महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सीरियल किलिंगच्या घटनेवर आधारित ‘माफीचा साक्षीदार’
‘क्राईम थिलर’ चित्रपट बनवणं तसं कठीण काम. त्यात जर का हे चित्रपट सत्यघटनेवर आधारित असतील, तर बघायलाच नको. अगदी बारकाईने अभ्यास करून महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करून संपूर्ण घटना अडीच ते तीन तासांत दाखवणं म्हणजे जिकीरीचं काम असतं. तसंच गुन्ह्याचं स्वरूप, पार्श्वभूमी, गांभीर्य, तपासामधल्या गुप्त गोष्टी, राजकीय हस्तक्षेप अशा कित्येक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. शिवाय चित्रपट बनवताना तो एकांगी होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. (Marathi Movie Maaficha Sakshidar)
बॉलिवूडमध्ये तुलनेनं क्राईम थ्रिलर चित्रपट कमीच बनतात. त्यातही दाक्षिणात्य प्रादेशिक चित्रपटांचे रिमेकच जास्त असतात. अर्थात या लेखामध्ये बॉलिवूडच्या नाही, तर मराठीमधील एका ‘क्राईम थ्रिलर’ चित्रपटाबद्दल आहे. तो ही सत्यघटनेवर आधारित ‘क्राईम थ्रिलर’! हा चित्रपट म्हणजे ‘माफीचा साक्षीदार’.
पुण्यामध्ये १९७६-७७ साली घडलेला जोशी-अभ्यंकर खून खटला आजही लोकांच्या स्मरणात आहे. दीड वर्षात झालेले १० खून आणि कित्येक दरोड्यांच्या घटनेमुळे केवळ पुणे शहरच नाही, तर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. तेव्हाच्या काळात जर सोशल मीडिया असतं, तर ही बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असती. वेगवेगळे हॅशटॅग तयार झाले असते. गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि नंतर त्यांना फाशी व्हावी म्हणून आंदोलनं झाली असती. असो, पण तेव्हा सोशल मीडिया नव्हतं तरीही ही घटना हंडीचं देशाच्या नाही पण राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली होती आणि या भीषण घटनेनं तमाम मराठी जनता हादरून गेली होती.
१९७६-७७ सालातलं शांत-निवांत पुणे शहर. वर्दळ नसलेली सारस बाग,पर्वती ही ठिकाणं! पण या शांत पुण्यात एकामागून एक दरोडे आणि खुनाच्या घटना घडू लागल्या… या प्रसंगाची आठवण असणाऱ्या अनेक पुणेकरांना आजही सारस बागेतल्या तळ्यामध्ये या गुन्ह्यांची काळी सावली दिसत असेल. तरुणांचा ग्रुप दिसल्यावर उगाचच मनात विपरीत विचार येत असतील. कारण या प्रकरणाची दाहकताच तेवढी होती. (Marathi Movie Maaficha Sakshidar)
चांगली संगत आयुष्य घडवू शकते तसंच वाईट संगत आयुष्य बिघडवूही शकते. माफीचा साक्षीदार या चित्रपटातून ही गोष्ट ठळकपणे अधोरेखित होते. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका सामान्य सुसंस्कारी कुटुंबातली मुलं चुकीच्या संगतीमुळे आणि झटपट श्रीमंत व्हायच्या लालसेमुळे अत्यंत ‘भयंकर’ पद्धतीने झालेल्या गुन्ह्यांचा एक भाग बनतात. एकामागून एक खून करतात. या खुनांची श्रुंखला सुरु होते ती या मुलांनी केलेल्या स्वतःच्याच मित्राच्या खुनापासून.
झटपट पैसे कमावण्यासाठी दरोडे आणि एकामागून एक खून ही मुलं अगदी सहजतेने आणि निर्विकारपणे करू लागतात. या मुलांचा बॉस ‘राघवेंद्र’ उर्फ ‘राघव’ तर इतका निर्दयी असतो की, त्याची वागणूक सैतानालाही लाजवेल. या ग्रुपमधला एक सुसंस्कृत घरातला मुलगा या साऱ्यातून स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करतो, तर ही मुलं त्याचाही खून करतात. हा खून मात्र त्यांचा शेवटचा खून ठरतो कारण या खुनानंतर त्यांच्यातलाच असूनही त्यांच्यात नसणारा त्यांचा एक मित्र बनतो माफीचा साक्षीदार! चित्रपटात हे सर्व प्रसंग बघताना अंगांवर शहारे उभे राहतातच, पण हे सर्व खरं आहे, प्रत्यक्षात घडलं आहे या जाणिवेने अंगाचा थरकाप होतो. (Marathi Movie Maaficha Sakshidar)
राजदत्त दिग्दर्शित ‘माफीचा साक्षीदार’ या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, मोहन गोखले, अविनाश खर्शीकर, उषा नाईक हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये होते. सर्वच कलाकारांचे अभिनय उत्तम झाले आहेत. पण विशेष उल्लेख करायला हवा तो नाना पाटेकर यांचा. त्यांनी राघवची भूमिका अप्रतिमरित्या साकारली आहे. ‘कोल्ड ब्लडेड’ खुनशी राघव माणसाच्या मनातल्या सैतानाची जाणीव करून देतो. मोहन गोखले यांनी सुन्याच्या भूमिकेत अक्षरश जीव ओतून काम केलं आहे. सुन्याची मानसिक तगमग, अपराधीपणाची भावना, दुःख दाखवताना ते कुठेही कमी पडले नाहीत. राजदत्त यांच्या दिग्दर्शनाबद्दल काय बोलणार? एका भीषण अशा सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य त्यांनी अगदी यशस्वीरीत्या पेललं आहे. (Marathi Movie Maaficha Sakshidar)
===============
हे देखील वाचा – सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
===============
आजच्या वेबसिरीजच्या जमान्यात ‘माफीचा साक्षीदार’ बघणाऱ्या प्रेक्षकांना, हा चित्रपट जोशी-अभ्यंकर खून खटल्याची भीषणता प्रभावीपणे मांडू शकला नाही, असं वाटू शकतं. कारण आजकालचे चित्रपट व वेबसिरीज यामध्ये ज्या पद्धतीने हिंसा दाखवली जाते तेवढी हिंसा चित्रपटामधून दाखवण्यात आली नाहीये, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याच वेळी हा चित्रपट १९८६ साली तयार झाला होता, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. तसंच जवळपास ३६ वर्षांपूर्वीचं तंत्रज्ञान, प्रेक्षकवर्गाची मानसिकता, खून खटल्याचं गांभीर्य, इ. गोष्टी विचारात घेतल्यास दिग्दर्शन खटकत नाही.
चित्रपट बघायचा असल्यास तो युट्यूबवर उपलब्ध आहे. काही वर्षांपूर्वीच या चित्रपटावर आधारित अनुराग कश्यपचा ‘पाच’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु दुर्दैवाने हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नाही.