चा झाल्या, वगैरे वगैरे. त्यावेळी खायचीच भ्रांत होती म्हणून हिंदी-मराठी आदी निर्माते, कलाकार एकत्र आले. झालं! आता इंडस्ट्री सुरु झाली. आता गरज संपली. गरज त्यांची संपली. पण मराठी इंडस्ट्री म्हणून आपली गरज संपणं दूर उलट ती दृष्टीस पडणं फार आवश्यक बनलं आहे.
तुम्हाला आठवतंय, लॉकडाऊन लागलं तेव्हा सिनेमाघरं सुरू होऊन पहिला सिनेमा सूर्यवंशी येणार असं ठरलं होतं. सूर्यवंशी पुन्हा पुन्हा पुढे गेला. पण इतर सगळ्या हिंदीवाल्यांनी सबुरीने घेतलं. कुणीही भांडलं नाही. लोक थिएटरमध्ये येणं सर्वांसाठी महत्वाचं होतं. आपण असं काय प्लॅनिंग केलं?
सुदैवााने झिम्मा चाालला. पांडू चालला. आता येणारा प्रेक्षक जाऊ नये म्हणून आपण आगामी चित्रपटांचा काही क्यू लावला? शक्यच नाही. कारण इथे कुणीच कुणाचं ऐकत नाही. हिंदीत सूर्यवंशी असेल तर मराठीत असा कोणता सिनेमा आहे जो हमखास प्रेक्षक खेचेल? हा प्रश्न मी तेव्हाच स्वत:ला विचारला होता. त्यावेळी माझ्या मनात ‘पावनखिंड’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ हे दोन सिनेमे आले. याचा अर्थ बाकीचे वाईट अशातला अजिबात भाग नाही, तर या दोनपैकी एखादा रिलीज कसा होईल यासाठी सगळ्या सिंडिकेटनं एकत्र यायला हवं होतं.
=====
हे देखील वाचा: सोशल मीडिया आणि रसिकांच्या उलटसुलट प्रतिक्रिया, सुचना, सल्ले वगैरे वगैरे….
=====
पक्ष कोणताही असो, पण आपण सगळे एका व्यवसायाचे भोई आहोत, या अर्थाने जातभाई आहोत, तर आपल्या व्यवसायाचं आणि आपलं हित कसं होईल यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यासाठी दबाव गट तयार व्हायला हवेत. कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञ आदींनी आपल्या सोशल मीडियाला तशा पद्धतीने वापरायला हवं. केवळ एकमेकांच्या सिनेमांची पोस्टर्स शेअर करून हे होणारं नाही. ते फार तुटपुंजं आहे.
आपल्याकडे कलाकाराला मान आहे. प्रतिष्ठा आहे. कारण आपली बहुतांश मंडळी नाटकातून आली आहेत. नाटकाचे संस्कार मनावर घडले की माणूस बदलतो. त्या नटेश्वराला साक्षी ठेऊन नवी सुरूवात व्हायला हवी. खूप गोष्टी साकारता येतील. राजकारण, पक्ष बाजूला ठेवून रिजनल सिनेमासाठी आवश्यक रस्ता कायमस्वरुपी तयार करता यायला हवा. रस्ता चांगला केला तर चांगल्या बनावटीची वाहनं अर्थात सिनेमे त्यावर उत्तम धावतील. अन्यथा सिनेमा आहे पण थिएटर नाही. थिएटर आहे पण प्रेक्षक नाही ही ओरड होणार आहेच.
चांगले सिनेमे तयार होणं आणि ते थिएटरवर योग्य वेळेत लागणं, यासाठी इन्स्टिट्यूशनल निर्णय घ्यायची गरज आहेच. केवळ माझा सिनेमा, माझे पैसे, माझी अडचण या माझेपणातून बाहेर यायची हीच वेळ आहे. अर्थात हे मराठी सिनेमासाठीचं ‘सिंडिकेट राजकारण’ वगळून व्यवसायासाठी झटणारं असावं हे आलंच.
आता सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं. सर्वसाधारणपणे अशी चर्चा झाली की प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे असं वाक्य फेकलं जातं. प्रेक्षकांची जबाबदारी आहेच, पण ती नंतर. कारण ती रिॲक्शन असणार आहे. तुम्ही जो सिनेमा करता ती आधी ॲक्शन मानली, तर लोकांनी तो सिनेमा पाहायला येणं ही त्यावरची रिॲक्शन आहे. त्यामुळे ती ॲक्शन जेवढी खमकी, नेमकी आणि अचूक तितकीच रिॲक्शन येणार हे नक्की आहे.
यापूर्वी आलेल्या सैराट, दगडी चाळ, आनंदी गोपाळ, मुळशी पॅटर्न, फत्तेशिकस्त,नटरंग, काकस्पर्श, लै भारी, फास्टर फेणे अशा कैक सिनेमांनी दाखवून दिलं आहेच. आत्ता मिळतंय तर घ्या ही मानसिकता इंडस्ट्रीतल्या बहुसंख्य लोकांची आहे. यातून मानसिकतेतून बाहेर यायल हवं. अन्यथा काळ फार कठीण होणार आहे.
आज आपण हातपाय मारले नाहीत तर नाकातोंडात गेलेलं पाणी बाहेर यायची शक्यता संपेल. हात-पाय मारण्यासाठी कष्ट पडतील. पण जीव वाचण्याची शक्यता निर्माण होईल.
बघा थोडा विचार करून.
=====
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. कलाकृती मीडिया याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.