विदेशात मराठी चित्रपटाचा शूटिंग फंडा
सोशल मिडियातील चार हुकमी एक्के, एखादी मराठी सेलिब्रिटीज आपण लंडनला निघालोय अशी सहार आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा आपला फोटो पोस्ट करतोय, एखाद्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) लंडनच्या कडाक्याच्या थंडीत मुहूर्त झाला आणि आता शूटिंग सुरु आहे. (अशी एक बातमी वाचत असतानाच आणखीन एका मराठी चित्रपटाचे शूटिंग इंग्लंडमध्ये सुरु देखील होते. प्रगतीचा हा वेग कमाल आहे.) तीन मराठी चित्रपटांची (Marathi Movie) कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मार्केट विभागासाठी निवड करण्यात आली. विश्वास जोशी दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ हा चित्रपट विदेशात प्रदर्शित झाला. (अनेक मराठी चित्रपट अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशात प्रदर्शित होत आहेत.) अशा ‘चलो परदेस’च्या मराठी चित्रपटाच्या बातम्यांचे सातत्य कौतुकास्पद.
मराठी चित्रपटाने (Marathi Movie) विदेशात सर्वप्रथम चित्रीकरण केले ते सतिश रणदिवे दिग्दर्शित ‘मुंबई ते माॅरीशस’ (१९९१) या चित्रपटाच्या वेळेस केले. त्या वर्षी माॅरीशसमध्ये जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते आणि तेव्हाच या चित्रपटाचा तेथे मुहूर्त आणि बरेचसे शूटिंग तेथे रंगले. किशोर मिस्कीन त्या चित्रपटाचे निर्माते होते. चित्रपटात अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या हुकमी जोडीसह ग्लॅमरस वर्षा उसगावकरची दुहेरी भूमिका आहे. तिने नेहमी प्रमाणेच हेही शूटिंग छान एन्जाॅय केले.
तरी देखील विदेशी चित्रीकरण ही बराच काळ तरी मराठी चित्रपटाची गरज नव्हती. मराठी नाटकाचे प्रयोग मात्र अमेरिकेत अथवा इंग्लंडमध्ये होत. त्याचा प्रचंड गाजावाजा होई. मिडिया कव्हरेज मिळे. कधी कोणी मराठी कलाकार आपल्या कुटुंबासोबत विदेशात फिरायला जाई आणि तिकडचे निसर्गसौंदर्य आणि जनजीवन पाहून प्रचंड प्रभावी होई. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मराठी कलाकार हिंदी चित्रपटात भूमिका साकारु लागले तेव्हा हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी (‘हीना’ मधील ऋषि कपूरसोबतच्या गाण्यासाठी अश्विनी भावे) तसेच गीतो भरी शाम अशा इव्हेन्टससाठी (वर्षा उसगावकर दक्षिण आफ्रिकेत गेली) विदेशी जाऊ लागले आणि मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) त्याची कौतुकाने चर्चा होऊ लागली. वर्षा उसगावकर तर ‘शिकारी’च्या शूटिंगसाठी रशियात गेली. किशोरी शहाणेही हिंदी पिक्चरच्या शूटिंगसाठी विदेश दौरा एन्जाॅय केला.
आज मराठी चित्रपटाने (Marathi Movie) प्रसिद्धी यात बरीच मोठी झेप घेतलीय. हा आपल्या देशात जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था आज रुजलीय याचाही परिणाम असावा. मराठी चित्रपट निर्माता आणि एकूणच मराठी चित्रपटसृष्टी (Marathi Movie) ‘गरीब बिचारी’ अशी प्रतिमा आणि वस्तुस्थिती राहिलेली नाही. (तशी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीची ओळख का बरे होती याचे उत्तर कधीच कोणी शोधले नाही. पूर्वीचा मराठी चित्रपट (Marathi Movie) खूप जवळचा वाटायचा आणि तेव्हाचे कलाकार ‘साधी माणसं ‘ वाटत यात तथ्य आहे.) आजही काही चित्रपट निर्माते आर्थिकदृष्ट्या फार सक्षम नाहीत पण मराठी चित्रपट निर्मितीची त्यांची भावना निष्ठापूर्वक आहे. असो, पण मराठी चित्रपटाचे (Marathi Movie) विदेशी शूटिंग एव्हाना छान रुळलयं. कमल सेठ निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘मुक्काम पोस्ट लंडन’ (२००७) या चित्रपटाचे थीमनुसार लंडनला शूटिंग होणे स्वाभाविक होतेच. भरत जाधव, मृण्मयी लागू, मोहन जोशी इत्यादींच्या त्यात भूमिका होत्या. तेव्हा लंडनला शूटिंग करताना लघुशंकेसाठी सार्वजनिक टाॅयलेटला जाणे कसे महाग पडे अशी एक वेगळीच गोष्ट चर्चेत होती. पण महत्वाचे होते, ते लंडनला शूटिंग झाले.
