bobby : आर केच्या ‘बॉबी’ सिनेमाच्या पंजाबमधील डिस्ट्रीब्यूशनचा किस्सा!

Mashaal : यश चोप्रांचा अंडर रेटेड पण अप्रतिम सिनेमा!
मराठीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार वसंत कानिटकर (Vasant Shankar Kanetkar) यांच्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाने साठच्या दशकात मराठी रंगभूमीवर एक विक्रम घडवला होता. डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी अजरामर केलेला लाल्या आणि प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाने सजवलेला प्रा. विद्यानंद रसिकांच्या कायम लक्षात राहिले. याच नाटकाचा आधार घेऊन १९६९ साली सत्येन बोस (satyen bose) यांनी ‘आंसू बन गये फूल’ हा चित्रपट बनवला. या सिनेमाच्या कथानका करीता वसंत कानेटकर यांना फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला होता. (Mashaal)

यानंतर पंधरा वर्षांनी यश चोप्रा यांनी याच कथेचा आधार घेत ‘मशाल’ (Mashaal) या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा आणि बिग बजेट असा होता. या चित्रपटात दिलीप कुमार, वहिदा रहमान, अनिल कपूर, रती अग्निहोत्री यांच्या प्रमुख भूमिका होत्या. कथेचा प्लॉट सेम जरी असला तरी यश चोप्रा यांनी यात नक्कीच काही बदल केले होते. त्यांना मूळ कथेच्या प्रमाणे दिलीप कुमारला स्मगलर दाखवायचे नव्हते आणि अनिल कपूरला पोलीस ऑफीसर झालेला दाखवायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी दिलीप कुमारला एका वर्तमानपत्राचा संपादक दाखवले.

या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी मनोरंजक अशी आहे. खरं तर हा सिनेमा यश चोप्रा यांच्या खास चोप्रा स्टाईलचा हा सिनेमा नाही. यात कुठलेही चकाचक परदेशी लोकेशन्स नाहीत. काश्मीर नाही. रोमँटिक गाणी नाहीत. पण तरीही यश चोप्रा यांनी कथानकाला महत्त्व देत हा चित्रपट दिग्दर्शित केला. हा चित्रपट निर्माण करण्याची जेव्हा त्यांनी निर्णय घेतला त्यावेळेला या भूमिकेसाठी दिलीप कुमार यांचे नाव पहिल्यापासून त्यांच्या डोक्यात फायनल होते. दिलीप कुमार आणि यश चोप्रा यांचे खूप जुने संबंध होते. पण दिलीप कुमार यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात फक्त याच एका चित्रपटात दिसले.
अनिल कपूर या सिनेमातील भूमिका सुरुवातीला Sunny Deol ला मिळाली होती. तसे यश चोप्रा यांनी स्क्रीन मासिकात दिलेल्या जाहिरात सांगितले देखील होते. परंतु धर्मेंद्रने पहिल्याच सिनेमात दिलीप कुमारसोबत सनी झाकोळून जाईल या भीतीने चित्रपटातून माघार घ्यायला लावली. यानंतर या भूमिकेसाठी कमल हसन यांची निवड करण्यात आली. खरं तर Javed Akhtar यांना या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन हवे होते पण त्याच वेळी रमेश सिप्पी यांचा ‘शक्ती’ हा सिनेमा देखील सेटवर होता. त्यामुळे विनाकारण तुलना होईल म्हणून त्यांनी अमिताभ बच्चन यांचा विचार ड्रॉप केला.

