Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

हिंदीत सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘या’ सिनेमाचा ‘मराठी’ रिमेक भारतातील १४ भाषांसह चिनी भाषेतही सुपरहिट झाला
१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि १९६२ सालापासून शासनाच्या वतीने मराठी चित्रपटांना पारितोषिके द्यायला सुरूवात झाली. प्रादेशिक चित्रपटांना अशा प्रकारचे पुरस्कार देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते!. पहिला पुरस्कार वितरण सोहळा १९६२ साली झाला या वेळी पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपट राज्य पुरस्कार मिळविणारा चित्रपट होता ’प्रपंच’. या सिनेमा बाबत एक मजेदार आठवण आहे.
१९६० साली देव आनंदला घेऊन दिग्दर्शक राजऋषी यांनी एक सिनेमा हिंदीत बनवला होता. त्याचं नाव होतं ‘एक के बाद एक’. यात दक्षिणेकडील शारदा नावाची अभिनेत्री त्याची नयिका होती. सचिनदाचे संगीत असलेल्या या सिनेमाची कथा ग दी माडगूळकर यांची होती. असं असतानाही हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. इतका की या सिनेमाचा नायक देव आनंद होता हे कुणाला सांगून पटत नाही.

गदीमांच्या कथेची दिग्दर्शकाने पार वाट लावून टाकली होती. (याच दिग्दर्शकाने एकेकाळी देवला घेवून दुश्मन, शराबी हे सिनेमे बनवले होते.) गदीमांना फार वाईट वाटले कारण त्यांचे कथाबीज मूळात खूप सशक्त होते. त्यांनी याच कथेवरून मराठीत एक कादंबरी लिहिली ‘आकाशाची फळे’. या कादंबरीचे साहित्य विश्वात चांगले स्वागत झाले. निर्माता गोविंद घाणेकर यांना तर ही कलाकृती इतकी आवडली की त्यांनी सरळ यावर सिनेमा काढायचे ठरवले.
या सिनेमाची कथा-पटकथा-संवाद-आणि गाणी लिहिण्यासाठी पुन्हा गदीमांना बोलावले. सिनेमाचे दिग्दर्शन मधुकर पाठक यांनी केले होते. हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. शाहिर अमर शेख यांनी या सिनेमात भूमिका केली होती. सुलोचना, सीमा, कुसुम देशपांडे, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी यांच्या यात भूमिका होत्या. श्रीकांत मोघे यांना अनपेक्षितपणे यात काम करण्याची संधी मिळाली व त्यांचा रूपेरी प्रवेश झाला. चित्रपटाचे नाव ठरले ’प्रपंच!’.
====
हे देखील वाचा: किस्सा ‘गाता रहे मेरा दिल‘ गाण्याच्या ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीचा!
====
कुटुंब नियोजनाचा मोलाचा संदेश या सिनेमातून दिला असला तरी तो केवळ प्रचारकी सिनेमा झाला नाही. यातली सुधीर फडके यांनी संगीतबध्द केलेली ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आधार, विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, ‘बैल तुझे हरेणावाणी गाडीवान दादा’ ही गाणी खूप लोकप्रिय ठरली.
====
हे देखील वाचा: Bollywood movies remade in south: या ८ सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचे बनले होते दाक्षिणात्य भाषांमध्ये रिमेक!
====
या सिनेमाने जबरदस्त हवा केली. पहिल्या राज्य पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, गाणी, संगीत, छायालेखन, नायिका ही सर्व पारितोषिकं पटकावली. राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. एवढंच नाही, तर भारतातील १४ भाषांमधून हा सिनेमा बनला काही ठिकाणी डब झाला. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे चीनमध्ये देखील वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न असल्याने ‘प्रपंच’ हा चित्रपट चीनी भाषेत डब होऊन तिथेही प्रचंड गाजला. म्हणजे हिंदीत अपयशी ठरलेल्या गदीमांच्या कथेला मराठीत मात्र जगमान्यता मिळाली.