दरम्यानच्या काळात आणखीन काही महत्वाच्या गोष्टी घडतच होत्या आणि जग आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या (Marathi Movie) जवळ येत होते. संदीप सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ (२००३) या चित्रपटाची ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि एकूणच मराठी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात प्रचंड प्रमाणात आनंददायक वातावरण निर्माण झाले. ते अजून जाणवतयं. विविध देशातील चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट (Marathi Movie) अधूनमधून दाखल होत होता (बर्लिन चित्रपट महोत्सवात १९७६ साली डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना ‘ दाखल झाल्याची कायमच आठवण काढली जाते.) परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२०१०) आणि चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ ( २०१४) या चित्रपटांचीही अशीच ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड झाली आणि पुन्हा मराठी चित्रपटाची मोठीच झेप असेच कौतुक झाले. त्याच्या ब्रेकिंग न्यूज झाल्या. त्यावर ‘चर्चा तर होणारच’ तशी ती झाली. त्यात कौतुकाला भरती होती.. मराठी चित्रपटाची विदेशात अशी वाटचाल सुरु असतानाच दुबई, सिंगापूर, मकाऊ इत्यादी ठिकाणी मराठी चित्रपटाचे ग्लॅमरस इव्हेन्टस रंगू लागले. काही मराठी स्टार्सना विदेशात एकाद्या शाॅपचे उदघाटन करण्याची ‘सुपारी’ मिळू लागली. तर अनेक मराठी स्टार्स युरोप, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात छान भटकंतीसाठी जाऊ लागले. त्यांची इकाॅनाॅमी सुदृढ झाली. एकाच वेळेस अनेक पे कार्ड्स ते वापरु लागले. होय, हे प्रगतीचेच लक्षण.
=====
हे देखील वाचा : फिल्म फेअरच्या खास आठवणी…
=====
मराठी चित्रपटाचे बजेटही वाढले आणि सुपर हिट चित्रपटाचे आर्थिक यशही वाढले. त्यामुळे विदेशात चित्रीकरण करणे परवडू लागले. ओमकार शेट्टी दिग्दर्शित ‘अॅराॅन ‘चा उत्तरार्ध पॅरीसमध्ये घडतो. तर लंडनला शूटिंग करणे मराठी चित्रपटासाठी अगदी सोपी गोष्ट आहे इतपत सातत्य दिसतेय. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अॅण्ड ती’, सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाब जाम’ (यात चवीनुसार लंडन होते), समीर जोशी दिग्दर्शित ‘मिस यू मिस्टर’ (सिध्दार्थ चांदेकर उच्च करियरसाठी लंडनला जातो आणि इकडे त्याची पत्नी मृण्मयी देशपांडेला त्याचा विरह जाणवतो), हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा २’ (हा मल्टी स्टार कास्ट महाखर्चिक चित्रपट पूर्णपणे लंडनला घडतो. खाजगी हेलिकाॅप्टर, उंची गाड्या यांच्या मनसोक्त रेलचेलमध्ये स्मिता गोंदकरचे आकर्षक बिकीनी रुप), हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा ‘महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का२’.. लंडनला शूटिंग झालेल्या मराठी चित्रपटांची नावे वाढत चाललीत. अनेक मराठी स्टार्सनी विदेशात शूटिंग होतेय याचे भान ठेवून आपला फिटनेस, लूक आणि फॅशन फंडा कायम ठेवलाय. खरं तर सतत विविध कारणांमुळे विदेशात गेल्याने याचे महत्व या स्टार्सना पटलयं. ते भांडवल खूपच महत्वाचे. बरेच दिवस उपयुक्त ठरणारे.
अजिंक्य देव सध्या इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे एकाच वेळेस दोन मराठी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये छान बिझी आहे. त्यातील एक ‘असा मी अशी मी’ हा प्रेमपट असून दुसरा ‘portrait’ हा सायकॉलॉजिकल थ्रीलर आहे. दोन्हीचे दिग्दर्शन अमोल शेडगे करीत आहे. एका चित्रपटात तेजश्री प्रधान नायिका आहे, तर दुसर्यात भूषण प्रधान व श्रृती मराठे यांच्याही भूमिका आहेत. सर्वात जास्त विशेष उल्लेखनीय गोष्ट, या चित्रपटात Rolls Royce या प्रशस्त गाडीचा वापर करण्यात येत असून मराठी चित्रपटाच्या पडद्यावर पहिल्यांदाच ही उत्तम माॅडेलची गाडी दिसणार आहे. विदेशात शूटिंग करताना असेही सुखद योग येत आहेत आणि मराठी चित्रपटाची निर्मिती मूल्ये उंचावत आहेत.
फार पूर्वी पुणे शहरात शूटिंगसाठी काही मराठी स्टार्सना एशियाड बसने तर कोल्हापूरच्या शूटिंगसाठी महालक्ष्मी एक्सप्रेसने ‘विनातक्रार ‘ प्रवास करीत, त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीशी ते सुसंगत होते. पण या दशकात अशी प्रतिमा आणि वस्तुस्थिती राहिलेली नाही, तर मराठी चित्रपटाचे विविध देशात शूटिंग वाढतेय. जग जवळ येताना मराठी चित्रपटाची अशी प्रगती झालीय त्याचे आपण स्वागतच करुया. आज कोणत्याही गोष्टीवरचा सकारात्मक दृष्टिकोन मॅच्युअर्ड ठरतोय, त्यात ही गोष्टही आहे. आज बरेचसे मराठी सेलिब्रिटीज एक तर इंग्लंडच्या शूटिंगची बॅग पुन्हा एकदा भरुन घेतात, तर काही विदेशातून आल्या आल्या आपल्या शूटिंग/नाट्य प्रयोग/इव्हेन्टस यांच्या तयारीला लागतात ते पुन्हा विदेशात झेपावायला… जग खूपच जवळ आले आहे हे खरेच.