मेहबूब स्टुडिओ आणि देव आनंदचे घट्ट नाते…
अनेक हिंदी चित्रपटात आईची भूमिका साकारलेल्या सुलोचना दीदींच्या मुलाखतीचे मला अनेक योग आले आणि त्यात खूप जुन्या काळातील मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ‘ऑन दी स्पाॅट’ अशा गोष्टीही समजत राहिल्या. चित्रपटसृष्टीबाबतचे कुतूहल आणि ज्ञान वाढवण्याचा एक सकारात्मक मार्ग म्हणजे अशा दीर्घकालीन अनुभवी सिनेमावाल्यांच्या मुलाखती घेणे होय. अनेक हिंदी चित्रपटात सुलोचनादीदींनी काही चित्रपटात देव आनंदच्या रुपेरी मांची भूमिका साकारलीय. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना देव आनंदचा (Dev Anand) विषय येणे अगदीच स्वाभाविकच.
अनेक वर्षांपूर्वी त्या मला म्हणाल्या होत्या, देव आनंद (Dev Anand) प्रामुख्याने वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत शूटिंग करण्यास प्राधान्य देई. त्याचा हा विशेष आवडता स्टुडिओ. देव आनंद अतिशय वक्तशीर. जुहूवरुन निघाला की ठीक दहा वाजता सांताक्रूझ येथील खिरा नगरमधील आपल्या ऑफिसमध्ये जाणार. आवश्यक त्या सूचना देणार, कागदपत्र पाहणार आणि मग ठीक अकरा वाजता मेहबूब स्टुडिओत येणार. फारसा वेळ न लावता सेटवर येणार. विजय आनंद अथवा अन्य कोणी दिग्दर्शक असेल तर आजच्या दिवसाच्या दृश्यांची माहिती करुन घेणार. जर स्वतःच्याच दिग्दर्शनातील चित्रपट असेल तर आदल्या दिवशी कुठपर्यंत आपण आलो होतो याची पूर्ण माहिती असणारच. सेटवर देव आनंदच्या (Dev Anand) नावाची विशेष खुर्ची असे. त्यात आपल्या स्टाईलमध्ये बसणार. कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणार. आपलं काम नसेल अथवा लायटींगमध्ये वेळ जाणार असेल तर एका कोपर्यात आपल्या खुर्चीत बसून शांतपणे पुस्तक वाचणार आणि एका हातात शीतपेय असणार. लंच ब्रेकमध्ये आपल्या मेकअपरुममध्ये जाणार आणि लंच ब्रेक संपताच सेटवर येणार आणि ते अगदी त्या दिवसाचे पॅकअप होईपर्यंत सेटवर असणार. पूर्ण दिवसात कोणीही पाहुणे सेटवर भेटावयास येणार नाहीत आणि दिवसभरात एकही फोन येणार नाही. सगळे लक्ष आपल्या कामावर. त्या काळात लॅन्डलाईन फोन होते आणि मेहबूब स्टुडिओच्या मुख्य इमारतीतील तळमजल्यावरील ऑफिसमध्ये फोन होता. पण देव आनंद आपल्या कामात मग्न असताना पाहुणे अथवा फोन अजिबात नाही, सुलोचनादीदींनी देव आनंदच्या दिलखुलास व्यक्तीमत्वातील एक महत्वाचा पैलू माझ्याकडे उलगडला होता.
मी मिडियात आल्यावर मेहबूब स्टुडिओत अनेक चित्रपटांचे मुहूर्त, शूटिंग रिपोर्टीग, एकादी मुलाखत यासाठी अनेकदा तरी जात राहिलो, त्यातील देव आनंदचे (Dev Anand) स्वतंत्र प्रगती पुस्तक आपल्याला सांगायलाच हवे. देव आनंदच्या दोन खासियती होत्या. तो आपल्या प्रत्येक नवीन चित्रपटाचा मुहूर्त मेहबूब स्टुडिओत करे, त्यामुळे त्याच्या नवीन चित्रपटाच्या मुहूर्ताचे त्याच्या छापील स्वाक्षरीसह कार्ड हाती येताच ते वाचण्यापूर्वीच लक्षात येई, मेहबूब स्टुडिओत त्याच्या ‘आनंद और आनंद ‘ असो अथवा ‘ सौ करोड’ वगैरे कोणताही चित्रपट असो, सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही मिडियावाले हमखास या मुहूर्ताला हजर राहणार. ऐशीच्या दशकापासूनचे देव आनंदचे (Dev Anand) चित्रपट हा त्याच्या चाहत्यांनी कायमच दुर्लक्षित केलेला विषय. देव आनंदनेच आपल्या कर्तृत्वाने त्यांच्यावर ही वेळ आणली हा भाग वेगळा.