कमल हसन साऊथकडील मूव्हीमध्ये बिझी असल्यामुळे ही भूमिका शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांनी अनिल कपूरला ऑफर केली. जावेद अख्तर यांनी सिनेमाची गाणी लिहिली होती. दिलीप कुमार सोबत वहिदा रहमान ही सर्वार्थाने योग्य अशी निवड होती. चित्रपटाची कथा पटकथा जावेद अख्तर यांनी लिहिली होती. या चित्रपटात अनुपम खेर, आलोकनाथ, अन्नू कपूर, मदनपुरी, मोहन आगाशे, निळू फुले यांच्या देखील भूमिका होत्या. अनिल कपूरच्या नायिकेच्या भूमिकेसाठी रती अग्निहोत्री (Rati Agnihotri) अभिनेत्रीची निवड करण्यात आली. खरंतर या भूमिकासाठी स्वरूप संपत देखील इंटरेस्टेड होती पण रती अभिनेत्रीचा त्यावेळेला मोठा बोलबाला होता कारण ‘एक दुजे के लिए’ चं यश तिच्या पाठीशी होतं. (Bollywood masala)
===========
हे देखील वाचा : Lucky Ali : लकी अलीचा पहिला म्युझिक अल्बम ‘सुनो’…
===========
आज ‘मशाल’ (Mashaal) हा चित्रपट म्हटला की सर्वांच्या डोळ्यापुढे एकच शॉट येतो तो म्हणजे दिलीप कुमार यांचा पावसाळी रात्री आपल्या वेदने विवळत असलेल्या पत्नीच्या मदतीसाठी रस्त्यात कार थांबवण्याचा. हा शॉट सिनेमाचा हाय लाईट ठरला. हा शॉट ग्रँड रोड जवळच्या एका सिग्नलला सलग चार रात्री चित्रित करण्यात आला. दिलीप कुमार या अभिनेत्याची खरोखरच कमाल म्हटली पाहिजे कारण सतत चार रात्री एकच भाव चेहऱ्यावर आणत अभिनय करीत हा शॉट त्यांनी पूर्ण केला. दिलीप कुमारच्या अभिनयातील हा एक सर्वोत्कृष्ट शॉट समजला जातो.
हॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शक रोबर्ट वाईस (साउंड ऑफ म्युझिक फेम) त्यावेळेला भारतात आले होते. शूटिंग पाहण्यासाठी ते मुद्दाम ‘मशाल’ (Mashaal) च्या सेटवर आले होते. त्यावेळेला तिथे होळीच्या गाण्याचे चित्रीकरण करत चालू होते. सेटवरील कलरफुल माहौल पाहून ते निहायत खुश झाले! जावेद अख्तर यांनी या चित्रपटातील सर्व गाणी लिहिली होती संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचे होते. होळीचे गाणे ‘होली आई होली आई देखो होली आई रे…’ हे गाणं हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्यात ‘जैत रे जैत’ या चित्रपटातील ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी…’ या चालीवर बनवलं होतं. या चित्रपटातील ‘जिंदगी आ रहा हू मै…’ या गाण्याचे शब्द जावेद अख्तर यांचे होते आणि या गाण्याला चाल देखील त्यांनी सुचवली होती असे म्हणतात. हे गाणं बेंगलोरला विधानसभेच्या इमारती समोर शूट केलं होतं.

या चित्रपटात एखादी छोटी भूमिका करण्याची अनुपम खेर यांची खूप इच्छा होती पण यश चोप्रा यांनी त्यांना सांगितलं, ”मला तुमचे टॅलेंट वाया घालवायचे नाही. ज्यावेळी मला एक मोठी भूमिका तुमच्यासाठी योग्य वाटेल तेव्हा मी तुमचा नक्कीच विचार करेल.” अनुपम यांना वाईट वाटले परंतु ज्यावेळी यश चोप्रा यांनी ‘विजय’ (१९८५) या चित्रपटात अनुपम खेर यांना फुललेन्थ भूमिका दिली. त्यानंतर यश चोप्रा यांच्या मात्र जवळपास प्रत्येक चित्रपटांमध्ये अनुपम खेर असायचेच. या सिनेमात अनुपमला भूमिका नाही मिळाली. पण या सिनेमातील भूमिकेसाठी दिलीप कुमार यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे भूमिकेसाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते पण पारितोषिक मात्र अनुपम खेर यांना ‘सारांश’ च्या भूमिकेसाठी मिळाले.
या चित्रपटातील भूमिकेसाठी अनिल कपूर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ९ फेब्रुवारी १९८४ रोजी ‘मशाल’ प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रीमियरच्या रात्रीच अनिल कपूर यांनी दोन महत्त्वाचे सिनेमे साइन केले त्यापैकी एक होता सुभाष घई यांचा ‘मेरी जंग’ आणि दुसरा होता फिरोज खान यांचा ‘जांबाझ’ या चित्रपटाच्या प्रीमियरला सर्वांनी अनिल कपूरचे तोंड भरून कौतुक केले.

दुसऱ्या दिवशी अनिल कपूर त्याची प्रेयसी सुनिता हिच्याकडे जाऊन त्याने तिला प्रपोज केले आणि काही दिवसातच ९ मे १९८४ या दिवशी या दोघांचे लग्न देखील झाले. सुरुवातीला या चित्रपटाचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मीडियामध्ये आणि प्रेक्षकांमध्ये दिसून आला पण नंतर मात्र चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही एक फ्लॉप चित्रपट अशी याची गणना होऊ लागली पण नंतर रिपीट रनला ज्या ज्या वेळेला हा सिनेमा लागला त्यावेळेला मात्र त्याला चांगले यश मिळाले. (Mashaal)
यावर्षी दिलीप कुमार यांचा आणखी एक चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता ‘दुनिया’. या चित्रपटाला देखील फारसे यश मिळाले नाही. मशाल हा चित्रपट आज चाळीस वर्षानंतर जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला तो खरोखरच चांगला बनला होता असं म्हणता येईल.