ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मराठी चित्रपटसृष्टीत भगवं वादळ!
खरंतर मराठी चित्रपट बजेटच्या बाबतीत नेहमी मागे राहिला आहे. म्हणजे, जेव्हा आपण हिंदी किंवा दक्षिणात्य चित्रपटांशी आपल्या चित्रपटाची तुलना करतो तेव्हा त्या तुलनेत आपला चित्रपट आर्थिक बाबतीत नेहमी छोटा ठरत आलेला आहे. कारण, आपल्याकडे सर्वसाधारणपणे तीनेक कोटींचे चित्रपट बनतात.
या चित्रपटात वास्तवदर्शी विषयांचा भरणा जास्त असतो. म्हणूनच आपला चित्रपट छोटा असला तरी तो एका वेगळ्या पद्धतीने आपण घेतल्याचा दावा संबंधित चित्रपटाचा दिग्दर्शक करत असतो. म्हणूनच आपल्याकडे ऐतिहासिक चित्रपटांत हात सहसा कोणी घालत नसे. कारण, त्याचा तामझाम मोठा असतो. त्यात वेशभूषा, रंगभूषा.. प्रॉपर्टी, कलादिग्दर्शन आणि एकूणच लागणारं मनुष्यबळ यांचं प्रमाण मोठं असतं.
याशिवाय असे चित्रपटांना आवश्यक व्हिएफएक्स तंत्रज्ञान वापरण्यासाठी मोठी आर्थिक किंमत मोजावी लागते. हा सगळा प्रकार पाहता हे विषय न घेता, रिअल लोकेशनवर चालणारे सामाजिक विषय घेऊन चित्रपट बांधण्याकडे बहुतांश दिग्दर्शकांचा कल होता. पण आता हा ट्रेंड बदलला आहे असं म्हणायला पुरता वाव आहे. कारण, आता मराठी चित्रपटसृष्टी भगव्या रंगात न्हाऊन निघणार आहे. आगामी चित्रपटांवर नजर टाकली तर हीच बाब समोर येते.
खरंतर मराठी चित्रपटांना शिवकालीन चित्रपट नवे नाहीत. चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांनी आपल्या चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज उभे केलेच शिवाय शिवमूल्यांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून समाजात पेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ अभिनेते चंद्रकांत असंच त्यावेळच्या प्रेक्षकांना वाटत होतं. त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना फार कुणी हात लावला नव्हता.
इतक्या वर्षानंतर महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या पडद्यावर आणले. पण त्या चित्रपटाची गोष्ट वेगळी होती. आजच्या काळातली गोष्ट रचून त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा गोवण्यात आली होती. या चित्रपटाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. (Marathi Movies on Chhatrapati Shivaji Maharaj)
दरम्यानच्या काळात छोट्या पडद्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेद्वारे अस्सल शिवराय साकारले. केवळ छोटा पडदाच नव्हे, तर दरम्यान रंगभूमीवरही डॉ. अमोल शिवराज साकारत होते. इतरही अनेक छोट्यामोठ्या नाटकांमधून शिवराज दिसत होते. मोठ्या पडद्यावर मात्र तुलनेनं शिवराज फार दिसत नव्हते.
कुणाला चित्रपट बनवावे वाटत नव्हतं असं नाही. पण प्रश्न बजेटचा होता. दुसरीकडे हिंदीत-दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये व्हिएफएक्सचा जोरदार वापर करून ७० एमएम स्क्रीन आणखी भव्य करण्याचा चंग बांधण्यात येत होताच. यात फार मोठी रेष मारून ठेवली ती ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांनी. एकूणात मराठीत ऐतिहासिक विषयांना हात घातला जात नव्हता.