पण आम्हाला अशा मुहूर्ताच्या वेळेस आपण देव आनंद आहोत याची सतत जाणीव देणारा अतिशय उत्स्फूर्त फिल्मवाला अनुभवायला मिळायचा, याला आमचे नशीब समजा हवं तर. महत्वाचे म्हणजे, त्याचे पिक्चर आता फ्लाॅप होत असल्याचा त्याच्या स्वभावावर कोणताही परिणाम दिसत नव्हता. तो देव आनंदचा स्वभावच नव्हता. त्याच्या ‘मै तेरे लिए ‘ या चित्रपटाचा मुहूर्त कायमच आठवणीत राहिला. विजय आनंदच्या दिग्दर्शनात सुनील आनंद आणि मीनाक्षी शेषाद्री अशी जोडी होती. देव आनंदच्या मुलाला विजय आनंद दिग्दर्शित करणार हेच विशेष होते. आणि या मुहूर्ताला चेतन आनंद, देव आनंद (Dev Anand) व विजय आनंद हे तिघेही आनंदबंधु एकत्र हजर होते असा दुर्मिळ योग मेहबूब स्टुडिओच्या इतिहासात एकादाच तसाच माझ्या पिढीतील फोटोग्राफर्स व सिनेपत्रकारांनाही महत्वाचा. या क्षणाचे वर्णन किती करु नि किती करु असे झाले होते. मेहबूब स्टुडिओतच या चित्रपटाचे बरेचसे शूटिंग झाले. पण पिक्चर फारच रखडले. देव आनंदला (Dev Anand) आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टीगसाठी सातत्याने बोलवण्याची हौस, त्यामुळे सतत नवीन अनुभव येत. खरं तर दिग्दर्शक पडद्यावर दिसायला हवा. हा नियम देव आनंदला (Dev Anand) नव्हता अथवा ‘देस परदेस ‘पासून तो ते विसरला. देव आनंदला सगळं जणू माफच होते. तसेच हे एक.
मेहबूब स्टुडिओतच एकदा कला दिग्दर्शक टी. के. देसाईंची भेट झाली. एका मराठी साप्ताहिकासाठी नव्वदच्या दशकात मी टेक्निशियनच्या मुलाखती घेत होते. यांच्याकडे मनोरंजन क्षेत्राची अतिशय उत्तम फर्स्ट हॅॅन्ड माहिती असते हा माझा अनुभव. टी. के. देसाई यांनी याच मेहबूब स्टुडिओत देव आनंद दिग्दर्शित ‘देस परदेस ‘च्या वेळची एक छान आठवण सांगितली. हा चित्रपट निर्मितीवस्थेत असतानाच आपल्या देशात आणीबाणी होती. ( २५ जून १९७५ पासून एकोणीस महिने) आणि विदेशातील शूटिंगवर बंधने होती. पण देस परदेसच्या थीममध्ये नोकरीनिमित्त इंग्लंडला गेलेल्या भारतीयांची फरपट हे होते. म्हणजेच प्रत्यक्षात इंग्लंडमध्ये शूटिंग करायला हवेच. पण आता बंदी असली म्हणून काय झालं? देव आनंदने (Dev Anand) इंग्लंडचे अनेक रस्ते, घर, पब इत्यादींचे फोटो टी. के. देसाई यांना दिले आणि त्यांच्याकडून अगदी हुबेहुब सेट लावून घेतले. सेट लागत असतानाच जवळपास रोजच देव आनंद मेहबूब स्टुडिओत येई आणि टी. के. देसाई यांच्याशी चर्चा करे.
======
हे देखील वाचा : स्टुडिओ कॅमेराच्या आगेमागे….
=====
देव आनंदचे (Dev Anand) मेहबूब स्टुडिओशी अतिशय घट्ट नाते होते. या वास्तूशी त्याचे भावनिक व व्यावसायिक असे दुतर्फा नाते होते. आणि म्हणूनच त्याच्या निधनानंतरच्या शोकसभेचे याच मेहबूब स्टुडिओत आयोजन करण्यात आले होते. त्याचे ३ डिसेंबर २०११ रोजी लंडनमध्ये निधन झाले याची तुम्हालाही कल्पना आहेच. मेहबूब स्टुडिओतील शोकसभेत त्याचा मुलगा सुनील आनंद याच्यापासून झीनत अमानपर्यंत अनेक जण होते. देव आनंदच्या (Dev Anand) खिरा नगरमधील ऑफिस आणि पाली हिलवरील आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओ ( येथील देव आनंदचे ऑफिस एक मस्त अनुभव असे. त्याच्या स्वतंत्र मुलाखतीसाठी भेटता येई.) येथील सगळा स्टाफ दिसला , पण देव आनंदची पत्नी कल्पना कार्तिकची अनुपस्थिती जाणवली.
मेहबूब स्टुडिओतील हा माझा अगदीच वेगळाच अनुभव. मेहबूब स्टुडिओत अनेकदा तरी जाणे झाले, त्यात देव आनंद कल्चर हे असे…इतकेच नव्हे तर अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासूनचा देव आनंदचा कोणताही चित्रपट पाहताना त्यात शूटिंग स्थळ म्हणून मेहबूब स्टुडिओ वाचताना आश्चर्य वाटत नाही. मग तो विजय आनंद दिग्दर्शित ‘तेरे घर के सामने ‘ असो अथवा मोहनकुमार दिग्दर्शित ‘अमीर गरीब ‘ असो..