पंढरीची वारी: वारीचा नितांतसुंदर प्रवास घडवणारी विठ्ठल भक्ताची आणि भक्तीची कहाणी
वारी! वारी म्हणजे तमाम महाराष्ट्रातील विठ्ठलभक्तांचं श्रद्धास्थान. वारी एक परंपरा आहे, संस्कृती आहे. दरवर्षी पंढरीची वारी करून वारकरी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. तहान, भूक, ऊन, पाऊस, वारा कशाचीही पर्वा न करता वारीचा प्रवास अविरत सुरु असतो. विठ्ठलावर अपरंपार श्रद्धा ठेवून कित्येक वारकरी वारी करतात आणि वर्षानुवर्षे चालत आलेली विठ्ठलभक्तीची परंपरा पुढे चालू ठेवतात. अशाच एका नित्यनेमाने वारी करणाऱ्या विठ्ठल भक्ताच्या दृढ विश्वासावर आधारित चित्रपट म्हणजे ‘पंढरीची वारी’. (Pandharichi Vari)
जेव्हा दूरदर्शनचा काळ होता तेव्हा आणि केबलच्या आगमनानंतरही कित्येक वर्ष आषाढी एकादशी जवळ आल्यावर टीव्हीवर हा चित्रपट दाखवला जात असे आणि प्रेक्षक दरवर्षी तितक्याच आवडीने हा चित्रपट बघत असत. यामुळेच आजही हा चित्रपट नव्वदच्या दशकात जन्माला आलेल्या अनेकांना ‘नॉस्टॅल्जिक’ करत असेल.
१९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा म्हणजे विठ्ठल भक्ताची आणि भक्तीची कहाणी आहे. एक साधं गाव आणि त्या गावात अण्णा (बाळ धुरी), त्याची बडबडी आणि विठ्ठलाचा राग राग करणारी पत्नी आक्कासाहेब (जयश्री गडकर) आपल्या तरुण, सुंदर आणि समंजस मुलीसह – मुक्तासह (नंदिनी जोग) राहत असतात. अण्णा म्हणजे गावासाठी देवतुल्य व्यक्तिमत्व असतं. गावातले सरपंच अण्णांना मान देत असतात. विठ्ठलाचे निस्सीम भक्त असणाऱ्या अण्णांचे विचारही काळाशी सुसंगत असतात. (Pandharichi Vari)
सदा (अशोक सराफ), नाना (राजा गोसावी) आणि गणा (राघवेंद्र कडकोल) हे गावातले चोर. यांना काहीही करून अण्णांना बदनाम करायचं असतं; त्यांना गावाच्या बाहेर काढायचं असतं. त्यासाठी ते कारस्थान रचतात आणि त्यात काही प्रमाणात यशस्वी होतात. या तिघांच्या कुरघोड्यांमुळे अण्णा वारीला जाऊ शकणार नसतात. वर्षानुवर्षे जपलेली वारीची परंपरा खंडित होणार म्हणून अण्णा व्यथित होतात आणि आपल्या पत्नीला – आक्कासाहेबांना वारीला जायची विनंती करतात. परंतु त्या नकार देतात. पण मुक्ता मात्र अण्णांना वारी पूर्ण करण्याचं वचन देते. तरुण मुलीला एकटीला पाठवायला नको म्हणून आक्कासाहेब तिच्यासोबत जायचं ठरवत. आणि सुरु होतो एक प्रवास, वारीचा..! (Pandharichi Vari)
आक्कासाहेब आणि मुक्ता वारीला निघतात तेव्हा त्यांच्याजवळ दागिन्यांचं गाठोडं असतं. सदा, नाना आणि गणा ते गाठोडं चोरायची योजना आखतात. या वारीतच एक लहान मुका मुलगा अक्कासाहेब आणि मुक्तासमोर येतो. त्याच्याबद्दल काहीच माहिती न मिळाल्यामुळे मुक्ता त्याला आपल्यासोबतच ठेवते. वारीत भेटला म्हणून मुक्ता या मुलाचं नाव विठोबा ठेवते. मुक्ताला त्याचा प्रचंड लळा लागतो. सुरुवातीला अक्कासाहेब त्याचा राग राग करत असतात. पण आपल्या लघवी वागण्याने विठोबा त्यांचं मन जिंकून घेतो आणि त्यांनाही त्याचा लळा लागतो.
सदा, नाना आणि गणाला वारीत अजून एक चोर भेटतो. त्याच्यावर ते गाठोडं चोरण्याची जबाबदारी टाकतात. परंतु या साऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरतात. अखेर वारीचा प्रवास शेवटच्या टप्प्यावर येतो. मंदिरात जाण्यापूर्वी आक्कासाहेब आणि मुक्ताला अण्णा समोर दिसतात. वारी चुकली तरी एकादशीला पांडुरंगाचं दर्शन चुकणार नाही, या कल्पनेनं ते आनंदित झालेले असतात. आक्का आणि मुक्ताची वारी सफल होते का? तो छोटा मुलगा विठोबा कोण असतो? सदा, नाना आणि गणा सुधारतात का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी मिळतातच. पण चित्रपट पाहताना वारीचा प्रवासही अनुभवता येतो. (Pandharichi Vari)
चित्रपट नितांतसुंदर झाला आहे. गाणीही छान जमून आली आहेत. “धरिला पंढरीचा चोर…” हे गाणं तर आजही आवडीने ऐकलं जातं. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते रमाकांत कवठेकर. सर्वच कलाकारांच्या भूमिका उत्तम जमून आल्या आहेत. पण विशेष लक्षवेधी व्यक्तिरेखा ठरते ती जयश्री गडकर यांनी साकारलेली आक्कासाहेबांची व्यक्तिरेखा. शोले मधली बसंती किंवा जब वुई मीट मधल्या गीत सारखी प्रचंड बडबड करणारी ही व्यक्तिरेखा जयश्री गडकर यांनी अप्रतिमरीत्या साकारली आहे. बसंती किंवा गीत काही जणांच्या डोक्यात जातात, पण आक्कासाहेबांची बडबड मात्र नेहमीच गोड वाटते. विठोबाच्या भूमिकेत बालकलाकार बकुळ कवठेकर याने अतिशय सुंदर अभिनय केला आहे.
=============
हे देखील वाचा – नायक- द रियल हिरो: एका दिवसाचा मुख्यमंत्री झालेल्या पत्रकाराची कथा आणि व्यथा
=============
या चित्रपटाला IMDB वर ८.७ रेटिंग देण्यात आलं आहे. वारीची अनुभूती घ्यायची असेल, विठ्ठल भक्तीचा अनोखा रंग अनुभवायचा असेल, तर हा चित्रपट आवर्जून बघा. चित्रपट बघायला कुठलंही सब्स्क्रिप्शन घ्यायची गरज नाही कारण हा चित्रपट युट्यूबवर फ्री मध्ये बघता येईल. (Pandharichi Vari)