पुढे अलिकडच्या काळात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयांना हात घातला. आधी ‘फर्जंद’ त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि त्यानंतर ‘पावनखिंड’ असे चित्रपट त्याने बनवले आणि ते बनवतानाच शिवरायांवर अष्टक बनवण्याचा संकल्पही त्याने बोलून दाखवला. अलिकडेच त्याचा ‘शेर शिवराज’ हा चित्रपटही आला आहे. रसिकांचा या चित्रपटांना चांगला प्रतिसाद होता. हाती असलेल्या बजेटचं योग्य नियोजन करून दिग्पालने हे सिनेमे आणले. बऱ्याच काळानंतर महाराज मोठ्या पडद्यावर आले असल्याने मराठी माणसाने या चित्रपटांना चांगला प्रतिसाद दिला. यात ‘पावनखिंड’ या चित्रपटाने तिकीट खिडकीवर सर्वाधिक यश मिळवलं. (Marathi Movies on Chhatrapati Shivaji Maharaj)
दरम्यानच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांनीही ‘शिवप्रताप’ या आपल्या प्रोजेक्टद्वारे शिवरायांचे तीन चित्रपट आपण बनवणार असल्याची घोषणा केली आहे. यात शिवरायांची भूमिका स्वत: डॉ. कोल्हे साकारणार आहेत. या घोषणेनंतर लगेचंच लॉकडाऊन लागल्यामुळे डॉ. कोल्हे यांना थोड थांबावं लागलं आहे. अर्थात आता पुन्हा एकदा ते या चित्रपटांच्या जुळवाजुळवीत व्यग्र झाले आहेत. डॉ. अमोल यांनी यापूर्वीच शिवराय साकारून उभ्या महाराष्ट्राला शिवराय म्हणजे अमोल कोल्हे हे समीकरण बांधायला भाग पाडलं होतं. आता पुन्हा एकदा ते या चित्रपटातून कोणता विषय कसा मांडतात ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
काही वर्षांपूर्वी अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव हे दोघे शिवरायांवर चित्रपट निर्मिती करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर रितेशचे शिवरायांच्या रुपातले काही फोटोही व्हायरल झाले होते. पण पुढे या चित्रपटाबद्दल फार काही कळलं नाही. या सगळ्या घडामोडीत लॉकडाऊनही होता. दरम्यान दिग्दर्शक रवी जाधव यांनी गेल्या शिवजयंतीचं औचित्य साधून आपण बालशिवरायांवर चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलं. ते जाहीर करताना त्यांनी मोशन पोस्टरचा वापर केला.
आपल्याकडे सध्या बनत असलेल्या मराठी चित्रपटात बालशिवाजी हा विषय कुणी घेतलेला नव्हता. रवी जाधव यांनी त्या विषयात रुची दाखवून त्यावर कामही सुरू केलं आहे. त्याचवेळी रितेश देशमुखने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवरायांवर एक दोन नव्हे तर तीन चित्रपटांची घोषणा केली आहे. यापूर्वी नागराजने आपल्या चित्रपटांमधून महाराष्ट्रातल्या जनतेला वेड लावलं आहेच. आता नागराज शिवरायांची कोणती बाजू कशी मांडतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. (Marathi Movies on Chhatrapati Shivaji Maharaj)
ही सगळी घडामोड चालू असतानाच सामान्य रसिकांंची नस समजून चुकलेला दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रवीण तरडेही मागे नव्हताच. लॉकडाऊन पूर्वीच त्याने ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाची घोषणा तर केलीच शिवाय बरंचसं चित्रिकरणही संपवलं होतं. पण पुढे लॉकडाऊन आल्यामुळे चित्रपटाचं काही चित्रिकरण थांबलं होतं. त्यानंतर जमेल तसं ते चित्रिकरण पूर्ण करून आता हा चित्रपट प्रदर्शनाला तयार आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाबद्दलही उत्सुकता शिगेला पोचली आहे. हा चित्रपट थेट शिवरायांवर नसला तरी यात गश्मीर महाजनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. तर सरसेनापतींच्या भूमिकेत आहेत स्वत: प्रवीण तरडे.
दुसरीकडे अभिजीत देशपांडे दिग्दर्शित एक चित्रपटही प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. हा चित्रपटही वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावर बेतलेला आहे. या चित्रपटात वीर बाजीप्रभू यांची भूमिका अभिनेते शरद केळकर यांनी साकारली असून त्यात शिवराय साकारले आहेत ते सुबोध भावे यांनी. हा चित्रपट कदाचित दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Marathi Movies on Chhatrapati Shivaji Maharaj)
यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो आहे, दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वीर दौडले सात‘ या चित्रपटाची. सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी १६७४ मध्ये गाजवलेल्या शौर्याची आणि बलिदानाची ही कथा असणार आहे. या चित्रपटाबद्दल इतर कोणतीही माहिती सध्या मांजरेकर आणि त्यांच्या टीमने जाहीर केलेली नाही. पण येत्या काळात ती जाहीर होईल. या चित्रपटाच्या कथानकावरून हा मल्टिस्टारर चित्रपट असेल यात शंका नाही.
========
हे देखील वाचा – सावधान! वॉल वैऱ्याची आहे…
========
मराठीत हे चित्रपट येतानाच इतरही अनेक निर्माते-दिग्दर्शक शिवरायांवरचे चित्रपट बनवण्यात व्यग्र आहेत. अशापद्धतीने मराठी चित्रपटसृष्टीवर सध्या भगवं वादळ घोंगावू लागलं आहे. शिवरायांचे हे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना पर्वणी असणार आहे यात शंका नाही. या चित्रपटांचं योग्य नियोजन करता आलं तर या चित्रपटांना लोकाश्रय नक्कीच मिळेल. साहजिकच मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरेल यात शंका नाही. (Marathi Movies on Chhatrapati Shivaji Maharaj)